एसटी राजकीय आरक्षणप्रश्नी इच्छाशक्तीचा अभाव : खुर्शीद

0
14

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला गोव्यातील अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण देण्याची इच्छा नाही. तसेच दुहेरी नागरिकत्व व ओसीआय कार्ड हे विषय सोडवण्यातही रस नाही. त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच हे प्रश्न खितपत पडले आहेत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केला.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबध्द राहिला आहे; मात्र भाजप त्यांना सत्ता आणि त्यांचे अधिकार द्यायला तयार नाही, असेही खुर्शीद म्हणाले.
यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख व मीडिया प्रभारी हर्षद शर्मा हे उपस्थित होते.

खुर्शीद यांनी नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळावर सडकून टीका केली. गोव्यातील बेरोजगारी व म्हादईचा प्रश्न सोडवण्यास भाजपच्या डबल इंजिन सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला.

चर्चेअंती उमेदवार ठरणार : खुर्शीद
काँग्रेस पक्ष हा आपल्या सगळ्या मित्र पक्षांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर इंडिया आघाडीचे लोकसभासाठीचे उमेदवारी जाहीर करणार असल्याचे सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले. गोव्यातील दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची नावे योग्य वेळी जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.