कर्नाटकचा कौल काय?

0
10

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल आज येणार आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या तिन्ही प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे. देशातून हळूहळू हद्दपार होत चाललेल्या काँग्रेससाठी कर्नाटकातील यश हे नवसंजीवनी ठरू शकते, तर भाजपसाठी कर्नाटकमधील सत्ता राखता आली तर आजवर अप्राप्य राहिलेल्या दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये शिरकाव करण्यासाठी ते मॉडेल ठरू शकेल. त्यामुळेच दोन्ही पक्ष अगदी अटीतटीने या लढ्यात उतरले आहेत. आजवर कर्नाटकच्या राजकारणात किंगमेकरच्या भूमिकेपुरते सीमित राहिलेले देवेगौडा – कुमारस्वामींचे जनता दल सेक्युलर या निवडणुकीत स्वतःच किंग बनण्याची आकांक्षा ठेवून आहे. कर्नाटकसंदर्भात ज्या मतदानोत्तर पाहण्या झाल्या, त्यांनी एक तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे, नाही तर भाजपला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरवले आहे. काहींना 2018 प्रमाणेच यावेळीही पुन्हा त्रिशंकू स्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. मतदानोत्तर पाहण्यांतील या मतमतांतरांच्या पार्श्वभूमीवर आजचा निकाल कसा येतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
काँग्रेसने, खरे तर त्याच्या स्थानिक नेतृत्वाने – म्हणजे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी या निवडणुकीसाठी जिवापाड मेहनत घेतली आहे. त्यामुळे आजच्या निकालात जर बहुसंख्य मतदानोत्तर पाहण्यांतील अंदाजानुसार काँग्रेसला मोठे यश मिळाले तर त्याचे संपूर्ण श्रेय ना राहुलना, ना सोनियांना, ते केवळ काँग्रेसच्या या स्थानिक नेतृत्वालाच जाईल. याउलट भारतीय जनता पक्ष जर दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची गेल्या चार दशकांची प्रथा मोडीत काढून आपले सरकार कायम राखू शकला, तर त्याचे श्रेय स्थानिक नेतृत्वापेक्षा विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व इतर केंद्रीय नेत्यांच्या झंझावाती दौऱ्यांना द्यावे लागेल. आजवर जनता दल सेक्युलरचा प्रभाव केवळ जुन्या म्हैसूर संस्थानच्या प्रदेशांपुरताच दिसत आला आहे. या निवडणुकीत त्यांचा तो बालेकिल्ला टिकतो की उद्ध्वस्त होतो, ते किंगमेकरची भूमिका बजावण्याच्या स्थितीत तरी राहतात की नाही, हे पहावे लागेल. जेडीएसला गेल्यावेळेसारख्याच किमान पंचवीस – तीस जागा मिळतील असे अंदाज वर्तवले जात असल्याने सर्वाधिक जागा जिंकण्याची अपेक्षा ठेवून असलेल्या काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षांनी निकालापूर्वीच त्यांच्याशी संधान जुळवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या लढतींकडेही सर्वांचे लक्ष राहील. वरुणामध्ये सिद्धरामय्या, कनकपुरामध्ये शिवकुमार, शिग्गावमध्ये बोम्मई, चन्नपटणामध्ये कुमारस्वामी, हुबळी-धारवाडमध्ये जगदीश शेट्टर यांचा फैसला आज आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपला कौल नव्हता. परंतु आमदारांची फोडाफोडी करून, तब्बल सतरा आमदार फोडून भाजपने ऑपरेशन लोटसद्वारे तेथील सरकार बळकावले. त्यामुळे यावेळीही भाजप अशाच तोडफोडीवर उतरणार का की, गेल्या लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशाच्या पावलावर पाऊल टाकून या विधानसभा निवडणुकीत स्वतः दिमाखदार विजय संपादन करणार हे पहावे लागेल. आम्ही कर्नाटकसंदर्भातील अग्रलेखात यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, ह्या निवडणुकीत ध्रुवीकरण करणारे भावनिक विषय ऐरणीवर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपने केला. मात्र काँग्रेसने त्या सापळ्यात न अडकता जनसामान्यांच्या दैनंदिन संघर्षाला भेडसावणाऱ्या विषयांनाच आपल्या जाहीरनाम्यात स्थान दिले. त्यांचा भर केवळ स्थानिक प्रश्नांवर व मुद्द्यांवर राहिला. देशात कोणत्याही राज्यात नाही एवढी काँग्रेसचची पक्षसंघटना कर्नाटकात सशक्त आहे. त्याचे श्रेय मुख्यत्वे डी. के. शिवकुमार यांना आहे. ते ईडीलाही पुरून उरले आहेत. त्यामुळे भाजपच्या संघटित, पूर्वनियोजित निवडणूक प्रचार मोहिमेला तोडीस तोड मोहीम काँग्रेस या निवडणुकीत उभारू शकला. त्याला अन्य राज्यांप्रमाणे निधीचीही चणचण येथे भासली नाही. आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे यावेळी कर्नाटकात झालेले मतदान. 73.19 टक्के एवढे भरघोस मतदान या विधानसभा निवडणुकीत राज्यात झाले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिक मतदान झाले आहे. आता हा ग्रामीण मतदार काय कौल देतो हे आज दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तो भाजपाला कर्नाटकची सत्ता राखू देतो की, धार्मिक, भावनिक प्रश्नांना न जुमानता काँग्रेसने उपस्थित केलेल्या भ्रष्टाचारासारख्या मुद्द्यांना आणि विविध कल्याणयोजनांना प्रतिसाद देत भाजपचे सरकार उलथवतो हे आजचा निकाल सांगेल!