कर्नाटकचे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन

0
127

अवैध मालमत्ताप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे तुरुंगात असलेले कर्नाटकचे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते डी. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने काल जामीन मंजूर केला. शिवकुमार हे पळून जाण्याची शक्यता नाही अशी टिप्पणी करीत न्या. सुरेश कैत यांनी हा निर्णय दिला.

साक्षीदारांवर शिवकुमार यांनी दबाव आणल्याविषयीही पुरावा मिळालेला नाही. तसेच याप्रकरणी पुराव्याची कागदपत्रेही तपास यंत्रणेकडे असल्याने शिवकुमार त्यात फेरफार करण्याची शक्यता नाही, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे २५ लाख रुपयांचा जातमुचलका व दोन हमीदार देऊन शिवकुमार यांची जामीनावर सुटका करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
५७ वर्षीय शिवकुमार यांना ईडीने गेल्या ३ सप्टेंबर रोजी अटक केली होती व त्यानंतर ते तिहार तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत होते.

दरम्यान कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल शिवकुमार यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली व कॉंग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांना सांगितले. हा राजकीय सूडाचा प्रकार असल्याचेही सोनिया गांधींनी त्यांना सांगितले.