>> मंत्री गोविंद गावडे यांची माहिती
>> ऑगस्टमध्ये लोकार्पणासाठी प्रयत्न
कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या ऑगस्ट २०२२ पर्यत नूतनीकरण करण्यात आलेल्या कला अकादमीच्या इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हापसा, पेडणे आणि सांगे येथील रवींद्र भवनाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून म्हापसा येथील रवींद्र भवनाच्या जमिनीच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघाल्यास त्याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, असे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
कला अकादमीच्या इमारतीमध्ये पावसाळ्यामध्ये गळती होत असल्याने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे साधारण ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे साधारण येत्या ऑगस्ट २०२२ मध्ये नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊ शकते. त्यानंतर इमारत जनतेसाठी खुली केली जाणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
सांगे आणि पेडणे येथील रवींद्र भवनांच्या इमारतींचा आराखडा तयार केला जात आहे. म्हापसा येथील रवींद्र भवनाच्या जागेचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा जमीन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हापशातील रवींद्र भवनाच्या जागेचा प्रश्न सुटल्यास त्याला प्राधान्य दिले जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
अकादमीवर सौरऊर्जा
प्रकल्पाची योजना
राज्यातील कला अकादमी, कला मंदिर, रवींद्र भवन आदी सांस्कृतिक भवनावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना तयार केली जात आहे. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरावर पहिला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १.२५ कोटी रुपयांची निविदा तयार करण्यात आली आहे. त्यानंतर कला अकादमी, रवींद्र भवन साखळी आणि काणकोण येथील रवींद्र भवनात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.