भारतीय कसोटी क्रिकेटचे नरशार्दुल

0
286

 

  •  सुधाकर रामचंद्र नाईक

१९३२ पासून भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्यास प्रारंभ केला. उण्यापुर्‍या शतकभराच्या या कालखंडात भारतीय क्रिकेटने हळूहळू जागतिक क्रिकेटमध्ये आपला जम बसविण्यास प्रारंभ केला आणि सध्या भारतीय संघ जागतिक संघांच्या तोडीस तोड, तूल्यबळ बनला आहे.

 

भारतात क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानले जाते. १९३२ पासून भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्यास प्रारंभ केला. उण्यापुर्‍या शतकभराच्या या कालखंडात भारतीय क्रिकेटने हळूहळू जागतिक क्रिकेटमध्ये आपला जम बसविण्यास प्रारंभ केला आणि सध्या भारतीय संघ जागतिक संघांच्या तोडीस तोड, तूल्यबळ बनला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळ ते १९६० च्या अखेरपर्यंत भारतीय क्रिकेट संघाने सी. के. नायडू, लाला अमरनाथ, पॉली उम्रिगर, विजय मर्चंट असे अनेक दर्जेदार खेळाडू निर्माण केले. पण क्रिकेट संघ म्हणून भारतीय संघ विशेष बलशाली ठरू शकला नाही. वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी बलाढ्य संघांविरुध्द संघर्ष करताना दिसला. १९७० पासून मात्र भारतीय क्रिकेट संघाने हळूहळू जम बसवीत सुसंगठीत, बलशाली ठरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. या कालखंडात लिटल मास्टर सुनिल गावस्कर, गुंडाप्पा विश्‍वनाथ, मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, तसेच फिरकी त्रिकुट बिशन सिंग बेदी, बी. एस. चंद्रशेखर, एरापल्ली प्रसन्ना आदी अथीरथीनी आपले कौशल्य प्रगटवीत भारतीय संघाला एक नवचैतन्य देत विदेशी संघांना आव्हान देण्यास प्रारंभ केला. १९७० च्या कालखंडात अष्टपैलू कपिल देवच्या आगमनाने भारतीय संघाला नवे परिमाण प्राप्त झाले. भारतीय द्रूतगती गोलंदाजांनी आपले आधिपत्त्य दाखविण्यास प्रारंभ केला आणि तुल्यबळ संघांविरुध्द आपले नाणे खणखणीत असल्याचे दर्शविले. पण तरीही सातत्याचा अभाव मात्र जाणवायचा. १९९० च्या दशकात भारतीय संघ स्वगृही बलशाली मानला जाऊ लागला. पण विदेशातील पीछेहाट मात्र पिच्छा सोडीत नव्हती. २१ व्या शतकात मात्र भारतीय संघात नव्या दमाचे खेळाडू निर्माण झाले आणि जगातील सर्वोत्तम संघात ‘मेन इन ब्ल्यूज’ची गणना होऊ लागली. भारतीय संघात एकाहून अधिक ‘मॅच विनर्स’ निर्माण झाले आणि विदेशातही सामने जिंकण्याचे कर्तृत्व गाजविले. भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट विश्‍वात मानाचे स्थान मिळवून दिलेल्या भारतीय क्रिकेटमधील नरशार्दुलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना पाच नामवंत क्रिकेटवीरांच्या  कसोटी क्रिकेटमधील मर्दुमकीचा आलेख सादर करण्याचा हा प्रपंच…

कपिल देव

भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये उच्चतम दर्जा प्राप्त करून दिलेल्या खेळाडूंच्या यादीत १९८३ मधील विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देवचे नाव अग्रेसर ठरते. भारताच्या या सर्वश्रेष्ठ अष्टपैलूने आपल्या अभूतपूर्व कर्तृत्वाने भारतीय क्रिकेटला नवी दिशा, नवे तेज दिले म्हटल्यास वावगे ठरू नये. कपिल देवच्या आगमनाआधी भारतीय गोलंदाजीची मदार सर्वस्वी फिरकीवर अवलंबून असायची, पण नंतर हे चित्र पालटले. कपिलपासून प्रेरणा घेत भारतीय संघात नव्या दमाच्या मध्यमगती गोलंदाजांचा उदय झाला आणि द्रुतगतीच्या जोरावरही आपण कसोटी सामने जिंकू शकतो हे त्यानी सिध्द केले. कपिलचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ दर्जेदार तेज गोलंदाज नव्हे तर मध्यल्या फळीतील धडाकेबाज फलंदाजही होता आणि त्याने आपल्या या कर्तृत्वावर भारताला अनेक विजय मिळवून दिले. १९८३ मध्ये भारताला सर्वप्रथम क्रिकेट विश्‍वचषक जिंकून दिलेल्या कपिल देवने १३१ कसोटीत ८ शतकांसह ५२४८ धावा नोंदल्या आहेत. ४३४ कसोटी बळींच्या विश्‍वविक्रमासह आंतरराष्ट्रीय कसोटी संन्यास घेतलेल्या कपिलने २३ वेळा डावात ५ बळी आणि २ वेळा सामन्यात १० बळी अशी मर्दुमकही गाजविलेली आहे.

सुनिल गावस्कर

‘लिटल मास्टर’ सुनिल गावस्कर हा भारताचा सर्वश्रेष्ठ सलामीवीर. एवढेच नव्हे तर क्रिकेटविश्‍वातील सर्वोत्तम कसोटी सलामीवीर म्हणूनही गावस्करची गणना होते. आपल्या अजोड, अद्वितीय फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्‍वाला मोहीत करणारा गावस्करचा हा भारतीय फलंदाजीचा पहिला शिरोमणी होय. जगातील भयावह तेज गोलंदाजीचा ‘विना हॅल्मेट’ निर्भीडपणे सामना करणार्‍या लिटल मास्टरची नजाकतदार फलंदाजी ही क्रिकेट विश्‍वातील तमाम युवा फलंदाजांसाठी प्रेरणादायी, आदर्श गणली जायची. एकाग्रचित, धीरोदात्त फलंदाजीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावांचा टप्पा ओलांडलेल्या गावस्करनी ३४ शतकांच्या विश्‍वविक्रमासह कसोटी क्रिकेटला अलविदा केले. १२५ कसोटीत विक्रमी ३४ शतकांसह १०,१२२ धावा (सर्वोच्च नाबाद २३६) नोंदलेल्या सुनिल गावस्करनी आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत द्रुतगती गोलंदाजीला विशेष स्थान दिले आणि फलस्वरूप कपिल देव नामक ‘हिरा’ भारतीय क्रिकेटला लाभला.

राहुल द्रविड

‘दी वॉल’ म्हणून गणला गेलेला राहुल द्रविड हा धैर्याचा महामेरू भारतीय कसोटी क्रिकेटमधील तृतीय स्थानावरील सर्वश्रेष्ठ फलंदाज. विलक्षण संयम, एकाग्रचित आणि अचाट तंत्रशुध्दपणे यष्टीवर ठामपणे ठाकणारा राहुल प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी भयावह स्वप्न ठरायचा. आपल्या अभिजात शैलीने ठामपणे यष्टीवर अभेद्यपणे ठाकत भारतीय संघाला सावरणार्‍या राहुलने विदेशी खेळपट्ट्यांवरही आपली भूमिका चोखपणे बजावीत ‘मिस्टर कूल’ ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ अशा उपाध्या मिळविल्या. भारतीय संघाला कठीण प्रसंगी सावरण्याची भूमिका समर्थपणे पेललेल्या राहुलने अनेक संस्मरणीय ‘मॅचविनिंग’ खेळींसह १६४ कसोटीत ३६ शतकांसह १३,२८८ धावा नोंदल्या असून कर्णधार म्हणूनही  आपली गुणवत्ता सिध्द केली होती.

अनिल कुंबळे

भारतीय फिरकीला नवे आयाम मिळवून देत सहाशेहून अधिक बळी घेतलेला अनिल कुंबळे हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ ‘मॅचविनर’ गोलंदाज होय. अनिल कुंबळेच्या जादुई फिरकीमुळे भारतीय संघ स्वगृहीच्या मालिकांत नेहमीच ‘अजेय’ ठरायचा. अनिल कुंबळेने आपल्या अद्वितीय फिरकीवर भारताला अनेक विजय मिळवून दिलेले असून त्याच्या वीरोचीत मर्दुमकीमुळे भारतीय संघाला स्वगृहीचे ‘पॉवरहाउस’ अशी उपाधी लाभली होती. १३२ कसोटीत तब्बल ३५ वेळा डावात पाच बळी आणि ८ वेळा  सामन्यांत दहा बळी अशा विस्मयकारी कामगिरीसह ६१९ बळींचा कीर्तीमान प्रस्थापिलेल्या कुंबळेने आपल्या वीरोचित मर्दुमकीने बिशन सिंग बेदी, बी. एस. चंद्रशेखर आणि एरापल्ली प्रसन्ना या त्रिकुटाची कामगिरीही झाकोळली होती. कर्णधार म्हणूनही अनिल कुंबळेने भारतीय संघाला यश मिळवून दिलेले आहे.

सचिन तेंडुलकर

भारतीय कसोटी क्रिकेटशार्दुलांची ही यादी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरच्या अजोड कर्तृत्वाने धवलांकित ठरते. ‘वंडरबॉय’ सचिन तेंडुलकर हा भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटचा निर्विवाद क्रिकेट शिरोमणी होय. आपल्या अजोड, अद्वितीय फलंदाजीने जगभरातील तमाम युवा क्रिकेटपटूंचा ‘रोल मॉडल’ भारतीयांचा ‘क्रिकेटचा देव’ गणला गेलेल्या या महान फलंदाजाने आपल्या अद्वितीय मर्दुमकीने ‘क्रिकेटचा कोहिनूर’ आपणच असल्याचे सप्रमाण सिध्द केलेले आहे. किशोरवयात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सचिनने सुमारे दोन तपांच्या क्रिकेट तपश्‍चर्येत आपला धवलांकित ठसा उमटविताना कसोटी क्रिकेटचे द्विशतक (२०० सामने) नोंदवीत अनेकविध अजोड, अलौकिक पराक्रमांसह, ५१ शतकांसह १५,९२१ धावा नोंदल्या आहेत. सचिनने कसोटीच नव्हे तर मर्यादित षट्‌कांच्या क्रिकेटमध्येही अनेक भीमपराक्रम नोंदले आहेत. भारतीय क्रिकेटला क्रिकेट क्षितिजावर उच्चतम स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेला सचिन जागतिक क्रिकेट क्रमवारीतही अव्वल मानकरी ठरावा.