इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमातील महत्त्वाच्या सामन्यात चेन्नईन एफसीने एटीके एफसीवर ३-१ असा दमदार विजय मिळवित बाद फेरीच्या दिशेने सुरु असलेली आगेकूच कायम राखली.
विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर मध्यंतरास चेन्नईनकडे २-१ अशी आघाडी होती. सातव्याच मिनिटाला ब्राझीलचा रॅफेल क्रिव्हेलारोने खाते उघडले. माल्टाचा आंद्रे शेम्ब्रीने (३९वे मिनिट) दुसरा गोल केला. भरपाई वेळेत लिथुआनियाचा नेरीयूस वॅल्सकीस (९०+ ४) याने लक्ष्य साधले. एटीकेचा एकमेव गोल फिजीचा खेळाडू रॉय कृष्णा (४०वे मिनिट) याने केला. चेन्नईनने १६ सामन्यांत सातवा विजय मिळविला असून चार बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २५ गुण झाले. त्यांनी ओडिशा एफसीला (१७ सान्यांतून २४) मागे टाकले. आता चेन्नईयीनचा पाचवा क्रमांक आहे. मुंबई सिटी एफसी (१७ सामन्यांतून २६) चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईनचा एक सामना बाकी आहे.
एटीकेचे बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की झाले आहे, पण गोव्याला मागे टाकून आघाडी घेण्यासाठी त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल. एटीकेला १७ सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला असून दहा विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले. गोव्याचे १७ सामन्यांतून ३६ गुण आहेत.
खाते उघडण्याची शर्यत चेन्नईनने जिंकली. सातव्याच मिनिटाला त्यांना यश आले. एटीकेकडून पास चुकताच चेन्नईनच्या बचाव फळीतील एली साबियाने चेंडूवर ताबा मिळविला. त्यावेळी क्रिव्हेलारो एकटा नेटच्या दिशेने मुसंडी मारत होता. पास मिळताच त्याने पेनल्टी क्षेत्रातून अचूक फटका मारत एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला चकविले. त्यानंतर चेन्नईनचा दुसरा गोल कॉर्नरवर झाला. मध्य फळीतील अनिरुद्ध थापाने घेतलेल्या कॉर्नरवर शेम्ब्रीने अफलातून हेडिंग केले. चेंडूच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे अरिंदम चकला. एटीकेने प्रतिआक्रमण रचत खाते उघडले आणि पिछाडी कमी केली. जेव्हीयर हर्नांडेझच्या लांब पासवर कृष्णाने फिनिशींग केले. त्यावेळी चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथ पुढे सरसावला, पण त्याचा अंदाज चुकला.