>> इन्साकॉगकडून स्पष्ट; ओमिक्रॉनच्या नव्या प्रकाराचेही रुग्ण सापडले
गेल्या महिनाभरापासून देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तसेच दिवसाला सव्वातीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकमध्ये दिवसाला प्रत्येकी ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यात आता आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. कोरोनावर लक्ष ठेवणारी केंद्र सरकारची समिती इन्साकॉग (आयएनएसएसीओजी) ने ओमिक्रॉन आता समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ओमिक्रॉनच्या नव्या प्रकाराचेही रुग्ण देशात सापडू लागले आहेत.
इन्साकॉगची स्थापना २५ डिसेंबर २०२० रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून करण्यात आली. ही समिती भारतातील कोविड-१९ आणि विषाणूच्या प्रकारांच्या जीनोम अनुक्रमांचा अभ्यास आणि निरीक्षण करते.
ओमिक्रॉनची आतापर्यंतची बहुतेक प्रकरणे लक्षणे नसलेली किंवा सौम्य आहेत. सध्याच्या लाटेमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि आयसीयूची प्रकरणे वाढली आहेत. भारतात आता ओमिक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असून, अनेक महानगरांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ओमिक्रॉनचा सर्वात जास्त प्रसार दिल्ली आणि मुंबईमध्ये होत आहे. भारतात ओमिक्रॉनचा पुढील प्रसार आता परदेशी प्रवाशांद्वारे नव्हे, तर अंतर्गत संक्रमणाद्वारे होणे शक्य आहे, असा इशाराही इन्साकॉगने दिला आहे.
ओमिक्रॉनपासून निर्माण झालेल्या बीए.२ या दुसर्या विषाणूचे रुग्ण भारतात सापडल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. याचबरोबर युरोपमध्ये या नव्या प्रकाराचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले आहे.
देशात कोरानाचे नवे ३,३३,५३३ रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,३३,५३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत ४ हजार १७१ रुग्णांनी कमी आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ५२५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मागील २४ तासात २ लाख ५९ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या २१ लाख ८७ हजार २०५ एवढी आहे, तर दैनंदिन संक्रमण दर १७.७८ टक्के आहे.