पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अमेरिकेतील सध्याचे ‘मिशन काश्मीर’ पार फसल्याचे दिसते आहे. जेथे जातील तेथे ते काश्मीरबाबत गळा काढत आहेत आणि येत्या शुक्रवारी संयुक्त राष्ट्र आमसभेमध्येही काश्मीरचा राग पुन्हा आळवणार आहेत, परंतु जगातील कोणत्याही देशाकडून त्यांच्या त्या अकांडतांडवाला त्यांना अपेक्षित असलेले समर्थन मिळू शकलेले नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काश्मीरबाबत मध्यस्थीची भाषा केली असली तरी केवळ भारत आणि पाकिस्तानला हवे असेल तरच आपण मध्यस्थी करू अशीही सारवासारव त्यांनी आता चालवली आहे. पंतप्रधान मोदींसमवेत त्यांनी ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात घेतलेला उत्साही सहभाग, तेथे इस्लामी दहशतवादाविरुद्ध केलेली थेट टिप्पणी, इम्रान खानच्या काश्मीरबाबतच्या विनवण्यांना सतत दिलेला थंडा प्रतिसाद, काश्मीरवर प्रश्न विचारणार्या पाकिस्तानी पत्रकारांची सरळसरळ उडवेलली खिल्ली हे सगळे पाहिले तर ट्रम्प या विषयात पाकिस्तानला गांभीर्याने घेऊ इच्छित नाहीत हेच अधोरेखित झाले आहे. अर्थात, पाकिस्तान विरोधात भारताचे थेट समर्थन करायलाही ते पुढे आलेले नाहीत. मोदींसमवेत द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकारांना जेव्हा ते सामोरे गेले तेव्हा पाकिस्तानबाबतच्या प्रश्नावर त्यांनी इराणचा विषय आपल्या प्राधान्याचा असल्याचे सांगितले आणि पाकिस्तानी दहशतवादाचा समाचार घेण्यास मोदी समर्थ असल्याची टिप्पणीही केली. याचाच अर्थ पाकिस्तानने अमेरिकेला काश्मीरच्या विषयात गुंतवण्याचा कितीही आटापिटा केला तरी ट्रम्प त्यात लुडबूड करू इच्छित नाहीत असाच घ्यावा लागतो. अर्थात, अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या थंड्या प्रतिसादाची कारणे स्पष्ट आहेत. भारत ही जगातील एक महत्त्वाची उभरती अर्थव्यवस्था आहे. एकशे तीस कोटींची ही विशाल बाजारपेठ, भारताचे आजच्या जागतिक राजकारणातील महत्त्वपूर्ण स्थान या सगळ्याकडे कानाडोळा करून पाकिस्तानसारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दिवाळखोरीकडे वाटचाल करणार्या आणि सातत्याने दहशतवाद्यांची पाठराखण करीत आलेल्या देशासाठी अमेरिका आपले वजन खर्ची घालू इच्छित नाही. दहशतवादाच्या झळा अमेरिकेनेही यापूर्वी ९/११ च्या वेळी सोसल्या आहेत आणि आजही त्याचा सर्वाधिक धोका अमेरिकेला आहे. मोदी म्हणाले त्याप्रमाणे ९/११ असो अथवा २६/११ असो, त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचतात हे ट्रम्प यांनाही पुरेपूर ठाऊक आहे. केवळ अफगाणिस्तानच्या विषयात अमेरिकेचा पाय अडकलेला असल्याने आणि चीन पाकिस्तानशी वाढती जवळीक साधत असल्यानेच ट्रम्प पाकिस्तानविरुद्ध सध्या काही थेट बोलायला तयार नाहीत एवढेच. भारताशी अमेरिकेचे वाढते संरक्षणविषयक सहकार्य, ऊर्जा व अन्य क्षेत्रांमध्ये, व्यापार उदिमामध्ये, नव्या गुंतवणुकीमध्ये दोन्ही देशांमधील वृद्धिंगत होत चाललेले संबंध या सर्वाचे भान अमेरिकेला आहे आणि ही मैत्री तिच्याही हिताची आहे. त्यामुळे इम्रान तूर्त पूर्ण एकाकी पडले आहेत. ‘युद्धाला सुरुवात करण्याखेरीज बाकीचे सर्व पर्याय आम्ही अवलंबतो आहोत. त्याहून आमच्याकडे आणखी पर्याय तरी काय आहे?’ असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांनी काढले, त्याचे कारण तेच आहे. ‘काश्मीरींबाबत भारताने जे चालवले आहे, तेच आठ अमेरिकी नागरिकांविरुद्ध झाले असते तरी अमेरिका इतकीच शांत राहिली असती काय?’ असे ते म्हणाले ते उद्गार त्यांच्या सध्याच्या निराशेतूनच आले आहेत. मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर दारुण अपयश आल्याने काश्मीरचा विषय इतर प्रकारे धगधगता ठेवण्यासाठी आता पाकिस्तान जंग जंग पछाडेल. पाकव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो सशस्त्र दहशतवादी भारतात घुसण्यासाठी सज्ज असल्याची पक्की खबर मिळाली आहे. चिनी द्रोनच्या मदतीने खलिस्तानवाद्यांसाठी पंजाबात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे फेकली गेल्याचे उघडकीस आले आहे. काहीही करून भारतामध्ये अशांतता माजवण्यासाठी पाकिस्तान उतावीळ झाला आहे. जागतिक पातळीवर काश्मीरच्या निमित्ताने भारताविरुद्ध समर्थन मिळवण्याचा इम्रान खान यांचा आटापिटा पार फसला असल्याने सध्या पाकिस्तानातच त्याचे हसे होते आहे. आपल्या जनतेचा रोष टाळण्यासाठी आता इतर मार्गांनी भारताच्या कुरापती काढण्याला इम्रान सरकार प्राधान्य देईल हे स्पष्टच आहे. त्याचा अत्यंत कडवा मुकाबला करण्याच्या तयारीत भारत असेल यातही काही शंका नाही. संयुक्त राष्ट्र आमसभेतील आपल्या भाषणात मोदी पाकिस्तानऐवजी इतर जागतिक महत्त्वाच्या विषयांना अधिक महत्त्व देतील, परंतु पाकिस्तान मात्र काश्मीरचाच राग आळवता ठेवील अशी चिन्हे आहेत. परंतु जागतिक पातळीवर पाकिस्तान एकाकी पडलेला असल्याने काश्मीरबाबत कितीही अकांडतांडव केले तरी त्यातून इम्रान यांच्या हाती काहीही लागणारे नाही हेही तितकेच खरे आहे. काश्मीर हळूहळू का होईना निवळते आहे. ते लवकर पूर्वपदावर यावे यासाठी संपूर्ण देश एकमुखाने प्रयत्नशील राहणे हीच या घडीची खरी गरज आहे.