एफसी गोवाची वेळसाववर मात

0
217

एफसी गोवा संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदविताना काल शुक्रवारी वेळसाव स्पोर्टस् अँड कल्चरल क्लबचा २-० असा पराभव केला. धुळेर मैदानावर झालेल्या या सामन्यात बदली खेळाडू रोमिओ फर्नांडिसने तासाभराचा खेळ पूर्ण झालेला असताना पहिला गोल केला. कपिल होबळे याने भरपाई वेळेत दुसरा गोल करत संघाचा विजय साकार केला.

एफसी गोवाचे प्रशिक्षक डेगी कार्दोझ यांनी या सामन्यासाठी संघात दोन बदल केले. दिशांक कुंकळ्ळीकर याला प्रथमच प्रारंभीच्या अकरा खेळाडूंत स्थान मिळाले तर ख्रिस्टी डेव्हिस याचे संघात पुनरागमन झाले. दुसरीकडे वेळसावचे प्रशिक्षक ज्युड बार्रेटो यांनी सेझा अकादमीला बरोबरीत रोखलेल्या संघात दोन बदल केले. त्यांनी गणेश ठाकूर व रोन रॉड्रिगीस यांचा पुन्हा संघात समावेश केला. एफसी गोवाच्या प्रशिक्षकांनी ५४व्या मिनिटाला लालरेमरुआटा एचपी याच्या जागी रोमिओला मैदानावर उतरवले.

आयएसएलच्या या माजी स्टार खेळाडूने मैदानावर उतरून सहा मिनिटे होताच गोल करत एफसी गोवाला १-० असे पुढे नेले. वेळसावचा गोलरक्षक प्रेस्ली याने वसीमचा फटका अडवल्यानंतर रोमिओने या चेंडूवर ताबा मिळवत चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली. भरपाई वेळेत प्रेस्ली याला जॉयबर्ट आल्मेदा याने बॉक्सबाहेरून मारलेला जोरदार फटका नीट अडवता आला नाही. याचा लाभ उठवत कपिलने गोल नोंदविला.
आज धेंपो एससी व चर्चिल ब्रदर्स एससी यांच्यात सामना खेळविला जाणार आहे.