इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर एफसी गोवा आणि केरला ब्लास्टर्स यांच्यात लढत रंगणार आहे.
ब्लास्टर्सकरीता स्पर्धेचा दुसरा टप्पा चांगला ठरत आहे. स्पेनचे प्रशिक्षक किबू व्हिकुना यांच्या संघाने बेंगळुरू एफसीविरुद्ध अखेरच्या क्षणी विजय खेचून आणला. त्यामुळे गेल्या तीन सामन्यांत त्यांनी सात गुणांची कमाई केली आहे. हेच मागील नऊ सामन्यांत त्यांना सहाच गुण मिळाले होते. गोव्याविरुद्धची लढत मात्र सर्वांत खडतर असेल याची व्हिकुना यांना कल्पना आहे.
ब्लास्टर्सला प्रारंभी गोलांसाठी झगडावे लागले. मागील चार सामन्यांत त्यांचे आक्रमण जुळून आले आहे. या टप्प्यात आठ गोल आणि सामन्यागणिक १०.८७च्या सरासरीने ८७ शॉट अशी त्यांची आकडेवारी आहे. लक्ष्याच्या दिशेने मारलेल्या शॉटची संख्या २४ असून सामन्यागणिक सहा असे हे प्रमाण आहे.
शनिवारी त्यांच्यासमोर गोव्याच्या रुपाने असा प्रतिस्पर्धी असेल ज्याने चेंडूवरील ताब्यात वर्चस्व राखले आहे. गोवा गेल्या पाच सामन्यांत अपराजित आहे. गोव्याविरुद्ध ब्लास्टर्सला २१ गोल पत्करावे लागले आहेत, जे चौथ्या आयएसएल पासून कोणत्याही संघाविरुद्धचे सर्वाधिक आहेत.
व्हिकुना यांचा संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे, पण चौथ्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीपेक्षा ते केवळ चारच गुण मागे आहेत. त्यामुळे व्हिकुना आशावादी आहेत.
गोव्याचा संघ उत्तम बहरात आहे. प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्यांनी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये मजल मारली आहे.
जुआन फरांडो यांचा संघ स्पर्धेत उसळी घेणारा प्रतिस्पर्धी ठरला आहे. पहिला गोल पत्करावा लागल्यानंतरही त्यांनी दहा गुणांची कमाई केली आहे.