एफसी गोवाचा दिल्ली डायनामोजवर दणकेबाज विजय

0
131
हीरो ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारताना योनेस्स बेंगेलॉऑन.

फ्रांसचा बचावपटू योनेस्स बेंगेलॉऑनने हेडरद्वारे नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर एफसी गोवा संघाने नवी दिल्ली येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली डायनामोज संघावर ४-० असा आकर्षक विजय नोंदविला. एफसी गोवाचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. या विजयामुळे एफसी गोवाचे ८ सामन्यातून ८ गुण झाले असून ते ७व्या स्थानी पोहोचले. तर पराभवामुळे दिल्ली डायनामोज संघ ७ गुणांसह तळाला आठव्या स्थानी घसरला.
या सामन्याचा स्टार ठरला तो फ्रांसिसी बचावपटू योनेस्स बेंगेलॉऑन. त्याने एफसी गोवातर्फे दिल्ली डायनामोज संघाची आक्रमणे रोखताना सुंदर बचाव करतानाच विजयात मोलाचा वाटा उचलताना हेडरद्वारे दोन गोल नोंदविले. तर मार्की खेळाडू रॉबेर्ट पिरीसने ५३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर दिल्लीच्या गोलरक्षकाला चकवित आयएसएलमधील आपल्या पहिल्या गोलची नोंद केली. ६०व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर टॉल्गे ऑझ्बेने एफसी गोवाचा चौथा गोल नोंदविला. स्पर्धेतील त्याचा हा दुसरा गोल ठरला. तर दिल्ली डायनामोज संघातर्फे ब्राझीलियन स्ट्रायकर गुस्ताव दोस सांतोसने ७२व्या मिनिटाला आघाडी कमी करणारा एकमेव गोल नोंदविला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघातर्फे प्रारंभापासूनच जोरदार आक्रमणे झाली. दोघांनाही काही संधी चालून आल्या होत्या. त्यात गोव्याने १८व्याच मिनिटाला आघाडी घेण्यात यश मिळविले. योनेस्स बेंगेलॉऑनने क्रिस्तोफ वॅन हावटला चकवित हा आघाडीचा गोल नोंदविला (१-०). पहिल्या सत्रात गोव्याने आपली आघाडी राखली.
दुसर्‍या सत्रातही गोव्याने प्रारंभापासूनच आक्रमक खेळ करीत सामन्याच्या ४८व्या मिनिटालाच आघाडी २-० अशी केली. ब्राझिलियन मध्यपटू आंद्रे सांतोसने घेतलेल्या शानदार फ्री-कीकवर योनेस्स बेंगेलॉऑन हेडरद्वारे गोलरक्षक हावटला कोणतीही संधी न देता चेंडूला जाळीची दिशा दाखवित आपला या स्पर्धेतील व सामन्यातील दुसरा गोल नोंदविला. लगेच पाच मिनिटानंतर एफसी गोवानेे आपली आघाडी ३-० अशी केली. स्ट्रायकर ऑझ्बेला बेल्जियन गोलरक्षक हावटने अवैधरीत्या खाली पाडल्याने पंचांनी गोव्याला पेनल्टी बहाल केली आणि त्यावर कोणतीही चूक न करताना पिरीसने गोलरक्षकाचा चकवित स्पर्धेतील आपला पहिला गोल नोंदविला.
६०व्या मिनिटाला गोव्याने दिल्लीवर आणखी एक धोकादायक हल्ला चढविला आणि त्यात त्यांना यशही आले. ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर टॉल्गे ऑझ्बेने मिळालेल्या संधीचा अचूक लाभ उठवित जबरदस्त फटक्याद्वारे दिल्ली डायनामोज संघाची जाळी भेदत संघाला ४-० अशा मजबूत आघाडीवर नेले.
७२व्या मिनिटाला दिल्ली डायनामोजने आघाडी कमी करणारा एकमेव गोल नोंदविला. दिल्लीच्या खेळाडूने घेतलेल्या फटक्यावरील चेंडू डी कक्षेत गोव्याचा बचावपटू देवव्रत रॉयच्या हाताला लागल्याने पंचांनी पेनल्टी बहाल केली. त्यावर कोणतीही चूक न करता ब्राझिलियन युवा स्ट्रायकर दोस सांतोसने गोव्याचा झेक प्रजासत्ताकरचा गोलरक्षक जॅन सेडाला चकवित स्पर्धेतील आपल्या दुसर्‍या गोलाची नोंद केली.
आता एफसी गोवाचा पुढील सामना १७ नोव्हेंबर रोजी मुंबई सिटी एफसी संघाशी होणार असून पराभूत दिल्ली डायनामोज संघाची लढत १६ नोव्हेंबर रोजी केरला ब्लास्टर्स संघाशी होईल.
इंडियन सुपर लीग गुणतक्ता
क्रम संघ सामने गोलफरक गुण
१. ऍथलेटिको दे कोलकाता ७ ४ १२
२. चेन्नईन एफसी ७ ३ १२
३. एफसी पुणे सिटी ७ -१ ११
४. मुंबई सिटी एफसी ८ -२ ११
५. नॉर्थ ईस्ट युनायटेड ७ ० ९
६. केरला ब्लास्टर्स एफसी ८ -१ ९ ७. एफसी गोवा ८ -१ ८
८. दिल्ली डायनामोज एफसी ८ -२ ७