कचरा प्रकल्पाजवळ बांधकामांना मान्यता देणार्‍यांवर कारवाई करा

0
11

>> मोन्सेरात यांची विश्‍वजीत राणेंकडे मागणी

बायंगिणी-जुने गोवे येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्याजवळ बांधकामांना मान्यता देण्यात आल्याने कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नाराजी व्यक्त केली असून, कचरा प्रकल्पाच्याजवळ बांधकामांना मान्यता देणार्‍या नगरनियोजन खात्याच्या (टीसीपी) अधिकार्‍यांवर नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी कारवाई करावी, अशी मागणी काल केली.

जुने गोवे येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी नव्याने विरोध करण्यास प्रारंभ केल्याने कचरा प्रकल्पाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रादेशिक आराखडा २०११ मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या आसपास ५०० मीटरचा बफर झोन दाखविण्यात आलेला आहे. नगरनियोजनच्या अधिकार्‍याकडून कचरा प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीच्या लगतच बांधकामाला कशी मान्यता दिली, असा प्रश्‍न मोन्सेरात यांनी केला. नगरनियोजन खात्याने ५०० मीटरचा बफर झोन २०० मीटरवर आणला आहे. या बफर झोनमध्ये कुणी बदल केला, याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.