राज्य सरकारने वाढीव वीज बिलाच्या रकमेमुळे त्रस्त बनलेल्या वीज ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याच्या वीज बिलात १८.३ कोटी रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून काल देण्यात आली आहे.
वीज ग्राहकांना एप्रिल आणि मे महिन्याच्या वीज बिलात ही सवलत दिली जाणार आहे. राज्यातील नागरिकांना कोरोना महामारीच्या काळात वाढीव रक्कमेची वीज बिले देण्यात आल्याने नाराजी पसरली आहे.
घरगुती, व्यावसायिक वीज ग्राहकांना कमी दाबाच्या वीज जोडण्यांतील बिलांतील निश्चित शुल्कात (फिक्स चार्जेस) ५० टक्के सूट दिली जाणार आहे. तसेच, उच्च दाबाच्या वीज ग्राहकांनासुद्धा सूट दिली जाणार आहे. ही सूट पुढील बिलांमध्ये दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.