Home Featured कला अकादमीच्या अध्यक्षपदी बाबू कवळेकर

कला अकादमीच्या अध्यक्षपदी बाबू कवळेकर

0

एकूण नऊ महामंडळे व सरकारी संस्थांवर नवे अध्यक्ष

मायकल लोबो, संकल्प आमोणकर, आंतोन वाझ यांचा समावेश

राज्य सरकारच्या नऊ महामंडळ आणि सरकारी संस्थांच्या नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीचा आदेश काल जारी करण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची गोवा कला अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, माजी आमदार दयानंद सोपटे यांची बालभवनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील भाजप आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची मलनिस्सारण महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती काल करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्नशीर आहेत. राज्य मंत्रिमंडळात कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर एखाद्याची निवड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात
होती.

तथापि, राज्य सरकारकडून आमदार लोबो यांची महत्त्वपूर्ण अशा गोवा राज्य पायाभूत साधन सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर, आमदार आमोणकर यांची मलनिस्सारण महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने संकल्प आमोणकर यांची बालभवनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. तथापि, संकल्प आमोणकर यांनी बालभवनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता.
गोवा विधानसभेच्या सभापतिपदी डॉ. गणेश गावकर यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी साळगावचे आमदार केदार नाईक यांची वर्णी लावण्यात आली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांची गोवा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गोवा शिक्षण विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी गोविंद पर्वतकर यांना कायम ठेवण्यात आले आहे. गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोवा खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षपदी कुठ्ठाळीचे आमदार आन्तोन वाझ आणि उपाध्यक्षपदी सर्वांनद भगत यांना कायम ठेवण्यात आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मायकल लोबो, संकल्प आमोणकर यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावल्याने रिक्त मंत्रिपदावर अन्य आमदाराची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रीपदासाठी माजी मंत्री नीलेश काब्राल, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांची नावे चर्चेत आहेत. आगामी 2027 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलेला प्रतिनिधीत्व देण्यासाठी आमदार डिलायला लोबो यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.