कठीण समय येता …

0
171

–  कु. तेजा तुळशीदास परब
(पालये, पेडणे- गोवा)

जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळी ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी साक्षात परमेश्‍वर तुमची साथ देतो.. असे म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये अडकलेले माझे कुटुंबीय आणि मी गोव्यात परत येण्यासाठी पुन्हा पुन्हा देवाला साकडे घालत होतो.

आनंद, खुशी, सुख, नैराश्य, दुःख या सार्‍या भावना आपल्या विचारांवर अवलंबून असतात. परिस्थिती कोणतीही असो आपण जर खुश राहायचे ठरवले तर ती परिस्थिती आपल्याला दुःखी करू शकत नाही. आपल्या मनावर, विचारांवर आपली हुकूमत असली पाहिजे. आम्हीदेखील उत्तर प्रदेशमध्ये आमचे मन रमवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी तेथील नवनवीन गोष्टींची माहिती मिळवीत होतो. मला फोटोग्राफीचे वेड आणि पर्यावरणाबद्दलचे आकर्षण असल्यामुळे तेथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे, त्याचबरोबर तेथे खूप प्रकारची झाडे पाहिलीत. ‘पाप्युलर ट्री’ ज्यापासून प्लायवुड बनतो, अनेक औषधी वेली, आडू, सतूतसारखी फळझाडे. ऊसाची शेती, ‘कोलू’ म्हणजे ज्या ठिकाणी ऊसाच्या रसापासून गूळ बनतो ती भट्टी. ही वेळ गहू कापणीची असल्यामुळे गहू कापणीचा मनसोक्त आनंद लुटता आला. ‘‘नाण्याला दुसरी बाजू असतेच.’’ तिथे कितीही चांगले असले तरी स्वतःच्या घरची ओढ ती वेगळीच.
जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळी ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी साक्षात परमेश्‍वर तुमची साथ देतो.. असे म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये अडकलेले माझे कुटुंबीय आणि मी गोव्यात परत येण्यासाठी पुन्हा पुन्हा देवाला साकडे घालत होतो. खूप प्रयत्न करीत होतो. तिथे कुणीतरी मदत करणारी व्यक्ती मिळावी आणि आमचा येण्याचा मार्ग खुलावा अशी आस धरून होतो. लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढू लागले तशी आमची व्याकूळतादेखील वाढत गेली. जास्त दिवस तिथे राहणे आम्हाला शक्य नव्हते. तिथे जेवण मुबलक होते परंतु आम्हाला ते पचत नसल्यामुळे दुकानातून शीतपेय, बिस्किट, शेव असे पदार्थ आणून आम्ही खायचो. त्यामुळे आमच्या जवळील पैसे खर्च झाले. आम्ही तिथे अडकल्याची बातमी प्रसारमाध्यमांद्वारे गोवाभर पसरली होती. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आमच्या संपर्कात होते. एके दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ३ मे या दिवशी लॉकडाऊन खुलणार याची शाश्‍वती नाही. तुम्हाला जर का भाड्याने गाडी मिळत असेल तर तुम्ही या.

अनेक हितचिंतकांचे फोन येत होते. मोरजी येथील एका गृहस्थाने आमच्यासाठी दत्तमंदिरात साकडे घातले होते. गोवा सरकारकडून परवानगी मिळणार हे नक्की होते पण उत्तर प्रदेश, सहारनपुर डी.एम्.ची परवानगी मिळविणे फार कठीण काम होते. अथक प्रयत्नांनी आमच्या शेजारच्या घरातील एका व्यक्तीशी आमची ओळख झाली. ‘संघाचा स्वयंसेवक’ या दोन शब्दांच्या ओळखपत्रावर त्यांनी आम्हाला भरभरून मदत केली. यांच्या संपर्कातून अजून दोन व्यक्तींशी आमची भ्रमणध्वनीद्वारे ओळख झाली. या तिघांच्या रूपात साक्षात त्रिमूर्ती आमच्यासाठी प्रकट झाली होती. त्यांनी शक्य तितके प्रयत्न करून आम्हाला डि.एम्.ची परवानगी मिळवून दिली.
त्यांनीच आम्हाला गाडी मिळवून दिली. गाडीवाला आम्हाला ओळखत नसल्याने त्याने आधीच सांगितले होते, ‘‘देखो भाई, मैं आपको पहचानता नही| इसलिए गाडी का पूरा किराया अभी दे दो |’’ आता त्याला सगळी रक्कम द्यायची कशी? बाबांनी त्याची समजूत घालून त्याला अर्धे पैसे दिले आणि उरलेले गोव्यात पोहचल्यावर देतो.. असे सांगितले. २९ तारखेला मध्यरात्री ११.४० वा. आम्ही गाडीत बसलो. ३० तारखेपासून आमच्या ट्रॅव्हल परमीटची वेळ सुरू होणार होती. वेळ वाया घालवणे आम्हाला परवडणार नव्हते. ४ तारखेपूर्वी गोव्यात पोहचायचे होते. प्रवास सुरू होऊन फक्त अर्धा तास झाला असेल आणि आम्ही रस्ता चुकलो. गाडी मागे वळवायच्या नादात ती चिखलात रुतली. घनदाट झाडीच्या त्या निर्जन ठिकाणी आम्ही अडकून पडलो. परंतु तिथे अचानक २ जण आमच्या मदतीला आले. ते कुठून आले? कसे आले? काहीच कळले नाही. परंतु गाडी आणि आम्ही सुखरुप तिथून बाहेर पडलो.

मध्यरात्री सुरू झालेला प्रवास थांबला तो ३० एप्रिल संध्याकाळी ६.३० वा. बाबा आणि ड्रायव्हर काका दोघेही गाडी चालवून खूप थकले होते. शिवाय गाडीलाही आराम हवा होता. पण कुठे थांबणार? अनोळखी जागा, त्यात सोबत मुली… असे असंख्य प्रश्‍न बाबांच्या डोक्यात येऊ लागले. ‘‘पोलीस स्टेशन निअर मी’’ असा गुगल शोध घेतला आणि जवळच्या एका पोलीस चौकीसमोर गाडी थांबवली. मध्यप्रदेशमधील शिवपुरी येथे बाबा आणि ड्रायव्हर काकांनी थोडा आराम केला. आम्ही सगळे पहारेकरी बनून आजुबाजूला पाहात होतो.

त्या पोलिसांनीसुद्धा आमचे हसतमुखाने स्वागत केले. गाडी चौकीसमोर थांबवून मी आणि बाबा त्यांची परवानगी घेण्यासाठी गेलो असता, आम्ही गोव्याला जातोय हे कळताच त्या पोलीस काकांनी विचारले, ‘‘थंडा पानी पियेंगे क्या?’’ त्यांचे ते मृदु बोल ऐकून खरेच धन्य वाटले. आमच्या जवळ सुक्या पुर्‍या होत्या. त्याच आम्हाला पूर्ण प्रवासभर खायच्या होत्या. मैद्याच्या पिठाच्या या टिकाऊ पुर्‍यांना मठरी म्हणतात. त्या खाऊन पोटात कसंसंच होऊ लागलं होतं आणि भूकही लागली होती. अशा वेळी पोलीस काकांनी जेवणाचे दोन डबे गाडीजवळ आणून दिले. रात्री १०.३० च्या दरम्यान पुन्हा प्रवास सुरू झाला. अशा परिस्थितीत ड्रायव्हर काकांवर विश्‍वास ठेवणे कितपत् योग्य होते? त्यामुळे बाबा तीन दिवस अजिबात झोपले नाहीत.

आमच्याकडे दोन्हीकडचे परवाने तर होतेच, परंतु प्रत्येक चेकपोस्टवर अडवले जायचे. ते त्यांचे कामच होते आणि त्यांना सहकार्य करणे आमचे कर्तव्य. पण ते नाना प्रकारचे प्रश्‍न विचारून नाकीनऊ करायचे. त्यात आम्ही जागरणामुळे वेगळेच दिसत होतो. तेलकट चेहरे, सुजलेले लाल लाल डोळे. त्यामुळे संशयाने आमच्याकडे पाहणार्‍या नजरा. दिवसा एकवेळ ठीक पण रात्री- अपरात्रीसुद्धा गाडीतून सगळ्यांना बाहेर उतरवले जायचे. त्यात आमच्या ड्रायव्हर काकांचा तापट स्वभाव. पोलिसांनी काही विचारायच्या आधीच ते म्हणायचे, ‘‘साहब, गाडी क्यो रोकी? परमीशन हैं हमारे पास’’. त्यामुळे पोलीससुद्धा चिडायचे आणि मग संशयाने आमची विचारपूस करायचे. मग मात्र मी सगळ्यांना सक्त ताकीद दिली- कुणीही गाडीजवळ आले तर फक्त मीच बोलणार. तेव्हा कुठे आमचे ड्रायव्हर काका बोलायचे बंद झाले. पण पुन्हा पुन्हा म्हणायचे, ‘‘गुडियॉं तो मुझे बातही नही करने देती|’’
उपवासाने मात्र आमचा फारच अंत पाहिला. त्यामुळे ड्रायव्हरकाकांना फारच अशक्तपणा आला होता. रात्रभर बाबा गाडी चालवायचे आणि दिवसा ड्रायव्हर काका. पूर्ण प्रवासात पोलिसांची विविध रुपे पहायला मिळाली. एके ठिकाणी आम्हाला रोखले असता एक महिला पोलीस अशी खेकसून अंगावर येत होती. समोरच्याला बोलूच देत नव्हती. शिवाय एकावर एक प्रश्‍न विचारत होती. तिने बाबांना बर्‍याचदा विचारले, ‘‘ये आपले बच्चे हैं?’’
पुढे घाटीगांव ग्वालियरमधील एका पेट्रोल पंपावर आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलो असता तेथील कर्मचार्‍यांच्या शांत हसतमुख स्वभावाने आम्हाला प्रसन्न वाटले.

१ तारखेला महाराष्ट्रात पोहोचल्यावर आम्हा सगळ्यांना खूप बरे वाटले. आमच्या ओळखीची काळी माती, उंचच उंच पहाड, गड- किल्ले, वेडीवाकडी वळणे या सगळ्या गोष्टी पाहून वेगळाच आल्हाद प्राप्त झाला. २ तारखेला पहाटे ३.३० वाजता आम्हाला निपाणी ते कागलमधील चेकपोस्टवर अडवले. तेथील पोलीस आम्हाला कर्नाटकमध्ये प्रवेश करायला देत नव्हते. शिवाय ते कन्नडशिवाय दुसरी कुठलीच भाषा बोलत नव्हते. आमचे काहीच ऐकून घेतले नाही. आमच्याजवळचे परमीटसुद्धा बघितले नाही. शिवाय सगळ्यांना उतरवून आमचे फोटो काढले. आम्हाला एक दुसरा रस्ता सांगितला आणि पुन्हा मागे परतवले. सगळीकडे फिरून फिरून आम्ही ६ वाजता पुन्हा त्याच चेकपोस्टवर आलो. आम्ही पुन्हा आल्याचे पाहून त्या पोलिसांनी आम्हाला गाडी बाजूला पार्क करण्यास सांगितले. या ठिकाणी आमचा बराच वेळ वाया गेला. त्यात परमीटची मुदत संपण्याची टांगती तलवार. सर्वांत आधी मी मुख्यमंत्र्यांना फोन लावला. त्यांनी तो लगेचच उचलला. त्यांनी सांगितले, ‘‘घाबरु नका, मी काहीतरी करतो.’’

इतक्यात बाबांना काहीतरी व्हायला लागले. त्यांच्यामध्ये उभे राहण्याचेसुद्धा त्राण नव्हते. आम्ही त्या पोलिसांच्या खूप विनवण्या केल्या की बाबांचा बीपी चेक करायला हवा म्हणून, पण ते आमच्याशी बोलायलाच तयार नव्हते. शेवटी रस्त्याच्या कडेला अंथरुण टाकून बाबा झोपले. मीही तिथेच बसले. बाकी सगळे गाडीत बसून होते. दरम्यान आम्ही आमच्याकडील सर्व रिकाम्या बाटल्या शोधून काढल्या, पैकी एका बाटलीत जरासा आमरस (स्लाईस) होता, तो बाबांना प्यायला दिला. त्यामुळे त्यांना थोडे बरे वाटले. तिथून ८ वाजता पोलिसांनी आमच्या गाडीला ग्रीन सिग्नल दिला. पुढे मात्र आम्ही धैर्याने पत्रादेवी गाठली आणि गोव्यात प्रवेश केला.
जीवनात अडचणी कितीही येवोत, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. गोमंतकात पोहचल्यावर आम्हालाही असाच आनंद प्राप्त झाला. आम्हाला मदत करणार्‍या प्रत्येकाच्या रूपात परमेश्‍वरच आमच्या सोबत होता.