एका गोमंतकीय विद्यार्थ्याची कैफियत

0
396
  • शशिकांत अ. सरदेसाई

मुंबईत इव्हेंट मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेणारा माझा नातू गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाचा अनुभव घेण्यासाठी गोवा मनोरंजन संस्थेकडे आला, परंतु त्याला आलेला अनुभव मात्र कटू होता…

अठ्ठेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली आणि त्या महोत्सवाच्या आयोजनातील त्रुटींबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून अनेक मंडळांनी आपली नाराजी व्यक्त केली. सदर चित्रपट महोत्सव गेली चौदा वर्षे गोव्यात होत आहे. एव्हाना या चित्रपटाची उंची वाढण्याऐवजी खुंटतच चालल्याची जाणीव झाली. याला सर्वस्वी गोवा मनोरंजन संस्थेचे ढिसाळ प्रशासन जबाबदार आहे. धडाकेबाज निर्णय घेऊन दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करून घेण्याची धमक असलेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सामान्य वकुब असलेल्या बेजबाबदार माणसांची नेमणूक गोवा मनोरंजन संस्थेवर कोणत्या निकषांवर केली ते तेच जाणोत!

या महोत्सवाच्या दरम्यान एक पालक म्हणून मला आलेला अत्यंत वाईट अनुभव मला येथे सांगावासा वाटतो. माझा नातू अतुल याच्या बाबतीत गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी मला हा कटू अनुभव दिला ती माझी वैयक्तिक कैफियत मला येथे मांडावीशी वाटते. प्रशासकीय कामाची जाण नसल्यावर काय घडू शकते याचे हे मासलेवाईक उदाहरण.

माझा नातू अतुल हा गोरेगाव – मुंबई येथे नॅशनल ऍकेडमी फॉर इव्हेंट मॅनेजमेंट अँड पब्लिक रिलेशन या संस्थेत एम. बी. ए. च्या दुसर्‍या वर्गात शिकतो. येथील विद्यार्थ्यांना सैद्धान्तिक अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्था आयोजित करीत असलेल्या इव्हेंटस् मध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण घ्यावे लागते. अतुलने गेल्या वर्षात मुंबईतील अनेक इव्हेंटस्‌मध्ये आयोजनात सहभाग घेतला आहे. त्यात डीएनए आयोजित आयपीएल, लाईट क्राफ्ट आयोजित नवरात्रौत्सव, यूबीएम आयोजित इंडेक्स २०१६, एबीईसी आयोजित एस टेक, बुक माय शो आयोजित आयएसएल यासारख्या मुंबईतील नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या कार्यक्रमांच्या आयोजनात त्याने प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.

गोव्यात पणजीत गोवा मनोरंजन संस्था आयोजित करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनात भाग घेऊन एका आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या आयोजनाचा अनुभव गाठीला असावा म्हणून सुट्टीत गोव्यात आल्यावेळी त्याने आपली ही इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. प्रयत्न करूया असे ठरवून मी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांना भेटलो. एम. बी. ए. च्या विद्यार्थ्याला इंटर्न म्हणून घेता येते किंवा नाही याबाबत ते अनभिज्ञ दिसले. तरीही ऑगस्ट महिन्यात अतुलने एक अर्ज संस्थेला पाठवावा, आम्ही विचार करू असे त्यांनी सांगितले. परंतु त्यांना भेटायला जातानाच आम्ही अर्ज घेऊन गेलो होतो. त्यामुळे तो २५ मे २०१७ रोजी त्यांच्या हवाली केला. त्यानंतर त्यांच्याच सांगण्यावरून संस्थेच्या सरव्यवस्थापक मृणाल वाळके यांनाही भेटलो. त्यांना देखील इंटर्नशीपविषयी काही माहित असल्याचे दिसले नाही. त्यांनी एक प्रश्न विचारला की अतुल एम.बी.ए. सरकारी कॉलेजमध्ये करीत आहे का? मी नाही म्हणून सांगितले. त्यांनी आपले वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर (सीईओ) यांना विचारून कळवते असे सांगितले.

चित्रपट महोत्सवाची तारीख जवळ येत चालली होती आणि गोवा मनोरंजन संस्थेकडून अतुलच्या दोन्ही अर्जांना एकही उत्तर मिळाले नव्हते, त्यामुळे चौकशीसाठी मी स्वतः तालक आणि मृणाल यांना प्रत्यक्ष जाऊन अनेकवेळा भेटलो, परंतु नंतर कळवतो यापलीकडे त्यांच्याकडून दुसरे उत्तरच नव्हते. अनेक वेळा भेटून झाल्यावर सरव्यवस्थापक मृणाल यांनी अतुलला तीन महिने प्रशिक्षण घ्यावे लागेल असे सांगितले. तो कॉलेजमध्ये शिकत आहे आणि अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून त्याला इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यासाठी तीन महिने कोणते कॉलेज आपल्या विद्यार्थ्याला सवलत देईल? तरी देखील कॉलेजमध्ये चौकशी केल्यावर आंतरराष्ट्रीय इव्हेंट असल्यामुळे त्याला दोन महिन्यांची सवलत कॉलेजने मंजूर केली.

ही गोष्ट मी ईएसजीच्या सरव्यवस्थापकांच्या कानावर घातल्यावर कॉलेजकडून तसे पत्र घेऊन या म्हणून मला सांगण्यात आले. २० ऑक्टोबर ते २० डिसेंबर असा दोन महिन्यांचा कालावधी सांगण्यात आला. मी अतुलशी संपर्क साधून त्याला कॉलेजमधून अशा प्रकारचे पत्र पाठवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याच्या कॉलेजने २० ऑक्टोबर ते २० डिसेंबरपर्यंत मनोरंजन संस्थेत काम करण्यास ‘ना हरकत दाखला’ दिला, तो मी स्वतः सरव्यवस्थापकांकडे सुपूर्द केला.

२० ऑक्टोबरला मनोरंजन संस्थेत दाखल होण्यासाठी अतुल १८ ऑक्टोबर रोजी गोव्यात आला, परंतु तोपर्यंत मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष किंवा सरव्यवस्थापक यापैकी कोणीही त्याची नेमणूक करण्याविषयी आदेश काढला नव्हता. मध्यंतरीच्या काळात मी पुन्हा पुन्हा सरव्यवस्थापकांना भेटल्यानंतर त्यांनी अतुलच्या कॉलेजला देण्यासाठी एक पत्र दिले होते, परंतु त्यात कॉलेजने दिलेल्या ना हरकत दाखल्यानुसार अतुलला २० ऑक्टोबर ते २० डिसेंबर ऐवजी त्याने १ नोव्हेंबरला हजर व्हावे असे तोंडी म्हणजेच फोनवर मला सांगण्यात आले. त्याप्रमाणे अतुल १ नोव्हेंबर रोजी गोवा मनोरंजन संस्थेत हजर झाला. त्यानंतर त्याला कॉलेजला देण्यासाठी जे पत्र देण्यात आले, त्यात २ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर असा उल्लेख करण्यात आला होता.

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान अतुलने समन्वयक म्हणून आपली सेवा दिली. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि कधी कधी पहाटे तीन वाजेपर्यंत त्याने समन्वयक म्हणून काम केले. परंतु हे करण्यासाठी ना उपाध्यक्षांनी त्याच्यासाठी नेमणूक आदेश काढला, ना सरव्यवस्थापकांनी. अशा प्रकारे २८ रोजी चित्रपट महोत्सवाचा समारोप झाल्यावर अतुल ३० तारखेपर्यंत संस्थेच्या सेवेत होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे मुंबईतील अनेक मातब्बर संस्थांमधून इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या कंपन्यांनी, त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना मानधन किंवा विद्यावेतन आणि प्रमाणपत्रे दिली आहेत, परंतु माझा नातू अतुुल याने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वर नमूद केल्याप्रमाणे सकाळी १० ते रात्री ११ किंवा कधी कधी पहाटे तीन वाजेपर्यंत काम करून देखील त्याला मानधन किंवा कमीत कमी विद्यावेतन देण्याची तसदी मनोरंजन संस्थेच्या प्रशासनाने घेतली नाही. इतकेच नव्हे तर १ महिना काम केलेल्याचे त्याचे हक्काचे प्रमाणपत्रदेखील त्याला ३० तारखेला वा १ डिसेंबरला देण्याची नैतिक जबाबदारी देखील पार पाडली नाही. शेवटी ७ डिसेंबरला त्याला प्रमाणपत्र देण्यात आले आणि ८ डिसेंबरला तो गोवा मनोरंजन संस्थच्या गलथानपणाचा एक कटू अनुभव गाठीस बांधून आपल्या कॉलेजमध्ये हजर होण्यासाठी मुंबईला निघून गेला!