ओवाळीते भाऊराया…

0
188
  • पौर्णिमा केरकर

खरेतर राखी हा एक छोटा धागा, पण तो माया, प्रेम, जिव्हाळ्याचा असल्याने त्याला आपल्या संस्कृतीत वेगळे महत्त्व आहे. सण-उत्सवांची परंपरा या भूमीत इथल्या स्त्रीमनांनी अगदी मनःपूर्वक जतन केली आहे. पूर्वी रक्षाबंधन काही काही प्रांतांपुरते मर्यादित होते; आता देशभरात प्रतिकात्मकतेनेही हा सण साजरा केला जातो.

भरल्या बाजारात भाऊ बहीण भेटली
तुझी नि माझी माया बंधू, कशाने रे तुटली
काय मी सांगा भयनी, नार अभन्ना भेटली
भाऊ नि बोलावी, भयनी जेऊया दूधभात
भावजय काई म्हणे, दही ओतीला गाईरेत
भाऊ नि गे बोलवी, भयनी ये गे तू आदर्‍याला
भावजय कायी बोले, ननांद नको ती शेजार्‍याला
भावान दिली चोळी, भावजय देईना सुई दोरो
पाठीचो बंधू खरो, मिया बघीन तुझो तोरो
भाऊंनी गे आपलो, भावजय ती लोकाची
जानिया गोनावली, सरपळी गोपाची…
हे एक लोकगीत. भावा-बहिणीचे नाते अधोरेखित करणारे. भावा-बहिणीच्या नात्याचे लोकसंस्कृतीतील महत्त्व आगळेवेगळे असेच आहे. जात्यावरील ओव्यांचा कितीतरी मोठा भाग हा या नात्याची महती वर्णन करताना दिसतो. आपल्या संस्कृतीत भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन खास करून भावा-बहिणीच्या नात्याला वाहिलेले सण आहेत. बहिणीसाठी भाऊ नेहमीच खास राहिलेला आहे. भावा नि भयणीचो, काय वांगड पाखडाचो, केरी नि गावात वड पिकलो साखरेचो…’ अशा ओवीतून तर या नात्याचे रेशमी बंध किती अतूट होते याचेच वर्णन केलेले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटाला प्रेमाचा धागा बांधते, तर भाऊ या बदल्यात बहिणीला तिचे आजन्म रक्षण करण्याचे वचन देतो. हुमायून बादशहाला कर्मावतीने राखी बांधली. त्यामुळे हुमायून तिचे रक्षण त्यांच्या शत्रूला नामोहरम करून करतो असे सांगितले जाते. खरेतर राखी हा एक छोटा धागा, पण तो माया, प्रेम, जिव्हाळ्याचा असल्याने त्याला आपल्या संस्कृतीत वेगळे महत्त्व आहे.

सण-उत्सवांची परंपरा या भूमीत इथल्या स्त्रीमनांनी अगदी मनःपूर्वक जतन केलेली आहे. पूर्वी रक्षाबंधन काही काही प्रांतांपुरते मर्यादित होते. आता मात्र देशभरात प्रतिकात्मकतेनेही हा सण साजरा केला जातो. एकत्र कुटुंबपद्धतीत समूहाची शक्ती मोठी असायची. भावाला बहीण हवीच असायची. एरव्ही वंशाचा कुलदीपक म्हणून मुलाचा जन्म महत्त्वाचा मानला जायचा. आजही या मानसिकतेत बदल तसा झालेला नाही. मोठ्या कुटुंबात सख्खी-चुलत हा भेदभावच नसायचा. असायचे ते बहिणीचे नितळ निरामय प्रेम.

रक्षाबंधन येते तेच मुळी श्रावण महिन्यात. या महिन्याची सुरुवात नागपंचमीने होते. गृहिणी-माता-भगिनींनी सापाला भाऊ मानलेले आहे. या दिवशी भावासाठी उपवास करून व्रत करतात. भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे ओवाळणी करून घेण्यासाठी येतो, तर रक्षाबंधनात बहीण भावाकडे जाते. भावाला राखी बांधून ती तिच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवून निर्धास्त होते. हे असे निर्धास्त होणे आजकालच्या काळात खूपच कठीण झालेले आहे. सभोवतालची परिस्थितीच अशी झाली आहे की मुलींचे, महिलांचे सहजपणे कोठेही ये-जा करणे आता मुश्कील होऊन बसले आहे.

आपल्या देशात निर्भया प्रकरण झाले. हे असे एकमेव प्रकरण नसून त्यानंतर अशाच कितीतरी घटना घडल्या आहेत. भाऊ म्हणून ज्याच्यावर विश्वास ठेवावा त्यानेच तर बहिणीचा घात केलेला असतो. भावाविषयीचे प्रेम, पराक्रम, संयम, साहस हे गुण तर रक्षाबंधनसारख्या नितळ सणांचे आधारस्तंभ आहेत. समाजातील जो घटक दुबळा, असहाय्य आहे त्याला आधार देणे हे सबल वर्गाचे आद्य कर्तव्य आहे. या सणामागे ही कर्तव्य भावना आहे. परंतु आज हे सगळेच सामर्थ्य-संयमाचे संदर्भच बदलले आहेत. म्हणूनच आता मुली, तरुणी, महिलांनी स्वतःमध्ये बदल करायला हवा. हा बदल फक्त बाह्यांगाचा नसून अंतर्बाह्य सशक्त बदलाची मोठी गरज आज निर्माण झाली आहे. नुसतीच चेहर्‍याची रंगरंगोटी करून सौंदर्याची व्याख्या करत न बसता शारीरिक, वैचारिक सक्षमता कशी आत्मसात करायची यावर लक्ष केंद्रित करून व्यायाम, आहार, योग, कराटे, ज्युडो वगैरे गोष्टीत रमायला हवे.

आज भावा-बहिणीच्या नात्यातसुद्धा गैरसमज, तिरस्कार, अव्यवहार्यता पावलोपावली दिसत आहे. नाती ही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी असतात. ही नातीच जर एकमेकांना खाली खेचण्यासाठी एकमेकांचे पाय ओढू लागली तर कितीही खर्चिक, आकर्षक राखी बांधून त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. येथे मला आठवतात ते भारताचे माजी राष्ट्रपती आदरणीय डॉ. अब्दुल कलाम. डॉ. कलमांचे बालपण, तारुण्य अगदीच पराकोटीच्या हलाखीत गेले. त्यांच्या भगिनीचे लग्न जेव्हा ठरले होते, त्याचवेळी डॉ. कलामांना फी भरण्याची गरज होती. डॉ. कलामांच्या बहिणीच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तिने मागचा-पुढचा विचार न करता लग्नासाठी केलेले स्वतःचे दागिने विकून त्यातून फीचे पैसे भरले. बहिणीने भावासाठी केलेला हा असीम त्याग आहे. ही खरी भावा-बहिणीच्या नात्याची उत्तुंगता आहे. उत्तरांचलातील भाऊ तर आपल्या बहिणींच्या शिक्षणासाठी, घरच्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी स्वतः शिक्षण कमी घेतात व बहिणी कुटुंबाच्या स्थैर्यासाठी राबतात. आपल्या देशात सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाईसारख्या आदर्श बहिणींचा जन्म झाला. त्यांनी समाजमनाला विचार दिले, प्रेरणा दिली. एवढेच नाही तर आत्मसन्मानाने जगण्याची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. आताच्या भगिनी, तरुणी या उद्याच्या माता आहेत.

लग्न झाल्यावर पहिलं अपत्य हे मुलगाच हवा ही मानसिकता असते. मुलगा हा वंशाचा दिवा असे मानणारा मोठा गट हा स्त्रियांचाच आहे. घरात मुलगा-मुलगी अशी अपत्ये असली तर आईच प्राधान्याने त्या दोघांनाही वाढवताना भेदभाव करते. संस्कार-संस्कृतीचे जतन ही मुलीची जबाबदारी. मुलगी कितीही शिकली, उच्च पदावर पोहोचली तरीही तिने आदर्श गृहिणी कसे बनावे याचेच धडे दिले जातात. हे असे करताना मुलाने कसे वागायचे? त्याने बहिणीला, आईला, समाजातील इतर घटकांना कसे वागवायचे? त्याचे स्वावलंबन, यावर मात्र लक्ष दिले जात नाही. मुलीला विचाराबरोबर आदर्श गृहिणीची दीक्षा हवीच, त्याचबरोबर मुलाचीही जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे हेही मनावर बिंबवायला हवे. अर्थात आज सर्वच पातळ्यांवर आमूलाग्र बदल झालेला आहे. नात्यांच्या संकल्पना बदलल्या आहेत. लोकगीतातील भावा-बहिणीच्या नात्यातील अमरत्व
कोठेतरी लुप्त झालेले आहे. लग्न झालेल्या भावाला बहीण विचारते, की तू पूर्वीसारखा माझ्यावर प्रेम करीत नाहीस तेव्हा भाऊ तिला म्हणतो की मला बायकोच अशी विचित्र भेटली आहे की त्यामुळे तुझ्यापासून मी दुरावलो आहे. या नात्यात कितीही अडचणी
आल्या तरी बहीण भावाप्रती कृतज्ञच राहते. ती भावासाठी गाते. मेघरायाला म्हणते-
लाग लाग रे मेघराया
माझ्या बंधवांच्या शेतावर
‘राखी’ या शब्दातच राखणे, संरक्षण पुरविणे असे आहे. श्रावण पौर्णिमा, पोवती पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा असं लावण्य या सणाला वेढून आहे. कापसाच्या सुतापासून नऊ धाग्यांची जुडी करून तिला चोविस गाठी मारतात. यात देवदेवतांचा अधिवास असतो असे मानले जाते. हे जानवे देवाला वाहातात, गळ्यात बांधतात. त्यामागील हेतू हा निर्मळ, नितळ नाती निर्माण करण्याचा.
राखीरूपी धागा हा रेशीम नात्यांचे प्रतीक आहे. हे नाते मध्ये मध्ये थोडे ताणले तरी हरकत नाही पण तुटता कामा नये याची काळजी बहीण-भावाने घेतली पाहिजे. लोकगीतामधील या नात्याचे रेशिमबंध याचसाठी तर पुन्हा पुन्हा आठवतात-
सावळी परातली नि गे दारातल्या असनाची
वाट नि मिया बगी, माज्या पाठीच्या रतनाची
सावळी परातली नि गे पर्वता डोंगराची
वाट नि मिया बगी, माज्या पाठीच्या बंधवाची