लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध काल मंगळवारी विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्तावाची नोटीस सादर केली. त्यावर 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे आता ओम बिर्ला आता लोकसभेत उपस्थित राहणार नाहीत. अविश्वास प्रस्ताव बाद झाल्यानंतरच ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. या प्रस्तावावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह 118 खासदारांनी सह्या केल्या आहेत. मात्र या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सही केलेली नाही. या प्रस्तावात तृणमूल काँग्रेसने सहभाग घेतलेला नाही. काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, मुख्य प्रतोद कोडिकुनिल सुरेश, खासदार मोहम्मद जावेद आणि इतर सदस्यांनी मिळून ही नोटीस दाखल केली. नोटीस सादर झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सचिवालयाला प्रस्तावाची पडताळणी करून प्रक्रिया जलदगतीने पुढे नेण्याचे निर्देश दिले आहेत. 9 मार्च रोजी सभागृहात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. 13 फेब्रुवारी हा चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर 8 मार्चपासून सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होईल.