येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये स्कीमर उपकरण बसवून बँक ग्राहकांची गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका विदेशी नागरिकाला पणजी पोलिसांनी काल अटक केली.
ऍलेक्स पेट्रीका (२८) वर्षे असे अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकाचे नाव असून तो रुमानियाचा नागरिक असून कोलवा मडगाव येथे राहत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी संध्याकाळी ५.४५ ते रात्री ९.४५ यावेळेत पंजाब बँकेच्या एटीएममध्ये अज्ञान व्यक्तीने स्कीमर बसवून एटीएम कार्ड ग्राहकांची गोपनीय माहितीची चोरी केली आहे, अशी तक्रार बँकेचे मुख्य व्यवस्थापक संतोष कुमार यादव यांनी पणजी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केली.
त्यानंतर पणजी पोलिसांनी सदर एटीएमवर पाळत ठेवली. एटीएमच्या परिसरात एक विदेशी नागरिक संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. सदर विदेशी नागरिकाला पोलिसांनी हटकल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ‘त्या’ विदेशी नागरिकांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. संशयित ऍलेक्स याने स्कीमर बसविल्याची कबुली दिली. पोलिसांनी एटीएममध्ये बसविण्यात आलेला स्कीमर ताब्यात घेतला आहे. निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण देसाई तपास करीत आहेत.
दरम्यान, संशयित आरोपी ऍलेक्स याचा पर्वरी येथील कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएममध्ये स्कीमर बसविण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.