ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कता बाळगा : मोदी

0
14

>> मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना सल्ला; नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून काल देशवासियांना कोरोना संसर्ग आणि ओमिक्रॉनबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला. कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकारावर आपले वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. दररोज मिळत असलेल्या डेटाच्या आधारावर काम केले जात आहे. ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने सजग, सावध राहिले पाहिजे. तसेच स्वयंशिस्त बाळगली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. ओमिक्रॉनला आपली सामूहिक शक्तीच पराभूत करेल. त्याच जबाबदारीने आपल्याला २०२२ चे स्वागत करायचे आहे, असे सांगत या वर्षांच्या शेवटच्या ‘मन की बात’मध्ये त्यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

प्रत्येक संकटाच्या स्थितीत भारतीय एकजुटीने आणि ताकदीने उभे राहतात. एक कुटुंब म्हणून संकटाला सामोरे जातात. हीच आपली सामूहिक शक्ती आहे. गेल्या १०० वर्षातील सर्वाधिक भयंकर महामारीचा आपण सामना केला. कोरोनावरील लसीकरणाच्या बाबतीत जगातील कुठल्याही देशाशी भारताची तुलना केल्यास देशाने किती अभूतपूर्व काम केले आहे, किती मोठे लक्ष्य गाठले हे, हे स्पष्ट होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १४० कोटी डोसचा टप्पा देशाने ओलांडला आहे, हे देशातील प्रत्येक भारतीयाचे यश आहे. त्यातून प्रत्येक भारतीयाने व्यवस्थेवर दाखवेला विश्वास दिसून येतो. देशाच्या विज्ञानावर आणि शास्त्रज्ञांवर दाखवलेला विश्वास दिसतो. देशाचे नागरिक समाजाबद्दलची आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत, हा भारतीयांच्या इच्छाशक्तीचा हा एक मोठा पुरावा आहे, असेही मोदी म्हणाले.

विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ करणार
यावर्षी आपण परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी चर्चेची योजना आखत आहे. या कार्यक्रमाची नोंदणी चूर्ॠेीं.ळप या संकेतस्थळावर २८ डिसेंबरपासून सुरू होणार असून, ती २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाईन स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन देशात दाखल झाला आहे. कोरोना महामारीविरोधात लढण्याचा आपल्याकडे गेल्या दोन वर्षांचा अनुभव आहे. या महामारीवर मात करण्यासाठी एक नागरिक म्हणून आपला स्वतःचा प्रयत्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. नवीन ओमिक्रॉन प्रकारावर आपले शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत; परंतु प्रत्येकाने स्वतः सजग राहणे आणि स्वयंशिस्त लावणे गरजेचे आहे.

  • नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

सावर्डेतील शारदा हायस्कूलच्या
विद्यार्थ्यांशी मोदींनी साधला संवाद
पंतप्रधानांची कालची ‘मन की बात’ सावर्डेतील शारदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मन की बातमध्ये सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सावर्डेचे आमदार तथा मंत्री दीपक पाऊसकर, सरपंच संदीप पाऊसकर, हायस्कूलचे अध्यक्ष प्रहर सावर्डेकर, व्यवस्थापक तुषार सावर्डेकर, सचिव सिद्धेश नाईक, शिक्षिका सोनाली तिळवे व संकेत आर्सेकर उपस्थित होते.