‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये जगभरातील एआय कंपन्यांच्या सीईओंना पंतप्रधानांनी केले संबोधित
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील एआय कंपन्यांच्या सीईओंना काल संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) भारताचे ‘मानव’ (च-अ-छ-अ-त) हे व्हिजन जगासमोर मांडले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रगती करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल देखील भाष्य केले.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, मी एआयसाठी मानव (च-अ-छ-अ-त) व्हिजन सादर करतो. ‘मानव’ चा अर्थ होतो ह्यूमन, आणि मानव व्हिजन सांगते की, एम – मॉरल आणि इथिकल सिस्टम्स, म्हणजे एआय हे नैतिक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असले पाहिजे. ए – अकाउंटेबल गव्हर्नन्स म्हणजेच पारदर्शक नियम आणि कठोर देखरेख. एन – राष्ट्रीय सार्वभौमत्व (नॅशनल सॉवरनिटी) म्हणजे ज्याचा डेटा, त्याचा अधिकार. ए – ॲक्सेसेबल आणि इन्क्लुजिव्ह म्हणजे एआय ही कोणाचीही मक्तेदारी नाही, तर मल्टिप्लायर बनावे. व्ही – वॅलिड आणि लिजिटिमिट म्हणजे एआय हे कायदेशीर आणि पडताळणी करता येणारे असावे. भारताचे हे ‘मानव’ व्हिजन 21 व्या शतकातील एआय-आधारित जगात मानवतेच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचा दुवा बनेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काही दशकांपूर्वी जेव्हा इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हा यामुळे किती नोकऱ्या तयार होतील याबद्दल कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. हीच गोष्ट एआयमध्ये आहे. आज कल्पना करणे कठीण आहे की आगामी काळात कशा नोकऱ्या तयार होतील. एआयमध्ये कामाचे भविष्य पूर्वनिर्धारित नाही, हे आपल्या निर्णयांवर आणि आपल्या कृतीवर आधारित आहे. मला वाटते की फ्यूचर ऑफ वर्क ही आपल्यासाठी नवीन संधी आहे. हे युग मानव आणि इंटेलिटन्स सिस्टिम यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
मानव हा फक्त एक कच्चा माल बनून राहू नये, यासाठी एआयचे लोकशाहीकरण होणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
एआय वर्ल्डमध्ये ‘कोल्ड वॉर’!
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026′ मध्ये एक अत्यंत विचित्र आणि चर्चास्पद क्षण पाहायला मिळाला. जगातील दोन सर्वात मोठ्या एअय कंपन्यांचे प्रमुख म्हणजे ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन आणि अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई हे एकाच मंचावर आले खरे, पण त्यांच्यातील व्यावसायिक वैमनस्य कॅमेरासमोर लपून राहिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर मंचावर उपस्थित असलेल्या जागतिक टेक लीडर्सचा एक ग्रुप फोटो काढला जाणार होता.
यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या दोन्ही बाजूला असलेल्या सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमॅन यांचे हात हातात घेऊन ते हवेत उंचावले. परंपरेनुसार मंचावरील सर्वांनी एकमेकांचे हात पकडून एकतेचा संदेश देणे अपेक्षित होते. मात्र, सॅम ऑल्टमॅन आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले डारियो अमोदेई यांनी एकमेकांचा हात पकडण्यास नकार दिला. एकमेकांचे हात धरण्याऐवजी दोघांनीही स्वतंत्रपणे आपल्या मुठी हवेत उंचावल्या. या ‘ऑकवर्ड’ क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, याला एआय वर्ल्डमधील ‘कोल्ड वॉर’ म्हटले जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी देखील काही क्षण या प्रकाराकडे पाहत होते.