कर्नाटक निवडणुकीत भाजपने केली इव्हीएममध्ये बनवेगिरी

0
138

>> कर्नाटकचे उपमुख्यमंत्री परमेश्वरांचा आरोप

नवनियुक्त मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी भाजपवर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बनवेगिरी व हातचलाखी केल्याचा आरोप केला. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवून पुन्हा मतपत्रिकेद्वारे यापुढच्या निवडणुका घेण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परमेश्वर म्हणाले की, आपले काही नेते तसेच आपले स्वतःचेही मत आहे की भाजपने इव्हीएममध्ये हातचलाखी केल्याने कॉंग्रेस प्रबळ असलेल्या मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार पराभूत झाले. अन्य एका प्रश्‍नावर त्यांनी सांगितले की, आपण दलीत असल्याने आपणाला उपमुख्यमंत्रीपद मिळालेले नाही.

दरम्यान, मतदान पुढे ढकललेल्या राजराजेश्वरीनगर मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराला जेडीएस पाठिंबा देणार असल्याचेही परमेश्वर यांनी जाहीर केले. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे जयनगर मतदारसंघाचीही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दोन्ही ठिकाणी येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे.

आज बहुमत चाचणी
मुख्यमंत्री कुमारस्वामी आज कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. युती सरकारमधील कॉंग्रेस व जेडीएस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना बंगळुरूमधील दोन वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या ९ दिवसांपासून ठेवण्यात आले आहे. खास बसेसमधून आज त्यांना हॉटेलमधून थेट विधानसभेत आणले जाणार आहे. बहुमत चाचणीनंतरच या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊ दिले जाणार आहे.