- अनुश्री नाईक
बाजारात गेल्यावर भाजीसाठी कापडी पिशवी नेऊन प्लास्टिकसाठी नकार देणे हा सर्वात मोठा बदल आहे. प्लास्टिक एक असा घटक आहे जो १०० वर्षांपर्यंत जमिनीखाली राहिला तरी त्याचे विघटन होत नाही आणि हे प्लास्टिक जमिनीला नापीक करतं. गटारी, नाले यामध्ये अडकून पाणी साचले जाते.
समाजातील प्रत्येकानेच पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत. पाण्यासाठी महिलांची चाललेली वणवण आपण बोलक्या छायाचित्रातून पाहत असतो. जलसंधारणाच्या कामातील महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. अनेक महिला विविध संस्थांच्या पर्यावरण दिन कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या परीने यात वाटा उचलत आहेत. प्रत्येक गृहिणीसुद्घा पर्यावरण रक्षणासाठी घरापासून सुरुवात करू शकते. आपल्या दैनंदिनीत लहान-सहान बदल करून पर्यावरणाचे रक्षण करून आपले योगदान देऊ शकते. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर नेहमीचा स्वयंपाक करताना आपण थोडी समज दाखविली तर रोज पाच ते सहा लीटर पाणी वाचवू शकतो. डाळ, तांदूळ आणि भाजीपाला धुतलेले पाणी आणि फरशी पुसलेले पाणी फेकून न देता जर ते घरातील झाडांना घातले तर झाडांची पाण्याची गरजही पूर्ण होते. अर्थात फरशी पुसण्याच्या पाण्यात कोणतेही रसायन मिसळलेले नसावे.
बाजारात गेल्यावर भाजीसाठी कापडी पिशवी नेऊन प्लास्टिकसाठी नकार देणे हा सर्वात मोठा बदल आहे. प्लास्टिक एक असा घटक आहे जो १०० वर्षांपर्यंत जमिनीखाली राहिला तरी त्याचे विघटन होत नाही आणि हे प्लास्टिक जमिनीला नापीक करतं. गटारी, नाले यामध्ये अडकून पाणी साचले जाते. याचा अनुभव आपण २६ जुलैच्या मुंबईच्या पावसात घेतला आहे. त्यामुळे प्लास्टिकला नाही म्हणायला शिकले पाहिजे. त्यातही कागदाचा वापर शक्य तितका कमी करायला शिकायला हवे. कारण कागद बनविण्यासाठी झाडांचा बळी दिला जातो.
घरातील पंखे, दिवे, टीव्ही, हीटर, एसी ही उपकरणे गरजेपुरतीच लावावीत. कुटुंबातील सर्वजणांनी बहुतेकवेळा एकत्र एकाच खोलीत बसून आपली कामे करायला हवीत. यामुळे दोन फायदे होतील विजेची बचत तर होईलच याशिवाय कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी चांगला संवाद राहील आणि नातीही अधिक दृढ होत जातील. घरातून बाहेर पडताना विजेच्या उपकरणांची बटणे बंद आहेत की नाही याची खात्री करून घ्यायलाच हवी.
आपल्या इथे सर्वात मोठा प्रश्न कचर्याचा आहे. घन कचरा आणि ओला कचरा. ओल्या कचर्यात भाजीपाला निवडून उरलेले देठ, शिळे अन्न यांचा समावेश होतो. शक्यतो लागेल तितकेच अन्न शिजविल्यास असे अन्न टाकून द्यावे लागणार नाही. यामध्ये अन्नाची नासाडी तर होतेच आणि कचर्यातही वाढ होते. घन कचरा ज्यापासून पुनर्निर्मिती होऊ शकते. घन कचरा म्हणजे काचेच्या वस्तू, पेपर, धातूचा कचरा इ. असा कचरा पुनर्निर्मिती देतो म्हणजे एका अर्थाने आपण नैसर्गिक संपत्ती वाचवितो. ओला कचरा आणि घन कचरा वेगळा ठेवणे, हे सुगृहिणीचे लक्षण आहे.
कुठेही प्रवासाला जाताना आपण सामसुम जागा पाहून आपल्याजवळील कचरा बिनधास्तपणे गाडीतून फेकून देतो. ही सवय मोडली पाहिजे. ठिकठिकाणी असणार्या डस्टबिनचा वापर करणे सक्तीचे आणि शिस्तीचे आहे. त्याचा अंगिकार आपण केला तर नवीन पिढीही तसाच कित्ता गिरवेल.
सणासुदीच्या काळात व्रतवैकल्ये सुरू असतानाही झाडांची नकळत खूपच हानी होते. आता वटपौर्णिमेचे उदाहरण घ्यायचे झाले तर बहुतेक महिला बाजारातून वडाची फांदी विकत आणतात आणि घरीच वडाच्या झाडाची प्रतिकात्मक पूजा करतात. प्रतिकात्मक यासाठी म्हटले कारण कथेत असे आहे की वडाच्या झाडाचीच पूजा करावी. गावी तर आजही स्त्रिया नटूनथटून वडाच्या झाडाची पूजा करायला बाहेर पडतात. शहरात पण आहेत वडाची झाडे. अगदीच नसतील तर फोटो आणून पूजा करतात. शेवटी हा सर्व श्रद्घेचा भाग झाला. मुळात वडाच्या झाडाखाली ऑक्सिजनचे प्रमाण बरेच असते. वडाच्या पूजेमागे शास्त्रीय कारणही आहे. पण, श्रद्घेच्या नावाखाली झाडाच्या फांद्या ओरबाडून झाडाला दोरे बांधण्याचे प्रकार फारच अमानूष वाटतात. गणपती, महालक्ष्मी, दसरा आदी सणांनाही विविध पानांचे महत्त्व सांगितले आहे. पण, त्यासाठी बरीच झाडे भोंडी केली जातात. फांद्या तोडून आपण त्या झाडाला दु:खच देत असतो. सर्व देवतांसोबत निसर्ग देवतेचीही आपण आराधना केली तर पर्यावरण रक्षणही घडेल. आज काळाची हीच गरज आहे.
येणार्या दिवाळीच्या सणात निरनिराळ्या प्रकारचे फटाके फोडून, आतषबाजी करूनही आपण एकप्रकारे पर्यावरणाची हानी आणि हवेचे प्रदूषणच घडवून आणत असतो. फटाक्यांमुळे लहान किंवा मोठ्यांनाही अपघात घडू शकतात. अशी कितीतरी उदाहरणे या काळात आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. तरीही माणूस का बदलत नाही? की त्याला बडेजाव दाखवण्यात धन्यता मिळते कुणास ठावूक? प्रश्न खरंच गंभीर आहे. विचार करू या ना, आता तरी!!