एटीपी पुरस्कारांवर फेडररची छाप

0
55

जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने एटीपी वर्ल्ड टूर सोहळ्यात तीन पुरस्कार आपल्या नावे केले. खिलाडूवृत्तीसाठीचा स्टीफन एडबर्ग पुरस्कारासह फेडररने सलग १५व्या वर्षी ‘एटीपी फॅन्स फेव्हरिट’ पुरस्कार जिंकला. टेनिस जगतातील त्याच्या सहकार्‍यांनी त्याची वर्षातील सर्वोत्तम पुनरागमन केलेला खेळाडू म्हणूनही निवड केली.

‘सर्वोत्तम पुनरागमन’च्या अंतिम यादीत केव्हिन अँडरसन, फिलिप क्राजिनोविच, सेड्रिक मार्सेल स्टेेबे, यांको टिपसेरविचसह जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या राफेल नदालचे नावदेखील होते. परंतु, फेडररने या सर्वांवर कुरघोडी करत बाजी मारली. खिलाडूवृत्तीसाठी फेडररने तब्बल १३व्या वेळेस व सलग सातव्यांदा आपले वर्चस्व सिद्ध केले. पुनरागमनासाठीचा पुरस्कार मात्र त्याला पहिल्यांदाच प्राप्त झाला. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी मागील वर्षीच्या शेवटच्या सहामाहीत टेनिसपासून दूर राहिलेल्या फेडररने पुनरागमन केल्यानंतर अल्पावधीत एटीपी क्रमवारीत द्वितीय स्थानापर्यंत मजल मारली होती. स्पर्धात्मक टेनिसमध्ये परतल्यानंतर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन व विंबल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांसह एकूण सात स्पर्धा जिंकत सनसनाटी कामगिरी केली आहे. तब्बल १९ ग्रँडस्लॅम विजेतेपदे नावावर असलेला फेडरर पुढील आठवड्यापासून लंडनमध्ये सुरू होणार्‍या एटीपी टूर फायनल्समध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेसाठी त्याचा बोरिस बेकर गटात समावेश करण्यात आला असून या गटात आलेक्झांडर झ्वेरेव, मरिन चिलिच व जॅक सॉक यांचा समावेश आहे. रविवारी सुरू होणारी ही स्पर्धा १९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.