कलाकौशल्यांमागील भारतीय मानसाचा अनोखा शोध

0
224

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य इतकेच नव्हे, तर वस्त्र, अलंकार, वास्तू, वस्तूंमधून आणि तत्त्वज्ञान, मिथके, या सार्‍यांतून भारतीय संस्कृतीचा उदात्त, वैश्विक विचार प्रवाहित होत राहिला. या सगळ्याच्या मागे होते एक प्रगल्भ भारतीय मानस. कलाभ्यासक हर्ष दहेलिया यांनी हेच सूत्र घेऊन एक सुंदर ग्रंथ लिहिला आहे, ज्याचे नाव आहे, ‘द ब्युटिफुली इंडियन हिंदू माईंड.’

प्राचीन भारतीय संस्कृतीच्या कुशीमध्ये युगानुयुगे नानाविध कलाकौशल्ये बहरली. एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत चालत राहिली. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य इतकेच नव्हे, तर वस्त्र, अलंकार, वास्तू, वस्तूंमधून आणि तत्त्वज्ञान, मिथके, या सार्‍यांतून भारतीय संस्कृतीचा उदात्त, वैश्विक विचार प्रवाहित होत राहिला. या सगळ्याच्या मागे होते एक प्रगल्भ भारतीय मानस. कलाभ्यासक हर्ष दहेलिया यांनी हेच सूत्र घेऊन एक सुंदर ग्रंथ लिहिला आहे, ज्याचे नाव आहे, ‘द ब्युटिफुली इंडियन हिंदू माईंड.’ ऊर्फ ‘सुंदर भारतीय हिंदू मनस्.’ या सौंदर्यासक्त भारतीय मानसाचे लख्ख प्रतिबिंब वरील सार्‍या कलाकौशल्यांमधून वेळोवेळी कसे पडत राहिले आहे, इतिहास आणि संस्कृती यामध्ये त्याची कशी मुद्रा उमटली आहे, त्याचा विस्तृत पट मांडणारा हा एक अनोखा ग्रंथ म्हणावा लागेल.

भारतीय संस्कृतीवर इतिहासामध्ये अनेक आक्रमणे झाली. वेळोवेळी विदेशी आक्रमकांनी येथे पाय रोवण्याचा प्रयत्न केला. काही पराभूत झाले, काही जेते झाले, विजयोन्मादामध्ये त्यांनी येथील मंदिरे तोडली, मूर्ती फोडल्या, ग्रंथ जाळले, परंतु येथील संस्कृती त्यांना नामशेष करता आली नाही. उलट या संस्कृतीनेच त्यांना असे काही सामावून घेतले की तेच येथे कालांतराने विरघळून गेले. आपल्या संगीतापासून वास्तुकलेपर्यंत या सरमिसळीच्या खुणा दिसतात.

हर्ष दहेजिया यांच्यासारख्या अभ्यासकाला भारतीय संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या ‘भारतीय मानसा’चा शोध घ्यावासा वाटला. आपल्या संस्कृतीच्या प्रतीकचिन्हांतून, कला कौशल्यांतून प्रकटणार्‍या त्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच हे आगळेवेगळे पुस्तक आहे. या भारतीय मनाला त्यांनी आवर्जून ‘भारतीय हिंदू मानस’ संबोधले आहे, कारण या ‘हिंदू’ शब्दातून येथील मूलभूत जीवनपद्धतीचे वर्णन करता येते अशी त्यामागील भूमिका आहे. भारतीय संस्कृतीचा कालप्रवाह जवळजवळ पाच हजार वर्षांचा आहे. शिवाय प्रचंड भौगोलिक वैविध्य असलेला हा देश. परंतु या सगळ्या प्रतीकांच्या मागे एक मानसिक सूत्र आहे या विश्वासाने या ग्रंथातून या भारतीय हिंदू मानसाची गुणवैशिष्ट्ये टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लेखक स्वतः वैद्यकशास्त्र आणि प्राचीन भारतीय संस्कृती या दोन विषयांत डबल डॉक्टरेट मिळवणारे विदेशस्थ प्राध्यापक आहेत, परंतु अत्यंत मूलगामी भारतीय तत्त्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथातून जाणवतो.

आपल्याला अभिप्रेत असलेले हिंदू ‘मानस’ म्हणजे ‘मेंदू’ नव्हे असे ते स्पष्ट करतात. ‘मानस’ या शब्दामध्ये त्यांना ‘चित्त’ असा अर्थ अभिप्रेत आहे. ‘चित्त’ या संकल्पनेमध्ये बुद्धी, अहंकार आणि मनस् या तीन गोष्टींचा समावेश होतो व ती त्याची प्रकृती असते याकडे ते लक्ष वेधतात. या मानसाच्या श्रद्धा व रस यातून सांस्कृतिक प्रवाहातील विविध प्रतीके आविष्कृत झाल्याचा विचार त्यांनी मांडला आहे.

हे भारतीय मानस आधुनिकता स्वीकारत असताना प्राचीनता त्यागत नाही. ते प्रत्येक गोष्टीचा सौंदर्यानुभव घेऊ पाहते, ते आत्म्याचे परमात्म्याशी, ब्रह्मांडाशी नाते जोडते, ‘अहं ब्रह्मास्मि’ ही त्याची धारणा आहे, ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा वैश्विक विचार त्यात सामावला आहे. ‘सत्यं, शिवं, सुंदरम्’ची उपासना करणार्‍या या भारतीय मानसाचे प्रकटन उपरोल्लेखित चित्र, शिल्प, नृत्य, संगीतादी विविध गोष्टींत कसे घडत आले आहे त्याचा सचित्र वेध लेखकाने घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय मानसाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते बाह्य सौंदर्यापेक्षा आतल्या वा आंतरिक सौंदर्याला अधिक महत्त्व देते. आतून मिळणारा आनंद त्याला हवाहवासा वाटतो. बाह्य सौंदर्य हे ‘माया’ आहे असे त्याला वाटते याकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे.
भारतीय मानसाचा आपल्या इतिहासाच्या पानांतून, गाथा आणि कथांतून वेळोवेळी कसा उलगडा होत आला आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ आहे. माणसाचे मन हे झाडासारखे असते. झाड ज्या जमिनीत उगवते, तिचे गुणधर्म घेऊन वाढत असते, तसेच मनाचे आहे. ज्या संस्कृतीच्या मातीत ते रुजते, उगवते, तिचे गुणधर्म घेऊनच ते या संसारात वावरते असे प्रतिपादन लेखकाने केले आहे.

भारतीय मानस हे सौंदर्यानुभूती कशी घेते, तिला जीवनाचा भाग कसे बनवते त्याची अनंत उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत. घराचे सारवलेले अंगण, रेखाटलेली रांगोळी, चितारलेल्या भिंती, शाकारलेले छप्पर, लाकडी नक्षीकाम, कलाकुसर इतकेच कशाला, नायिकेच्या केसांत माळलेली फुले, भांगातला सिंदूर या सार्‍यातून भारतीय मानसाची सौंदर्यदृष्टी दिसून येते व गरीब असो वा श्रीमंत, त्यामध्ये या सौंदर्यदृष्टीचा आविष्कार होतोच होतो असे लेखकाने नमूद केले आहे.
भारतीय मानस प्रतिकांमधून समजावून घेण्याचा प्रयास या ग्रंथात आहे. रंग, रूप, चिन्हे, प्रतीके या सार्‍यांना काही अर्थ आहे. त्यामागे काही प्रेरणा आहे असा विचार लेखकाने मांडला आहे. ‘आगम’ या भारतीय संकल्पनेकडे ते लक्ष वेधतात. आगम म्हणजे परंपरेने आपल्याकडे आलेले ज्ञान, जे कोणी आपल्याला शिकवलेले नसते. आपण काढत असलेल्या आकृत्यांमधूनही आपल्या कलात्मक संवेदनशीलतेचे दर्शन घडते, आपल्या उत्सवांतून, गंधांतून, रंगांतून आपले भारतीय मन आविष्कृत होतेच होते असे लेखकाला वाटते.
स्त्री एक काव्य या विभागामध्ये भारतीय स्त्री संकल्पना, तिला दिले गेलेले प्रकृतीचे स्वरूप, गजगामिनी ते मृगनयनी अशी तिची वर्णने, विप्रलब्धा, राधा, रागिणी, सुरसुंदरी, सलभंजिका, यक्षी, योगिनी, आदी तिची विविध रूपे या सगळ्यामागचा भारतीय विचार मांडला गेला आहे.

एका प्रकरणामध्ये आपल्या वस्त्रप्रावरणांतून हे भारतीय मानस कसे प्रकटते याचा धांदोळा आहे. घरगुती कलाकुसरीतून, गोधड्या, भरतकाम, विणकाम, कलाकुसर केलेल्या पेट्या, दिवे यातून, नक्षीकामातून, भित्तिचित्रांतून, आरसे तसबिरींतून, रोजच्या जीवनाचा भाग बनलेल्या गोष्टींतूनही भारतीय मानस आविष्कृत होते त्याचा लेखाजोखा लेखक मांडत जातो.

अन्य संस्कृतींशी भारतीय संस्कृतीचा झालेला मिलाफही लेखकाने नाकारलेला नाही. त्यातून भारतीय मानस अधिक समृद्ध कसे होत गेेले, व्यापक कसे होत गेले त्याचाही आढावा घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. अभिजनांपासून बहुजनांपर्यंत सर्वांच्या कलाकौशल्याविष्कारामागील भारतीय मानसाचा हा शोध रंजक आहे आणि विचारप्रवृत्त करायला लावणाराही आहे.