मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणाला काल मिळालेली कलाटणी धक्कादायक आणि एखाद्या रहस्यपटातच शोभावी एवढी विस्मयकारक आहे. सदर स्कॉर्पिओच्या सोबत जी पांढरी इनोव्हा सीसीटीव्हींत आढळली होती, ती दुसर्या तिसर्या कोणाची नसून मुंबई पोलिसांचीच होती आणि स्फोटके ठेवणारा त्यातूनच पळाला अशा निष्कर्षाप्रत येऊन एनआयएने ती इनोव्हा तर मिळवलीच, शिवाय त्या प्रकरणाचे मुंबई पोलिसांचे तत्कालीन तपास अधिकारी सचिन वाझे यांना केवळ मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातच नव्हे, तर थेट स्फोटके पेरल्याप्रकरणात काल अटक केली आहे.
स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर सुरवातीला ती आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला, परंतु नंतर त्यांच्या तोंडात रुमाल कोंबलेले आढळल्याने तसेच खाडीत फेकल्या गेलेल्या त्या मृतदेहाच्या पोस्टमार्टेममध्ये त्याच्या पोटात पाण्याचा वा वाळूचा कणही न आढळल्याने अन्यत्र हत्या करून मग ते प्रेत पाण्यात फेकले गेले असावे असा संशय बळावला आहे. हिरेन यांच्या पत्नीने जी तक्रार दिली आहे, त्यात तिने थेट सचिन वाझे या तपास अधिकार्याचेच नाव घेतले होते. ह्या संशयाला प्रथमदर्शनी तरी बळकटी देणारे पुरावेही नंतर समोर आले. ह्या मनसुख हिरेनचा वाझे यांच्याशी पूर्वपरिचय होता व ज्या स्कॉर्पिओत स्फोटके पेरली गेली होती, ती हे वाझे चार महिने वापरत होते अशी धक्कादायक माहिती नंतर समोर आली. त्यामुळे एकीकडे वाझे यांची पाठराखण करणारे महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता. त्या पार्श्वभूमीवर एनआयएने हे प्रकरण परस्पर हाती घेतल्याने केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्षात आता ह्याची परिणती झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या तपासकामाचे गंभीर राजकीय परिणामही येणार्या काळात अटळ असतील.
ज्या सचिन वाझेंना अटक झाली आहे, त्यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्त आहे. २००२ साली ख्वाजा युनूस प्रकरणात ते निलंबित झाले होते. जवळजवळ ५८ दिवस त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागली होती व नंतर २००४ साली ते जामीनमुक्त झाले, परंतु तब्बल सतरा वर्षे निलंबनाखाली राहिल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येताच त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि कंगना राणावत, अर्णव गोस्वामींचा टीआरपी घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या व राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास त्यांच्याकडे सोपविला गेला. येथे आणखी एक बाब उल्लेखनीय आहे ती म्हणजे निलंबनाच्या काळात हे वाझे राजकारणात येण्यासाठी शिवसेनेत सामील झाले होते व पक्षाचे प्रवक्तेही बनले होते. त्यामुळे पुन्हा पोलीस दलात सामील झाल्यावरही ते शिवसेनेच्या मोहर्यागत वावरत होते का व म्हणूनच शिवसेनेचे राजकीय वैर असलेल्या कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांची प्रकरणे त्यांच्याकडे सोपविली जात होती का असा प्रश्न कोणाला पडला तर चुकीचे म्हणता येत नाही. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या अटकेची मागणी करताच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वाझे म्हणजे काही लादेन नव्हे’ असे सांगत त्यांची जाहीर पाठराखण केली होती. एखाद्या सहायक पोलीस अधिकारी पदावरील व्यक्तीच्या समर्थनार्थ थेट मुख्यमंत्र्याने असे वक्तव्य करणे निश्चितच भुवया उंचावणारे होते. आता एनआयएच्या हस्तक्षेपामुळे वाझे अडचणीत आलेले आहेत आणि केवळ वाझेच नव्हे, तर त्यांची पाठराखण करणार्या महाराष्ट्र सरकारलाही आता काही गंभीर प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबरोबरच अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यातील आता दिसून आलेला मुंबई पोलिसांचा कथित सहभाग देशात आजवर नावाजल्या गेलेल्या आणि स्वतःला स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे म्हणवणार्या मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळणारा तर आहेच, शिवाय अशा प्रकारे अंबानींना धमकी दिली जाण्यामागचे कारण काय हा प्रश्नही उपस्थित करणारा आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचे काही प्रयत्न चालले होते का व त्यातून अशा प्रकारचा इशारा तर दिला गेला नाही ना असेही आता काही शंकेखोर विचारतील. त्यामुळे आता वाझे यांच्यापासून महाराष्ट्र सरकारला हात झटकणे भाग असेल. ‘जगापासून दूर जाण्याची वेळ आली आहे’ असे अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यानंतर सोशल मीडियावर वाझे यांनी लिहिले ते उगीच नाही. आपला लढा आता त्यांना एकट्याने लढावा लागणार आहे. स्वतःचे निरपराधित्व सिद्ध करावे लागणार आहे. ते अपराधी असल्याचे दिसून आले तर त्यांनी हे का आणि कोणाच्या सांगण्यावरून केले हा प्रश्न अर्थातच आ वासून उभा राहीलच!