- ऍड. प्रदीप उमप
एकीकडे मोबाईल आणि इंटरनेट या जीवनावश्यक गोष्टींच्या यादीत भर घालत असतानाच त्यामुळे समस्याही निर्माण होत आहेत; तर दुसरीकडे लोकांमध्ये वैज्ञानिक समज वाढते आहे आणि इंटरनेट सुलभही झाले आहे. त्या सुलभतेने इंटरनेटवरील ऑनलाईन गेम्सचे प्रस्थही मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या गेम खेळण्याच्या सवयीचे हळूहळू व्यसन जडते आहे. अशा वेळी पालकांनी मुलांना या खेळांपासून दूरच ठेवले पाहिजे.
आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणवल्या जाणार्या सिग्मंड ङ्ग्रॉईड यांनी मानसशास्त्राचा अभ्यास करून एक निष्कर्ष काढला होता की मनुष्याचा मूळ स्वभाव आव्हाने स्वीकारणे हा असतो. मात्र तुम्ही म्हणता तसे समाजात दिसत नाही. बहुतांश लोक आव्हाने पाहून पळ काढतात. याचे कारण काय असा प्रश्न ङ्ग्रॉईड यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की व्यक्ती जेव्हा हुशार, समजूतदार होतो तेव्हा कोणती आव्हाने स्वीकारायची आणि कोणते स्वीकारायची नाहीत हे समजून घेऊन ठरवू शकतो. पण लहान मुलांमध्ये मात्र ही समज विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे मुले कोणतीही आव्हाने स्वीकारतात. ङ्ग्रॉईड यांचे हे विचार आजच्या काळातील ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत अगदी चपखल लागू होतात. गेल्या काही दिवसांत ऑनलाईन गेम्समुळे झालेल्या मुलांच्या आत्महत्येच्या घटनांचा विचार करता ङ्ग्रॉईड यांचे हे विधान पटते. ब्लू व्हेल ऑनलाईन गेममुळे जगभरातील २५० हून अधिक लोकांनी आत्महत्या केली आहे आणि त्यापैकी ९० टक्क्याहून जास्त आहेत ती मुले. १३ ते १७ वर्ष वयाचा मुलांचा त्यात अधिक समावेश आहे. ही समस्या मानसशास्त्रीय आहेच शिवाय ती सामाजिकही आहे. त्यामुळे दोन्ही पातळ्यांवर यावर उपाय शोधणे आणि करणे आवश्यक आहे.
लहान मुलांना विविध गोष्टींचे आकर्षण वाटत असते आणि विविध आव्हाने पेलायलाही आवडते. त्यामुळेच मोठ्या माणसांची किंवा पालकांची जबाबदारी वाढते. मुलांना ऑनलाईन गेम्स खेळण्यापासून दूर ठेवण्याची जबाबदारीही आपली आहे. सध्या विज्ञान- तंत्रज्ञानाची प्रगती होते आहे, विस्तार वाढतो आहे तशी लोकांची वैज्ञानिक समजही वाढते आहे. इंटरनेट तर आता कुठेही आणि केव्हाही उपलब्ध असते. त्यामुळे व्यक्ती रात्रंदिवस ऑनलाईन राहू शकतात. या कायम उपलब्धतेमुळे ऑनलाईन गेम्स खेळण्याची सवय व्यसनामध्ये बदलते आहे. ब्लू व्हेल असो किंवा टिकटॉकसारखे माध्यम असो या सर्व गेम्समुळे रचनात्मक दृष्टीने चांगले निर्माण होऊ शकणारे वातावरण हलवून सोडले आहे. या ऑनलाईन गेम्समुळे देश आणि समाज दोन्हीमध्ये एकटेपणा निर्माण झाला आहे. ब्लू व्हेल हा गेम येण्याआधीही काही गेम्सचे वाईट परिणाम समाजावर झाले होतेच. त्यापैकी एक गेम होता सॉल्ट अँड आईस चॅलेंज. त्यामध्ये मुले आपल्या शरीराच्या एखाद्या भागावर मीठ टाकतात आणि त्यावर बर्ङ्गाचा तुकडा ठेवतात. हा गेम जीवघेणा नसला तरी वेदनादायक जरूर आहे. बर्ङ्गामुळे शरीराचा तो भाग थंड होतो, त्यामुळे त्वचा संवेदनशील होते. बर्ङ्गाखाली मीठ ठेवलेले असते. त्यामुळे त्वचेची जळजळ होण्यास सुरूवात होते. दुसरा एक गेम ट्यूब टेप चॅलेंज. त्यात ट्यूब टेप शरीराभोवती लपेटतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे करताना ट्यूब टेप घशाजवळ आवळली गेली तर मात्र प्राणास मुकावेही लागू शकते. या खेळामध्ये अमेरिकेत काही मृत्यूच्या घटना घडल्या होत्या.
पॉकेमॉन गो चे तर वेड सार्या जगात पसरले होते. त्यात मुले मोबाईलवर गेम खेळता खेळता पोकेमॉन सांगेल त्या रस्यावर चालत जातो.
खेळताना मुलांच्या लक्षातच येत नाही की ते कधी रस्त्यावर आले आणि चालता चालता रस्त्यावर अपघाताला बळी पडतात. अशा प्रकारचे अनेक जीवघेणे खेळ इंटरनेटवर आहेत आणि स्मार्टङ्गोन्सच्या चलतीमुळे आता कोणत्याही वयाच्या मुलांच्या हाती हे गेम पडतात. या सर्वांमध्ये कायदा काहीही करू शकत नाही. सामाजिक परिस्थितीत भान बाळगताना एक करू शकतो की मुलांना एकटे सोडू नका. अर्थात महानगरे, शहरे यामध्ये पालकांना सतत मुलांबरोबर राहाणे शक्य नसते; कारण आज बदलत्या काळात पालकांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सांगणे सोपे, करणे अवघड अशी स्थिती आहे. हल्ली विभक्त कुटुंब असल्याने प्रत्येक घरी आजीआजोबा असतातच असेही नाही. काही वेळा नोकरीच्या ठिकाणी येऊन रहावे लागते; तर काही जण वृद्धांना थेट वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मात्र जर शक्य असेल तर आजी आजोबांना आपल्या बरोबरच ठेवले तर लहान मुलांना आजी आजोबा चार चांगल्या गोष्टी सांगतील. मुले सतत टीव्ही आणि मोबाईल यांच्यात गुंग होणार नाहीत. घरात कोणीही नसेल, आसपास कोणी नातेवाईक नसतील तर राहत्या परिसरात ओळखी वाढवून तिथल्या मुलांना एकत्र खेळण्याचा पर्यायही मिळू शकतो. त्यामुळेही मुले मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मोकळ्या जागेत खेळण्याचा आनंद घेऊ शकतील. अर्थात हे उपाय सामाजिक पातळीवरील आहेत. पण मानसिक पातळीवरही यावर उपाय योजना कऱणे आवश्यक आहे.
मानसशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा मुलं चालायला लागतात तेव्हा ती आव्हाने स्वीकारायला शिकतात. वयाच्या १४-१५ वर्षापर्यंत मुले आव्हाने स्वीकारायला तयार असतात. याच वयात अभ्यासात चांगले गुण मिळवणे, खेळात उत्तम प्रगती करणे, सतत शिकत राहाण्याची क्षमता आदी गुण त्यांच्यात विकसित होतात. त्याचे कारणही हेच आहे की आव्हाने स्वीकारण्याची मुलांची वृत्ती असते. मुलांना काहीही सर्जनशील आव्हाने मिळत नाहीत तेव्हाच ते ब्लू व्हेलसारख्या गेम्समधील नकारात्मक आव्हानांच्या पाठी लागतात. त्यांना संगीत, नव्या भाषा शिकणे, पोहणे आणि नृत्य यांसारख्या रचनात्मक गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन नकारात्मक आव्हानांपासून बचाव करू शकता. मुलांबाबत या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक केल्या गेल्या नाहीत तर मुले सातत्याने इंटरनेटच्या आहारी जातील. हे मुलांसाठी नक्कीच हानीकारक आहे.
वास्तविक ऑनलाईन गेम्सचे वचन जगभरात एक मानसिक आरोग्याची समस्या म्हणून मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. देशभरात इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांना आणि तरूणांना ऑनलाईन गेम्स खेळण्याचे व्यसन लागले आहे. त्याच कारणामुळे १६ देशांमधील डॉक्टरांनी जागतिक आरोग्य संघटनेला आवाहन करून ऑनलाईन आणि ऑङ्गलाईऩ गेम्सना आजाराचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.ऑनलाईन आणि ऑङ्गलाईन गेम्सच्या व्यसनाला अजूनही मानसिक आजार म्हणून स्वीकारलेले नाही. हा आजार नसून एक वाईट सवय आहे असेच मानले जाते. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात या व्यसनावर काहीही ठोस उपाय नाही. अर्थात मानसोपचार तज्ज्ञ बिहेवियरल थेरेपीचा वापर करून त्यावर उपचार करतात. पूर्वी आशियातील देशांमध्ये सुमारे १०-१५ टक्के तरूण लोकसंख्या या व्यसनाने ग्रस्त आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्येही याचा प्रभाव अधिक आहे.
आजकाल इंटरनेट सर्वच थरांपर्यंत पोहोचत असल्याने लहान मुले, तरूण यांच्यामध्ये ऑनलाईन गेम्सची सवय वाढलेली दिसते. मुलेही लॅपटॉप किंवा मोबाईल वर तासन् तास गेम खेळण्यात व्यग्र असतात. मुलांचे अभ्यासातही लक्ष लागत नसल्याचे दिसून आले आहे. मुलांमध्ये ऍक्शन गेम्स आणि ऑनलाईन गेम्स याविषयी इतका जास्त ओढा आहे की पालकांना मुलांच्या वर्तणुकीविषयक समस्यांमध्ये मानसशास्त्रज्ञांची मदत घ्यावी लागते आहे. त्यामुळे पालकांनीही विचार केला पाहिजे की कोणताही व्हिडिओ गेम किंवा कॉम्प्युटर गेम खेळायला देण्यापूर्वी पालकांनाही मुलांसाठी कोणते गेम खेळणे योग्य आहे ते पाहूनच द्यावे.