दिल्लीतील इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमागील शुक्लकाष्ठ संपण्याचे काही नाव घेत नाही. गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या रोबोडॉगवरुन महाभारत झाल्यानंतर काल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समिटमध्ये टी-शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांकडून ‘पीएम ईज कॉम्प्रमाईज्ड’ (पंतप्रधानांनी तडजोड केली) अशा घोषणा देण्यात आल्या. या गोंधळानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट समिट सुरू असलेल्या भारत मंडपम येथे शुक्रवारी दुपारी युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते टी-शर्ट काढूनच आतमध्ये घुसले. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्तकर्ते आणि येथील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.
कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी येथून दहा जणांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी यावेळी पीएम इज कॉम्प्रमाईज्ड अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटमध्ये गोंधळ घातल्यानंतर कार्यक्रम ठिकाणाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.