वेर्णा-नागवा व कुडका-पणजीत 40 लाखांचे सामान जप्त
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने वेर्णा नागवा आणि कुडका- पणजी या दोन ठिकाणी छापे घालून ऑनलाइन आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी 34 जणांना अटक करून सुमारे 40 लाख रुपयांचे सामान हस्तगत केले आहे.
वेर्णा नागवा आणि कुडका येथे आयपीएल सामन्यांवर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. संशयितांकडून ॲपच्या माध्यमातून नागरिकांना एका बँक खात्यात रुपये जमा करण्याची सूचना करून त्यांची फसवणूक केली जात होती. पोलिसांनी कारवाईमध्ये मोबाईल, लॅपटॉप, राऊटर्स व इतर समान ताब्यात घेतले आहे.
दोन ठिकाणी कारवाई
नागवा वेर्णा येथील कारवाईत 18 मोबाईल, 5 लॅपटॉप, 3 भारतीय पासपोर्ट, 11 बॅंक पासबुक, 54 सीमकार्ड, 8 चेकबूक आणि विविध बँकांची 363 एटीएम कार्ड ताब्यात घेतली आहेत. तर, कुडका पणजी येथील कारवाईमध्ये 84 पासबुक, 27 चेकबुक, 83 मोबाईल, 6 लॅपटॉप, 12 डेस्कटॉप, 6 सीपीयू, 3 राऊटर आणि 109 एटीएम कार्ड ताब्यात घेण्यात आली आहेत. सट्टा घेणाऱ्यांनी पूर्ण इमारत भाडेपट्टीवर घेतल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी, इंडियन प्रिमियर लीग या सारख्या मोठ्या स्पर्धाच्या वेळी सट्टा घेण्याचे काम केले जात होते.