कर्नाटकात येडियुरप्पा सरकार बहुमतात

0
133

>> पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय

कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून १५ पैकी १२ जगांवर भाजपने विजय प्राप्त केला आहे. कॉंग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून कॉंग्रेसने पराभव मान्य केला आहे. राज्यातील १५ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. या विजयामुळे बीएस येडियुरप्पा सरकार आता बहुमतात आले आहे.

कर्नाटकात एकूण २२३ जागा असून भाजपला बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज होती. भाजपकडे १०५ तर कॉंग्रेसकडे ६६ आणि जेडीएसचे ३४ आमदार आहेत. पोटनिवडणुकीत भाजपला १२ जागा मिळाल्याने आता भाजपचे ११७ आमदार झाले आहेत. या पोटनिवडणुकीत मतदारांनी जेडीएसला सपशेल नाकारले असून त्यांना एकही जागा मिळाली नाही तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे. या विजयामुळे येडियुरप्पा सरकारवरील धोेका टळला आहे.
१५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर न्यायालयानेया सर्व आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे कर्नाटकात पोटनिवडणूक घेण्यात आली.

मोदींचा हल्ला
कर्नाटकातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि जेडीएसवर टीका केली आहे. झारखंडमधील हजारीबाग येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की, कॉंग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाने जनादेशाला झिडकारून सरकार स्थापन केले पण कर्नाटकातील जनतेने लोकशाही पद्धतीने त्यांना धडा शिकवला असून एका मजबूत आणि स्थिर सरकारला बळ दिले आहे.

सिद्धरामय्यांचा राजीनामा
दरम्यान, कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन सिद्धरामय्या यांनी आपला कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवून दिला. लोकांनी जो कौल दिलाय तो मला मान्य आहे. कॉंग्रेस पक्षाच्या भल्याचा विचार करुन मी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांनी आम्हाला १५ जागांवर झालेला पराभव मान्य करावा लागणार आहे. आम्हाला विजय मिळाला नाही, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना कॉंग्रेस आणि जेडीएसमधील १७ आमदारांनी बंडखोरी शस्त्र उपसले होते. बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले होते. २२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचे संख्याबळ १७ आमदारांच्या बडतर्फीनंतर २०८ वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यानंतर आता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार मुंसडी मारत १२ जागा जिंकल्या व बहुमताचा आकडा पार केला आहे.