करासवाडा-म्हापसा येथे भावाचा भावांकडून खून

0
186

आकय-करासवाडा म्हापसा येथील दोन भावांनी आपल्या विलास केरकर (५२) या अविवाहीत भावाचा दारूच्या नशेत पीव्हीसी पाईप आणि लाकडी दांड्याने खून केला. याप्रकरणी विलास यांचा मोठा भाऊ विनोद केरकर (६५) व लहान भाऊ ज्ञानेश्वर केरकर (५०) या दोघांना म्हापसा पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ही घटना रविवारी रात्री ८.५० वा. च्या सुमारास घडली.

केरकर कुटुंबातील हे तीन भाऊ व एक बहीण अविवाहीत आहेत. रविवारी रात्री त्यांची दारुच्या नशेत भांडण झाले. यावेळी संशयित विनोद व ज्ञानेश्वर यांनी मधला भाऊ विलास केरकर याच्या डोक्यावर पीव्हीसी पाईप व लाकडी दांड्याने वार केले व त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत खाली पडला असतानाही त्याला दांड्याने मारहाण करण्यात आली. यावेळी शेजारचे लोक भांडण सोडविण्यास पुढे आले असता त्यांनाही या दोघा भावांनी धमकी दिली.

त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विलास केरकर याला पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात नेले असता तो मृत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. या मारहाण प्रकरणाची तक्रार त्यांच्या बहिणीने म्हापसा पोलिसात दिली. त्यावर म्हापशाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली व विनोद आणि ज्ञानेश्वर यांना अटक केली.