‘एफसी गोवा’ क्लबचे दिमाखदार उद्घाटन

0
155
ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार्‍या इंडियन सुपर लीगमधील गोवा फ्रँचाइजी ‘एफसी गोवा’च्या बोधचिन्हाचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत (डावीकडून) सिनेस्टार वरूण धवन, श्री. दत्तराज साळगावकर, व्हीडिओकॉनचे अध्यक्ष श्री. अनिरुध्द धूत, धेंपो उद्योगसमूहाचे चेअरमन श्री. श्रीनिवास धेंपो, श्री. सौरव धूत आणि संघातील युवा खेळाडू (बसलेले). (छाया : नंदेश कांबळी)

‘वन टीम वन ड्रीम’ ध्येयाने प्रेरित गोव्याच्या ‘एफसी गोवा’ संघाचा उद्घाटन सोहळा काल येथे दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
येत्या दि. १२ ऑक्टोबर ते २० डिसेंबर या कालावधीत होणार्‍या या बहुचर्चित तथा बहुप्रतिक्षित ‘हिरो इंडियन सुपर लीग’ मध्ये भाग घेणार्‍या ‘एफसी गोवा’चे नामकरण काल येथील हॉटेल मेरियॉटमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते झाले. तसेच गोव्याचा राज्य प्राणी ‘गवा रेडा’ची प्रतिकृती असलेल्या बोधचिन्हाचे अनावरणही मुख्यमंत्र्यांहस्तेच करण्यात आले. धेंपो उद्योगसमुहाचे चेअरमन श्री. श्रीनिवास धेंपो, साळगावकर उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दत्तराज साळगाकवर, व्हीडिओकॉनचे संचालक श्री. अनिरुद्ध धूत आदी ‘एफसी गोवा’चे मालक यावेळी उपस्थित होेते.
‘एफसी गोवा’च्या बोधचिन्हावरील, गोव्याचा राज्य प्राणी असलेला गवा रेडा हे बल, आक्रमण आणि बचावाचे प्रतीक असून यामधील नीळा रंग हे सखोल नियोजन आणि नारंगी रंग हा त्यागाचे प्रतीक होय, असे सांगून २० डिसेंबरला होणार्‍या अंतिम लढतीत ‘एफसी गोवा’ संघ विजेतेपदाचा मान मिळवील, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यानी दिल्या.
फुटबॉल हा गोमंतकीयांचा आवडता खेळ आहे, गोमंतकीयात विपुल फुटबॉल नैपुण्य आहे आणि त्याला व्यावसायिकतेची गरज होती ती ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या रूपाने लाभली असून गोवेकरांच्या नैपुण्याला नवी दिशा नवे तेज मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी पर्रीकर यांनी सांगितले.
‘एफसी गोवा’हा गोमंतकीयांचा संघ आहे. गोवा फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी गेली अनेक वर्षे योगदान दिलेल्या धेंपो आणि साळगावकर कुटुंबियांनी व्हीडिओकॉनच्या सहयोगाने प्रतिष्ठेच्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये गोवा संघ उतरविला असून यामुळे गोमंतकीय फुटबॉलच्या विकासाला आणखी गती लाभेल, असे धेंपो उद्योगसमूहाचे चेअरमन श्री. श्रीनिवास धेंपो यांनी स्वागतपर भाषणात म्हणाले.
फुटबॉलला राज्याच्या खेळाचा दर्जा दिलेल्या मुख्यमंत्र्यानी या प्रतियोगितेसाठी पूर्णतया सहयोग देण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. शिवाय क्लबतर्फे प्रतियोगिता स्थळ असलेले फातोर्डा येथील नेहरू स्टेडियम आणि सराव स्थळ टिळक मैदानावरील (वास्को) सोयीसुविधांसाठी ‘एफसी गोवा’तर्फे रु. ५० लाखांचा खर्च करणार असल्याचेही श्री. धेंपो यांनी सांगितले.
‘एफसी गोवा’च्या बोधचिन्हातील ‘गवा रेडा’ या प्रतिकृतीमधील शक्ती, आक्रमण आणि बचाव ही गूणत्रयी गोमंतकीय फुटबॉलमध्ये पुरेपूर आहे आणि भारतीय फुटबॉलमधील आमची आजवरची कामगिरी पाहता ‘हिरो इंडियन सुपर लीग’च्या शुभारंभी प्रतियोगितेत संघ दमदार कामगिरी बजावील, असा आत्मविश्‍वास श्री. दत्तराज साळगाकवर यांनी प्रगटविला.
भारतीय फुटबॉलमध्ये विपुल गुणवत्ता आहे आणि एके दिवशी हा देशातील सर्वांत लोकप्रिय खेळ बनेल, असे सांगून श्री. श्रीनिवास धेंपो आणि श्री. दत्तराज साळगावकर या भारतातील अग्रणी तथा यशस्वी संघाच्या दोन मालकांच्या साथीत ‘एफसी गोवा’त सहभाग ही अभिमानाची बाब असल्याचे व्हीडिओकॉनचे संचालक अनिरुद्ध धूत यांनी सांगितले.
एफसी गोवा ‘फर्स्ट फ्रेंड’ म्हणून आलेला ‘स्टुडंट ऑफ दी ईयर’ फेम सिनेस्टार वरुण ऍरोनने ‘एफसी गोवा’शी संलग्नतेचा आपल्याला अतीव आनंद होत असल्याचे सांगून संघातील स्थानिक युवा खेळाडूंना आपल्याबरोबर नृत्याच्या तालावर पदन्यास करण्यास लावून सोहळ्याची रंगत वाढविली.
क्लबचे नाव सूचविलेला, फादर आग्नेल आश्रम विद्यालयाचा (पिलार) १७ वर्षीय विद्यार्थी वेलविरो पिंटोला मच्छीमारीमंत्री आवेर्तिनो फुर्तादो यांच्याहस्ते १०हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
‘गोमंतकीय फुटबॉलचा दर्जा उंचावणे हे समान ध्येय’
धंेंपो आणि साळगावकर हे फुटबॉल मैदानावरील पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी गोमंतकीय फुटबॉलला नवी दिशा नवा दर्जा देणे हेच समान ध्येय होते आणि त्यामुळे प्रतिष्ठेच्या हिरो इंडियन सुपर लीगमध्ये गोमंतकीय फुटबॉलचा ठसा उमटविण्यासाठी उभय उद्योगसमूह एकत्र आल्याचे श्री. साळगावकर आणि श्री. धेंपो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘एफसी गोवा’ सुमारे ४ दशलक्ष डॉलर्स खर्च येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्हांला दीर्घकालीन सहकाराची आवश्यकता आहे. त्यामुळे विदेशी क्लबशी करार करण्याची सध्या तरी घाई नाही, असे सांगून आयएमजी रिलायन्सच्या सहयोगाने पुढील तीन वर्षांत फुटबॉल अकादमी स्थापण्याचा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले.
एफसी गोवाचे आयएसएल पर्व १चे वेळापत्रक
• सोफवार दि. १३ ऑक्टोबर एफसी गोवा वि. चेन्नई, स्थळ : गोवा.
• शनिवार दि. १८ ऑक्टोबर एफसी गोवा वि. कोलकाता, स्थळ : कोलकाता
• गुरुवार दि. २३ ऑक्टोबर एफसी गोवा वि. पुणे, स्थळ : गोवा
• मंगळवार दि. २८ ऑक्टोबर एफसी गोवा वि. गुवाहाटी, स्थळ : गोवा
• शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर एफसी गोवा वि. दिल्ली, स्थळ : दिल्ली
• सोफवार दि. ३ नोव्हेंबर एफसी गोवा वि. मुंबई, स्थळ :  मुंबई
• शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर एफसी गोवा वि. कोची, स्थळ : कोची
• मंगळवार दि. ११ नोव्हेंबर एफसी गोवा वि. दिल्ली, स्थळ : गोवा
• शनिवार दि. १५ नोव्हेंबर एफसी गोवा वि. कोची, स्थळ : गोवा
• शनिवार दि. २२ नोव्हेंबर एफसी गोवा वि. पुणे, स्थळ : पुणे
• शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर एफसी गोवा वि. मुंबई, स्थळ : गोवा
• गुरुवार दि. २ डिसेंबर एफसी गोवा वि. कोलकाता, स्थळ : गोवा
• रविवार दि. ७ डिसेंबर एफसी गोवा वि. चेन्नई, स्थळ : चेन्नई
• बुधवार दि. १० डिसेंबर एफसी गोवा वि. गुवाहाटी, स्थळ : गुवाहाटी
• रविवार दि. १४ डिसेंबर एफसी गोवा वि. कोलकाता, स्थळ : गोवा.