कतार एअरवेजची जूनपासून ‘मनोहर’वरून विमानसेवा

0
17

कतार एअरवेजने येत्या जून महिन्यापासून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची घोषणा काल केली.
कतार एअरवेज सध्या दाबोळी विमानतळावरून उड्डाणे करीत आहे. येत्या 20 जून 2024 पासून दाबोळीऐवजी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे करणार आहे. कतार एअरवेजकडून दैनंदिन उड्डाणाच्या समान वेळापत्रकानुसार ही सेवा दिली जाणार आहे. मोपा विमानतळावरून आत्तापर्यंत ओमान एअर, एअर इंडिया, इंडिगो यांच्याकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली जात आहेत.

विरोधकांची सरकारवर टीका
दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अनेक विमान कंपन्या दाबोळी विमानतळावरील आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोपाकडे वळवीत आहेत; मात्र राज्य सरकार या प्रकरणी गप्प बसले आहे, अशी टीका युरी आलेमाव यांनी काल केली. कोळसा वाहतुकीसाठी दाबोळी विमानतळाचा वापर करायचा सरकारचा विचार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी दाबोळी विमानतळावरून कमी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणाऱ्या विमान कंपन्या मोपा विमानतळाकडे वळत आहेत, असेही सरदेसाई म्हणाले.