मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीच २९६ धावांनी विजय मिळवित तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ४८६ धावांची लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव १७१ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक मार्यापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. बी जे वॉटलिंग (४०) आणि कॉलिन डि ग्रँडहोम यांनीच काय तो तोडाफार प्रतिकार केला. पहिल्या डावात ५ बळी मिळविलेल्या मिचेल स्टार्कने दुसर्या डावातही न्यूझीलंडची फलंदाजी कापून काढताना ४ बळी मिळविले. त्याला चांगली साथ देताना नाथन लियॉननेही ४ बळी मिळविले. मिचेल स्टार्कची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २१७ धावांवर घोषित करीत न्यूझीलंडसमोर ४६८ धावांचे लक्ष्य ठवले होते. जो बर्न्सने ५३ तर मार्नस लबुशेनने ५० धावांचे योगदान दिले. मिचेल स्टार्कने २३, डेव्हिड वॉर्नरने १९, मॅथ्यू वेडने १७ तर स्टीव्ह स्मिथने १६ धावा जोडल्या. न्यूझीलंडकडून टिम साउदीने ५ तर निल वॅग्नरने ३ गडी बाद केले.
न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात १६६ धावा बनविल्या होत्या. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४१६ धावा करीत पहिल्या डावात २५० धावांची मजबूत आघाडी मिळविली होती.