ओबामांचा उद्यापासून ऐतिहासिक दौरा

0
117

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका देशांमधील संबंधांचा नवा अध्याय सुरू केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा रविवारपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहे. या ऐतिहासिक भेटीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणार्‍या संचलनामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे २५ रोजी सकाळी १० वाजता आगमन होणार असून त्यांचे राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ते राजघाटावरील महात्मा गांधींच्या स्मृती स्थळाला भेट देऊन आदरांजली वाहतील. या दिवशी द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदी आणि ओबामा यांची ‘हैदराबाद हाउसमध्ये’ निर्बंधित बैठक झाल्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी ओबामांसाठी दुपारी मेजवानीचे आयोजन केले आहे. संध्याकाळच्या सत्रात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याबरोबर बैठक होणार असून राष्ट्रपतींनी रात्रभोजनासाठी निमंत्रित केले आहे.
दुसर्‍या दिवशी २६ रोजी ओबामा प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्यांचे स्वागत करतील. या समारंभात मोदी आणि ओबामा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संबोधित करतील.
दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ओबामा निवडक महनीय व्यक्तींशी संवाद साधतील. त्यानंतर ते पत्नी मिशेलसह आग्रा येथील ताजमहालाच्या सौंदर्याचा आस्वाद घेतील. साधारण एक ते दीड तास तेथे थांबणार आहेत. ओबामांच्या सुरक्षेसाठी ताजमहाल परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
१६ ट्रक शस्त्रे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओबामांच्या सुरक्षेसाठी १६ ट्रक शस्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.