ऑस्ट्रेलियाने टाळली व्हाईटवॉशची नामुष्की

0
240

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या टी- ट्वेंटी सामन्यात १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी खेळी करूनही टीम इंडियाला विजयी वेस ओलांडता आली नाही. या विजयासह कांगारूंनी मालिकेचा शेवट गोड करताना व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा हा या वर्षातील पहिलाच पराभव ठरला. याआधी भारताने नऊ सामने जिंकले होते. भारताला तिसरा टी-२० सामना जिंकण्यात अपयश आले असले तरी त्यांनी तीन सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी बाजी मारली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दुखापतीमुळे दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्याला मुकलेल्या कर्णधार ऍरोन फिंचचे या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने त्याला खातेही न उघडता माघारी पाठवले. सुंदरनेच स्टिव्ह स्मिथलाही (२४) बाद केले. मात्र, मॅथ्यू वेडने ३४ चेंडूत आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने तिसर्‍या गड्यासाठी ९० धावांची भागीदारी रचली. नटराजनच्या गोलंदाजीवर वेड पायचीत बाद झाला होता. परंतु, भारताने रिव्ह्यू घेण्यास उशीर केल्याने वेडला विकेट राखता आली. तसेच
मॅक्सवेलला युजवेंद्र चहलने वैयक्तिक १८ धावांवर बाद केले होते. मात्र, रिप्लेमध्ये चहलने नो-बॉल टाकल्याचे निदर्शनास आल्याने तिसर्‍या पंचांनी मॅक्सवेलला नाबाद ठरवले. मॅक्सवेलने या संधीचा फायदा घेत ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तसेच वेडने ५३ चेंडूत ८० धावांची केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १८६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला मॅक्सवेलने पहिल्याच षटकात खातेही न उघडता बाद केले. शिखर धवन आणि कर्णधार कोहली यांनी दुसर्‍या यष्टीसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. मात्र, लेगस्पिनर मिचेल स्वॅपसनने धवन (२८), संजू सॅमसन (१०) आणि श्रेयस अय्यर (०) यांना झटपट माघारी पाठवत भारताला अडचणीत टाकले. यानंतर हार्दिक पांड्याच्या (२०) साथीने कोहलीने भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघे षटकांत परतल्याने भारताला २० षटकांत ७ बाद १७४ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी संघात एकमेव बदल केला. अष्टपैलू मार्कुस स्टोईनिसच्या जागी कर्णधार ऍरोन फिंच याचे संघात पुनरागमन झाले. भारताने दुसर्‍या सामन्यातील विजयी संघच कायम ठेवला. स्वॅपसन सामनावीर तर पंड्या मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया ः मॅथ्यू वेड पायचीत गो. ठाकूर ८०, ऍरोन फिंच झे. पंड्या गो. सुंदर ०, स्टीव स्मिथ त्रि. गो. सुंदर २४, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. नटराजन ५४, मोझेस हेन्रिकेस नाबाद ५, डार्सी शॉर्ट धावबाद ७, डॅनियल सॅम्स नाबाद ४, अवांतर १२, एकूण २० षटकांत ५ बाद १८६
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-३४-०, वॉशिंग्टन सुंदर ४-०-३४-२, थंगरसू नटराजन ४-०-३३-१, युजवेंद्र चहल ४-०-४१-०, शार्दुल ठाकूर ४-०-४३-१
भारत ः लोकेश राहुल झे. स्मिथ गो. मॅक्सवेल ०, शिखर धवन झे. सॅम्स गो. स्वॅपसन २८, विराट कोहली झे. सॅम्स गो. टाय ८५, संजू सॅमसन झे. स्मिथ गो. स्वॅपसन १०, श्रेयस अय्यर पायचीत गो. स्वॅपसन ०, हार्दिक पंड्या झे. फिंच गो. झॅम्पा २०, वॉशिंग्टन सुंदर झे. टाय गो. एबॉट ७, शार्दुल ठाकूर नाबाद १७, दीपक चहर नाबाद ०, अवांतर ७ एकूण २० षटकांत ७ बाद १७४
गोलंदाजी ः ग्लेन मॅक्सवेल ३-०-२०-१, शॉन एबॉट ४-०-४९-१, डॅनियल सॅम्स २-०-२९-०, अँडी टाय ४-०-३१-१, मिचेल स्वॅपसन ४-०-२३-३, ऍडम झॅम्पा ३-०-२१-१