कर्नाटकात जिलेटिन कांड्यांच्या स्फोटात सहाजणांचा मृत्यू

0
73

कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यात मंगळवारी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असताना हा स्फोट झाला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. स्फोटात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींनी जिलेटिनच्या कांड्या बेकायदा साठवल्या होत्या. पोलिसांच्या छाप्याच्या भीतीने त्यांनी या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हा स्फोट झाला.
स्फोटानंतर चिक्काबल्लापुरचे जिल्हा प्रभारी डॉ. के सुधाकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ही एक धक्कादायक घटना आहे. ही सर्व स्फोटके बेकायदा साठवून ठेवली होती. या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.