‘एक व्यक्ती एक पद’ नियमामुळे फालेरोंना कार्यकारिणीतून वगळले

0
33

>> गोवा प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांचे स्पष्टीकरण

तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना केली जात आहे. तृणमूल कॉंग्रेसने ‘एक व्यक्ती एक पद’ या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांना पुनर्रचना करताना कार्यकारिणीतून वगळण्यात आले. तृणमूलच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये गोव्याला निश्‍चित प्रतिनिधित्व मिळेल, असे स्पष्टीकरण तृणमूल कॉंग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी काल दिले.

लुईझिन फालेरो यांना तृणमूल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना करताना वगळण्यात आल्याने कालपासून राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना किरण कांदोळकर म्हणाले की, तृणमूलच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये गोव्याला निश्‍चित प्रतिनिधित्व मिळणार आहे. राष्ट्रीय कार्यकारी समितीची पुनर्रचना करण्याचे काम सुरू झाले आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ या नव्या नियमामुळे फालेरो यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले होते. फालेरो हे तृणमूलचे राज्यसभा सदस्य आहेत. गोव्यात तृणमूल कॉंग्रेस केवळ निवडणुकीपुरता आलेला नाही. तृणमूल कॉंग्रेस गोव्यात यापुढेही कायम कार्यरत राहणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाणार आहे.