कंदील

0
1600

घरात माझ्या जन्मानंतर काही वर्षे मी रॉकेलच्या उजेडाचा अनुभव घेतलाय. चिमणी, कंदील, दिवा, बत्ती यांचा अनुभव आणि त्या उजेडाची सवय जन्मापासूनच आहे. संध्याकाळच्या शांत आणि थरथरत्या कातरवेळी देवांकडील शांतपणे तेवत असणारा मंद असा दिवा. घरात संध्याकाळच्या त्या कातरवेळी तुळशीकडे माझी आई तेलवातीचं निरांजन लावायची. देवांकडे एक तसंच निरांजन आणि अगरबत्ती पेटवायची. त्या निरांजनाच्या मंद उजेडात आणि अगरबत्तीच्या सुगंधी सुवासानं घरातील सांजेला एक वेगळंच रूप यायचं. त्यानंतर आजी माजघरात, ओसरीवर एकेक रॉकेलचा दिवा त्याला चिमणी म्हणतात, ती पेटवून ठेवायची. आजीचा एक लहानसा कंदील होता. तो कंदील रात्री आपल्यासोबत उजेडासाठी घेऊन ती झोपायची. तो कंदील पेटवायची. हळूहळू काळोखाचं साम्राज्य नष्ट व्हायचं आणि त्या चिमणीच्या उजेडाचं राज्य सुरू व्हायचं.

दादा आम्हां तिन्ही भावंडांना घेऊन देवांसमोर बसायचे. आम्हांला ते गणपती स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, श्रीरामरक्षा व मारुती स्तोत्र क्रमाने शिकवायचे. त्यानंतर मराठी महिने, नक्षत्रं, वार, वगैरे झाल्यानंतर मी व माझी बहीण तिथून उठायचो. दादा मग माझ्या मोठ्या भावाला भाईला महिम्न स्तोत्र शिकवायचे. हा परवचा साधारण एक तास तरी चालायचा. त्या दरम्यान माझी आजी व आई स्वयंपाक घरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. दादा मग गोठ्यातील म्हशींना चारा-पाणी करण्यासाठी उठून जात. त्यावेळी त्यांच्यासोबत मी किंवा भाई ‘कंदील’ घेऊन जात होतो. कंदिलात वात घालायची, त्यात रॉकेल घालायचं हे आमच्यासाठी त्यावेळी मोठं काम असायचं. जुनी वात जर लहान झाली असेल तर नवीन वात घालायची आणि ती जुनी वात पेटवायची. त्यामुळे मोठा उजेड पडून घर कसं प्रकाशानं लख्ख उजळायचं. काच पुसणे हा प्रकारही तसा मोठा होता.
‘हाताला लावून घ्याल रे काच..’ दादा किंवा आजी अधून मधून आम्हांला सावध करायची. काचेवर ज्योतीमुळे काजळी पसरायची, ती पुसून काच स्वच्छ धुतल्यासारखी करायची हे भावाचं काम. मी त्याला त्यावेळी सहज म्हणून मदत करत होतो. पण मी कधी तशी काच पुसायचं काम हाती घेतलं नाही. किंवा स्वतंत्रपणे केलंही नाही. आजीचा छोटासा कंदील होता. त्याची मात्र आम्हांला कधीच साफसफाई करावी लागली नाही. कारण ते सगळं काम आजीच करत होती. अगदी छोटा मिणमिणता दिवा. पण रात्रीच्या अंधारात तोच दिवा जणू लख्ख प्रकाश देणारा सूर्यच भासावा असा उजेड देत होता.
या कंदिलाला बाहेरून काच असल्यामुळे वार्‍या-पावसात या कंदिलाचा उजेड जाण्याची किंवा कंदील विझण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे या कंदिलाचा उपयोग अशा वार्‍या-पावसात मोठ्याप्रमाणात केला जायचा. आमच्या घराच्या मागे अनेक लोकांच्या सुपारीच्या बागा आहेत. या बागायतीला पाणी देण्यासाठी शिंपण्यासाठी पाटाचं पाणी आहे. मात्र, या पाटाच्या पाण्याची वाटणी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला ठराविक तास पाणी वापरता येतं. त्या वेळेत त्याने आपल्या बागायतीला पाणी द्यायचं असतं. कधी कधी एखाद्यावर रात्रीच्यावेळीही पाणी शिंपण्याची वेळ येते. त्यावेळी सदर मालक आपल्यासोबत कोणा कामगारांना घेऊन कंदिलाच्या उजेडात हे पोफळींना पाणी देत असतो. आम्हीही हा अनुभव घेतलेला आहे. कंदिलाच्या उजेडात झाडाच्या मुळापर्यंत पाणी शिंपलेलं आहे की नाही हे पहायचं. त्यावेळी पाणी शिंपण्यासाठी आमच्याकडे शिवणीच्या झाडाची एक विशिष्ट प्रकारची रचना केलेली लाकडी वस्तू होती. त्याला ‘करले’ म्हणतात. आजही ती आहेत; पण अगदी नगण्य. त्या करल्यांनी पाणी शिंपण्याचं काम चालतं. रात्रीच्यावेळी शांत वातावरणात बागायतीत हे शिंपण चालू असताना केवळ शिंपलेल्या पाण्याचा ‘झप झप’ असा आवाज येत असतो आणि त्याठिकाणी उभा केलेला कंदील दिसत असतो.
हा कंदील बर्‍याचवेळा प्रवासातही उपयोगी पडतो. रात्रीच्या प्रवासात वार्‍यामुळे कंदील विझत नाही. चालत जात असताना हातात काठी आणि कंदील घेऊन कित्येक लोक असा प्रवास करत असताना मी पाहिलेले आहेत. रात्री शिंपण्यासाठी येत असलेले बागायतीचे मालक आमच्या घरी येऊन चहा पाणी घेऊन मग खाली बागायतीत उतरत. त्यामुळे अशावेळी आल्यानंतर ते रात्रीच्या प्रवासातील काही गोष्टी सांगत. बर्‍याचवेळा घोटगेवाडी (आमच्या गावापासून दोन किमी अंतरावर असलेलं गाव) येथून हे लोक येत.
घरापासून जवळच असलेल्या शेतात माळा राखण्यासाठीही असे लोक येत. तेही सोबत कंदील घेऊन येत. माळा राखण्यासाठीही कंदिलाचा उपयोग होई. आज मात्र हे शिंपणे कमी झालेलं आहे. कारण प्रत्येकजण पंपाच्या पाण्याचा वापर करतो. शिंपण्यासाठी तेवढा वेळही नाही. शेती जवळ जवळ बंदच झालेली आहे. त्यामुळे माळाही बंद झालेला आहे. त्यामुळे माळ्यासाठी कंदिलाचा वापर ही संकल्पनाच बंद पडलेली आहे. मुळात आज गावात वीज आलेली असल्यामुळे कंदिलाचा वापरही कमी झालेला आहे. रात्रीच्या वेळचा प्रवास आता चालत कोणी करत नाही. ज्याच्या त्याच्याजवळ आज दुचाकी झालेली आहे. त्यामुळे चालत जाणे दुरापास्त झालेलं आहे. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात वाटचाल करण्याचे दिवसही सरलेले आहेत.
दीपावलीच्या दिवसांत थंडी सुरू होते. एक विशिष्ट प्रकारचे हिरव्या रंगाचे लहान प्राणी या दिवसांत संध्याकाळच्या वेळी येतात. कंदील पेटवला की त्याच्या काचेवर हे प्राणी फिरत ज्योतीभोवती पिंगा घालत असतात. पणत्या किंवा मेणबत्त्या पेटवल्या की त्याभोवती फिरताना हे प्राणी आत्महत्या करतात. हिरव्या टोळांप्रमाणेच पण लहान असणारे हे प्राणी कंदिलामुळे मात्र जळत वा भाजत नाहीत. हे प्राणी शुभ्र काचेवर बसले की कसं हिरवंगार दिसायचं. आम्ही त्यांना बोट लावायचो त्यावेळी ते उडून जायचे; पण पुन्हा त्या काचेवर येऊन बसायचे. त्यावेळी कधी कधी आमचे हात मात्र भाजायचे. मात्र ते हिरवे प्राणी मात्र त्यावर अगदी आरामात बसायचे. आज ते प्राणी कुठे गायब झाले माहीत नाही. तसे ते दिसतात; पण त्यांची संख्या अगदीच नगण्य झाली आहे.
या कंदिलाच्या उजेडात आम्ही अभ्यासही केलेला आहे. आम्ही भावंडं कंदिलाच्या सभोवताली बसून आपापला अभ्यास करत असू. त्यावेळी कंदिलाभोवती वेगवेगळे प्राणी जमा होत. त्यांच्यासोबत खेळण्यातच आमचा अभ्यास होऊन जाई. या कंदिलाच्या जेवढं जवळ जाऊ तेवढी मोठी सावली दिसायची. जेवढे लांब जाऊ तेवढी सावली लहान होईल. मी व माझा भाऊ या कंदिलाच्या प्रकाशात हा खेळ हमखास खेळत असू. मात्र काहीच दिवस हा आनंद आम्हांला उपभोगता आला. कारण काही वर्षांतच आमच्या गावात वीज आली आणि कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करण्याचे दिवसही सरले. विजेच्या लख्ख उजेडात कंदिलाचा उजेड मिणमिणता वाटू लागला. जेव्हा वीजपुरवठा खंडित होईल तेव्हा अडगळीत पडलेल्या कंदिलाला सोन्याचे दिवस येतात. मात्र त्यावेळी या कंदिलाचा उजेड अगदीच कमी प्रतीचा वाटू लागतो. त्यातही आज रॉकेल जास्तच महाग झालेलं आहे. त्यामुळेही कंदिलाच्या वापरावर मर्यादा आलेल्या आहेत. मात्र तरीही एकेकाळी याच कंदिलानं सोन्याचे दिवस पाहिले होते.
रात्रीच्या वेळी बैलगाडीने प्रवास करताना हमखास उपयोगी पडणारा हा कंदील. रात्रीच्या वेळी उजेड दाखवण्याचं काम करणारा, बैलगाडी येत आहे हे दाखवणारा हा कंदील बैलगाडीचा एक सखा सोबती होता. रात्रीच्या मस्त प्रवासात छुन्नक छुन्नक असा गळ्यातील घुंगरांचा आवाज करत संथ गतीने गाडी घेऊन जाणारे बैल, त्या कंदिलाच्या प्रकाशात कशा प्रकारे आपल्या घरची वाट शोधत असावेत असा प्रश्‍न मला नेहमी पडलेला असायचा. आता त्याचं उत्तर शोधायचं झाल्यास सध्या ती बैलगाडीही नाही आणि तो कंदीलही! या आधुनिक जगाच्या आक्रमणाने कुठेतरी शोपीस म्हणून दाखल झालेला आहे. ग्रामीण भागाच्या आनंदी पर्वातील हा आणखी एक मोती घरंगळून जात आहे. तोही काही वर्षांनी पुढील पिढीला आमच्या जमान्यात एक ‘कंदील’ होता असं सांगावं लागेल.
………