ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील ब्रिसबेन कसोटीच्या दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. दोन्ही संघाचे मिळून तब्बल दहा फलंदाज तंबूत परतले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया ४ बाद १६५ अशा धावसंख्येवर खेळत होती. अजून ते १३७ धावांनी पिछाडीवर आहेत.
पहिल्या दिवसाच्या ४ बाद १९६ धावांवरून पुढे खेळताना काल दुसर्या दिवशी इंग्लंडचा डाव ११६.४ षट्कांत ३०२ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या डेव्हिड मलाने काल आपले अर्धशतक पूर्ण केले. ११ चौकारांच्या सहाय्याने ५६ धावांची अर्धशतकी खेळी करून तो बाद झाला. मोईन अली ३८ तर स्टुअर्ट ब्रॉडने २० धावांचे योगदान दिले. जॉनी बेअरस्टोव्ह (०), ख्रिस वोक्स (०), जेक बॉल (१४) हे झटपट तंबूत परतले. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. नाथन लियॉनने २ तर जोस हॅझलवूडने १ बळी मिळविला.
प्रत्युत्तरात खेळताना दुसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ६२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १६५ अशी धावसंख्या उभारली आहे. कॅमेरून बँक्रॉफ्ट (५), उस्मान ख्वाजा (११), डेव्हिड वॉर्नर (२६) आणि पीटर हँड्सकॉम्ब (१४) हे ठराविक अंतराने तंबूत परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती एकवेळ ४ बाद ७६ अशी बिकट झाली होती. परंतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना शॉन मार्शच्या साथीत ८९ धावांची अविभक्त भागीदारी करताना दिवसअखेरपर्यंत आणखी गडी बाद होऊ दिले नाहीत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ ६ चौकारांनिशी ६४ तर मार्श ७ चौकारांच्या सहाय्याने ४४ धावांवर नाबाद खेळत होते. इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली आणि जेक बॉल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.