एडिटर्स चॉइस
- परेश प्रभू
मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती कशी असुरक्षित आहे आणि तिच्या वैयक्तिक माहितीचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो त्याची जाणीव स्नोडेनच्या या गौप्यस्फोटाने पुराव्यांनिशी जगाला करून दिली. अशा या स्नोडेनचे अत्यंत लक्षवेधी असे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे, ज्याचे नाव आहे ‘पर्मनंट रेकॉर्ड!’
एडवर्ड स्नोडेन… ज्याने महाबलाढ्य अमेरिकेच्या सर्वांत शक्तिमान अशा नॅशनल सिक्युरिटी एजन्सी किंवा एनएसएच्या जागतिक हेरगिरीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित कटकारस्थानाचा पर्दाफाश केला आणि त्याची जबर किंमतही ज्याला चुकवावी लागली असा एक अत्यंत बुद्धिमान तरुण. अत्यंत निष्णात संगणकतज्ज्ञ. स्वतः सीआयएचा कर्मचारी असूनही जेव्हा त्याला इंटरनेट आणि मोबाईल वापरणार्या जगातील कोट्यवधी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा हेरगिरीसाठी दुरुपयोग करण्याच्या एनएसएच्या महत्त्वाकांक्षी महायोजनेचा सुगावा लागला, तेव्हा या अनैतिक गोष्टीचा भाग बनण्याऐवजी त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि जगाला सतर्क करण्याचा चंग बांधून तो उभा राहिला. पत्रकारांपुढे त्याने एनएसएच्या त्या अत्यंत गोपनीय योजनेशी संबंधित असंख्य कागदपत्रे खुली केली आणि जग हादरून गेले.
मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती कशी असुरक्षित आहे आणि तिच्या वैयक्तिक माहितीचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो त्याची जाणीव स्नोडेनच्या या गौप्यस्फोटाने पुराव्यांनिशी जगाला करून दिली. अशा या स्नोडेनचे अत्यंत लक्षवेधी असे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे, ज्याचे नाव आहे ‘पर्मनंट रेकॉर्ड!’ या आत्मचरित्राचा विशेष म्हणजे ते ज्या दिवशी प्रसिद्ध झाले, त्या दिवशीच त्याच्याविरुद्ध अमेरिका सरकारने गोपनीयतेचा भंग केल्याचा खटला भरला. महासत्ता अमेरिकेलाही धास्ती वाटावी अशा या आत्मचरित्रामध्ये आहे तरी काय? या लेखात तेच मी आपल्याला सांगणार आहे.
स्नोडेनच्या बालपणापासून या आत्मचरित्राची रंजक सुरूवात होते. अतिशय खुसखुशीत, विनोदी शैलीत स्नोडेन आपल्या बालपणातील गमतीजमती सांगत वाचकाच्या मनाची पकड घेतो. तटरक्षक दलात असलेल्या वडिलांचे गॅजेट्सचे प्रेम, त्यातून आपल्याला संगणकात निर्माण झालेला रस, संगणकावरील गेम्स खेळता खेळता आणि ऑनलाइन कम्युनिटीशी संपर्कात येत एकलव्याच्या निष्ठेने मिळवलेले माहिती तंत्रज्ञानातील प्रावीण्य, पुढे आईवडील विभक्त झाल्यावरची परिस्थिती, शाळेचे दिवस, त्या एकलकोंडेपणात जास्तीत जास्त ऑनलाइन राहून माहिती तंत्रज्ञानामध्ये प्राप्त केलेली निष्णातता हे सगळे सांगत सांगत स्नोडेन आपल्या जीवनातील त्या महत्त्वपूर्ण पर्वाकडे येतो. माहिती तंत्रज्ञानातील कौशल्यामुळे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये त्याची निवड होते. ‘डेल’ सारख्या कंपनीचा कर्मचारी म्हणून केवळ नावापुरती कशी नेमणूक होेते, परंतु प्रत्यक्षात मात्र सीआयएचे काम कसे करावे लागते, सीआयएचे काम देशोदेशीच्या दूतावासांच्या आडून कसे चालते वगैरे वगैरे सर्व धक्कादायक गोष्टी तपशिलात वाचायचे असेल तर हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवे.
माहिती तंत्रज्ञानातील विलक्षण नैपुण्य त्याला अधिकाधिक जबाबदारीची पदे मिळवून देते खरे, परंतु त्याच बरोबर त्याचा एनएसए, सीआयएसारख्या यंत्रणा नेमके काय काम करतात त्यातला रसही वाढत जातो. त्यातून त्याच्या हाती एकेक दुवे पडत जातात.
जागतिक हेरगिरीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा कसा वापर होतो आणि तो मानवी स्वातंत्र्यासाठी कसा घातक आहे याची जाणीव होताच आपण या कटकारस्थानातले एक प्यादे बनलेलो आहोत या भावनेने तो अस्वस्थ होतो. त्यातूनच त्याचा निर्धार होतो की हे सगळे कटकारस्थान आपण उघडे पाडायचे. मग तो त्या तयारीला लागतो. जगाला आपले म्हणणे पटवून देण्यासाठी पुरावे गोळा करण्याच्या मागे लागतो. हे अत्यंत जिकिरीचे असते. विशेषतः अमेरिकेसारख्या महाबलाढ्य महासत्तेच्या सर्वांत ताकदवान गुप्तचर संस्थेमध्ये राहून त्यांचीच गोपनीय रहस्ये मिळवणे आणि पुरावे गोळा करणे हे सोपे काम नसते. परंतु आपल्या माहिती तंत्रज्ञानातील नैपुण्याच्या जोरावर तो हे सगळे कसे करतो आणि शेवटी पत्रकारांच्या माध्यमातून गौप्यस्फोट कसे करतो हे खरोखरच मुळातून वाचण्याजोगे आहे.
एडवर्ड स्नोडेनच्या या पुस्तकामधून इंटरनेट आणि मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आजच्या पिढीसमोरील धोक्यांचीही तीव्रतेने जाणीव झाल्याविना राहात नाहीत. स्नोडेन लक्षात आणून देतो की इंटरनेट हे सर्वार्थाने अमेरिकन आहे. संगणकात वापरल्या जाणार्या चीपपासून हार्डवेअरपर्यंत आणि सॉफ्टवेअरपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंत बलाढ्य अमेरिकी कंपन्यांची त्यावरील मालकी आणि त्यांचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांशी असलेले लागेबांधे आपल्या प्रत्येकाच्या प्रायव्हसीसाठी घातक आहेत. आपल्या प्रत्येक हालचालीची माहिती त्याद्वारे मिळवता येऊ शकते. एखादी व्यक्ती कशी आहे, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, तिचे आचारविचार काय आहेत, तिचा वावर कुठे कुठे असतो, ती काय करते हे सगळे बारीकसारीक तपशील जगाच्या दुसर्या कोपर्यात बसून कोणीही अभ्यासू शकतो आणि त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करू शकतो. मोबाईल किंवा संगणकावरील कोणतीही फाईल आपल्याला काढून टाकायची असेल तर आपण ‘डिलीट’ हा विकल्प वापरतो. परंतु आपण अशा प्रकारे डिलीट केलेली फाईल प्रत्यक्षात नष्ट होत नसते. ‘डिलीट’ करताच केवळ ‘फाईल टेबल’ मधील त्या फाईलची नोंद तेवढी काढून टाकली जात असते. एखाद्याला ती फाईल हस्तगत करायची असेल तर ते सहजशक्य असते याकडेही स्नोडेनने लक्ष वेधले आहे. आधुनिक युगातील ही मानवी असुरक्षितता जगाच्या ध्यानात आणून देण्याचे काम स्नोडेनने केले. त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरावे गोळा केले आणि पर्दाफाश केला. त्याचे फळ म्हणून त्याला देशोदेशी पलायन करावे लागले. अमेरिकेने त्याला देशद्रोही ठरवले, त्याला कोणी आश्रय देऊ नये यासाठी जंग जंग पछाडले. परंतु मानवी स्वातंत्र्यासाठी त्याच्या पाठीशी निरपेक्ष भावनेने उभे राहणारे लोकही देशोदेशी होते. सर्वस्वावर पाणी सोडून स्नोडेनने मानवतेच्या भल्यासाठी जे काही उघड केले त्यातून जग सतर्क होण्यास मदत झाली. खुद्द आपल्या वैयक्तिक हक्कांप्रती सजग असणारी अमेरिकी जनता जागी झाली. ही सगळी थक्क करणारी कहाणी या अतिशय वाचनीय आत्मचरित्रातून साकारली आहे. या पुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याची शैली. ती अतिशय खुसखुशीत आहे आणि त्याच बरोबर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या तपशिलाचे स्पष्टीकरणही वेळोवेळी केलेले असल्याने सामान्य वाचकांनाही ती गुंतागुंत समजून घेणे सोपे होते. जगासमोर आणायची गोपनीय माहिती तो जगातील सर्वांत अत्याधुनिक गुप्तचर यंत्रणेला कानोकानी कळू न देता कशा प्रकारे गोळा करतो, बाहेर आणण्यात यशस्वी होतो आणि पत्रकारांपर्यंत पोहोचवतो हा या आत्मकथेतील सर्वांत थरारक भाग आहे. हॉंगकॉंगमधील पलायन, तेथे अमेरिकी पत्रकारांना भेटीसाठी दिलेले निमंत्रण, त्यानंतर काही अभ्यासू पत्रकारांनी त्याच्या हाकेला दिलेला प्रतिसाद आणि त्यानंतर झालेला अमेरिकी गुुप्तचर यंत्रणांची झोप उडवणारा गौप्यस्फो हा या पुस्तकातील कळसाध्याय म्हणावा लागेल. इक्वेडोरमध्ये राजाश्रय घेण्यासाठी रशियामार्गे जात असतानाच अमेरिका त्याचा पासपोर्ट रद्द करते. त्यामुळे जवळजवळ चाळीस दिवस रशियातील विमानतळावरच काढण्याची वेळ त्याच्यावर ओढवते. या सगळ्या पेचप्रसंगांना निधडेपणाने सामोरे गेलेल्या स्नोडेनचे कौतुक वाटते.
स्नोडेनच्या या गौप्यस्फोटानंतर जग सतर्क झाले खरे, परंतु आजही भारतासारख्या देशामध्ये आपण ज्या असुरक्षित रीतीने मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करतो ते पाहिल्यास स्नोडेनला जाणवलेला धोका टळला आहे असे बिलकूल म्हणता येणार नाही. प्रत्येक मोबाईलवरची ‘गुगल ऍक्टिव्हिटी’ तपासाल तर दिवसभरात तुम्ही कुठे कुठे गेलात, किती वेळ थांबलात, काय केलेत, कोणाला भेटलात, इंटरनेटवर काय शोधलेत, कोणती गाणी ऐकलीत, कोणते फोटो घेतलेत, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, दिनक्रम काय आहे, तुमचे कुटुंबातील सदस्य कोण आहेत ह्या सगळ्या माहितीचा ओघ दूर कुठेतरी विदेशात असलेल्या सर्व्हरवर क्षणाक्षणाला ओतला जातच असतो. या माहितीचा व्यावसायिक कारणांसाठी वापर तर हरघडी होतच असतो. त्यामुळे स्नोडेनने आपले जीवन पणाला लावून हे सगळे उजेडात आणले तरी त्यातून काय निष्पन्न झाले हा प्रश्न मागे उरतोच. काही असो, या वर्षांतील आतापावेतो मी वाचलेले हे सर्वांत वाचनीय आणि उद्बोधक पुस्तक आहे हे मात्र निःसंशय!