– रमेश सावईकर
गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची नियुक्ती कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी करून एक चांगला निर्णय घेतला आहे. मावळते अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पक्षशिस्तीच्या नावाखाली विरोधी कार्यकर्त्यांवर जी कारवाई केली, त्यामुळे पक्षातील खदखद वाढली. त्याची परिणती फर्नांडिस यांच्या गच्छंतीत झाली. पक्षसंघटना बळकट करण्याऐवजी पक्ष आणखी कमकुवत करण्याचे काम त्यांनी केले. गोव्याचे पक्ष प्रभारी दिग्विजयसिंह यांच्या आशीर्वादाने आजी – माजी कॉंग्रेस नेत्यांना धडा शिकवण्याचे जॉन यांचे मनसुबे धुळीस मिळाले. पदावरून हकालपट्टी झाली, तरी नवे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्यावर तोंडसुख घेण्याचे त्यांनी सोडले नाही. शेवटी दिग्विजयसिंह यांनीच त्यांना सुनावल्याने गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय जॉन यांच्यापुढे राहिला नाही.या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना लुईझिन फालेरोंपुढे पक्ष पुनर्बांधणी – पुनरुज्जीवनाचे एक मोठे आव्हान उभे आहे. सात वर्षे स्थानिक राजकारणापासून ते अलिप्त राहिले. पण त्या काळात राष्ट्रीय पातळीवर सचिव म्हणून उत्तम कामगिरी करून त्यांनी पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची मर्जी संपादन केली. त्यांच्याकडून बरेच काही अनुभवाने शिकून घेतले. त्याचा फायदा त्यांना राज्यातील कॉंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी निश्चित होईल.
सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या त्यांच्या कामाची सुरूवात तर छान झाली आहे. गेले वर्षभर ओस पडलेले कॉंग्रेस भवन चकाचक झाले. तसे आजी – माजी पक्षनेते व कार्यकर्ते फालेरो यांच्या पदभार स्वीकारण्याच्या समारंभदिनी गजबजून गेले. त्यांचे झालेले हे यथोचित स्वागत पक्षाला यापुढे चांगले दिवस पाहण्यास मिळण्याचे संकेत आहेत. गेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पदरी लज्जास्पद दारूण पराभव पडला. त्याचे कारण फक्त मोदी लाटेची जादुई किमया होती असे नव्हे, तर पक्षांतर्गत बंडाळीही कारणीभूत होती.
मागितलेले मिळाले नाही की सरळ वेगळी चूल मांडण्याचा चर्चिल आलेमाव यांचा वैशिष्ट्यपूर्ण खाका कॉंग्रेसला बर्याच अंशी मारक ठरतो, ह्याची प्रचीती गत विधानसभा निवडणुकीत आली. त्याच बरोबर कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागा वाटपावरून मतभेद होतात. त्याचा फायदा विरोधकांना मिळतो, ह्या गोष्टीवर गांभीर्याने विचार करून त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याची सक्षमता, धैर्यशीलता, समंजसपणा हे गुण असलेली व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी असणे गरजेचे आहे. नवे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो मुरब्बी राजकारणी आहेत. चाक्षाणपणा, धूर्तपणा व दूरदृष्टी त्यांच्यात आहे. २०१७ मध्ये होणार्या नियोजित राज्य विधानसभा निवडणुकीची पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
फालेरो यांनी पक्षाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी घेतलेले निर्णय योग्यच आहेत. जॉननी बरखास्त केलेल्या ४० गट समित्या व दोन जिल्हा समित्या पूर्वीप्रमाणेच कार्यरत ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तूर्त कोणतेही बदल नाहीत. गरज – वेळ आल्यास यथायोग्य पाऊल उचलले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दुखावलेले कार्यकर्ते त्यांच्यावर भिस्त ठेवून कार्यरत राहतील. पक्षविरोधी कृती करण्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही. ज्यांच्यावर आरोप होतील, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. नंतरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फालेरो यांनी पक्षजनांना दिल्याने मनात कसलीही भीती, अढी न ठेवता – बाळगता कार्यकर्ते निष्ठापूर्वक पक्षसेवेला झोकून द्यायला तयार होतील.
पक्षासंबंधीचा तळागाळातील जनतेपर्यंत उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना कंबर कसावी लागेल. सत्ताधारी भाजपावर उगाच वृथा, निराधार शरसंधान करणे टाळणे योग्य होईल. सामान्यजनांच्या मनापर्यंत जाऊन पोचणे गरजेचे आहे. तरच भाजपा मोहित लोक जे कॉंग्रेसपासून दूर लोटले गेले आहेत, ते स्वगृही परत येतील. हे एक दिव्य असे कार्यकर्म आहे. त्यासाठी पक्षनिष्ठा व सेवेचे अनुष्ठान हवे. वायफळ बडबड करून राजकीय नगारे बडविल्याने काहीच हाती लागणार नाही. अर्थात, पक्षाध्यक्ष फालेरोंना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहेच. त्याचे नेतृत्व आजी – माजी कॉंग्रेस नेत्यांनी स्वीकारल्याची ग्वाही त्यांना मिळाली आहे. आता त्यांना पुढील वाटचाल सावधगिरीने, संयमाने, गती कृतीशीलपणे समर्थ होऊन करावी लागेल. तरच पक्षाला गतवैभव प्राप्त होईल.
लोकशाही शासन व्यवस्थेत सत्ताधारी पक्षाएवढाच विरोधी पक्षही प्रबळ, सक्षम व कार्यक्षम असावा लागतो. तरच लोकशाही राजवट फलदायी होऊ शकते. सक्षम लोकशाहीसाठी, तिच्या संवर्धन, संरक्षणासाठी सशक्त पद्धतीचे राजकारण करणारा विरोधी पक्ष राज्याला लाभायला हवा. त्यासाठी राजकीय नेत्यांनी बुरसटलेली स्वार्थी, लोभी अहंपणाची राजकीय मानसिकता बदलायला हवी. जनता कालमानाप्रमाणे, परिस्थितीनुरूप बदलते. ती क्षमता जनतेत आहे. म्हणूनच तर राजकीय स्थित्यंतरे घडतात. काळाची गरज ओळखून! ह्याचे भान राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जरूर ठेवावे.
गोवा राज्याची सद्य राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधारी भाजपकडे आमदार संख्येचे एवढे प्राबल्य आहे की सरकार हवे ते निर्णय घेऊन राज्यकारभार चालवू शकते. ही सर्व धोरणे व निर्णय राज्याच्या हिताचेच असतील असे छातीठोकपणे म्हणणे कठीण आहे. म्हणूनच तर राज्याच्या हिताआड येणार्या अयोग्य धोरणांना, निर्णयांना समर्थपणे विरोध करून सरकारवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाला नाव कमवावे लागेल. जनतेच्या मनात स्थान मिळवावे लागेल. तसे घडले तरच कॉंग्रेस गोमंतकीय जनतेच्या ह्रदयसिंहासनावर आरूढ होऊ शकेल. ही किमया करून दाखवण्याचे कडवे आव्हानांचे धनुष्य फालेरोंना पेलणार का?