>> ऍसेस बॉक्सिंग डे कसोटी; वॉर्नरचे शतक
डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या दमदार शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील चौथ्या तथा बॉक्सिंग डे कसोटीत ३ गडी गमावत २४४ धावा करीत पहिल्याच दिवशी वर्चस्व प्रस्तापित केले. ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठित अशी ऍशेस मालिका मालिकेत ३-० अशी अजेय आघाडी घेतलेली आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत ८९ षट्कांच्या खेळात ३ गडी गमावत २४४ अशी धावसंख्या उभारली. डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरोन बँक्रॉफ्ट यांनी ऑस्ट्रेलियाला आकर्षक सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची शतकी सलामी दिली. ख्रिस वोक्सने ही जोडी फोडताना बँक्रॉफ्टला (२०) पायचितचा शिकार बनविले. १३ चौकार व १ षट्कारांच्या सहाय्याने १५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केलेला डेव्हिड वॉर्नर अँडरसनच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोकडे झेल देऊन परतला. उस्मान ख्वाजा जास्तवेळ खेळपट्टीवर स्थिराऊ शकला नाही व १७ धावा जोडून स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार स्टीव्ह स्मिथने शॉन मार्शच्या साथीत आणखी फलंदाज बाद होऊ न देता चौथ्या विकेटसाठी अविभक्त १०९ धावा जोडल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार स्मिथ ६ चौकारांच्या सहाय्याने ६५ तर शॉन मार्श ४ चौकारांनिशी ३१ धावांवर नाबाद खेळत होते.