पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्पष्ट केले की, आपल्या सरकारने ‘ऐतिहासिक अन्याय’ दूर करण्यासाठी व भारताच्या शेजारी देशांमधील अल्पसंख्याकांना भाजपने दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी सीएए कायदा संमत केला आहे.
येथे आयोजित पंतप्रधान एनसीसी २०२० या वार्षिक रॅलीला संबोधित करताना त्यांनी वरील बाब स्पष्ट केली. ते म्हणाले, जम्मू- काश्मीरमधील समस्या देश स्वतंत्र झाल्यापासूनची आहे. तेथील मुद्दा काही राजकीय पक्ष व काही कुटुंबांनी तसाच जिवंत ठेवला आणि तेथे दहशतवाद फोफावला. दशकांपासूनच्या समस्यांवर मात करण्याचे आपल्या सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी पाकिस्तानवर हल्लाबोल करताना त्या देशाला तीन युद्धांमध्ये पराभव पत्करावा लागला असूनही पाक आजही भारताविरुद्ध छुपे युद्ध खेळा पाहत आहे असा आरोप मोदी यांनी केला. मात्र, या आधीच्या सरकारानी या समस्येकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या नजरेतून पाहिले असे ते म्हणाले.