ऍप आधारित टॅक्सीसेवा ही काळाची गरज

0
39
  • – गुरुदास सावळ

मुुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेतली पाहिजे. ऍपवर आधारित टॅक्सीसेवा देणार्‍या लोकांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही सरकारने दिली पाहिजे. ऍपवर आधारित टॅक्सीसेवा ही आज काळाची गरज आहे.

ऍपवर आधारित टॅक्सीसेवा गोव्यात पुढील महिन्यात चालू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वाहतूकमंत्री माविन गुदिनो यांनी केली आहे. अर्थातच गोव्यातील टॅक्सीवाल्यांनी नेहमीप्रमाणे त्याला विरोध केला आहे. या टॅक्सीसेवेमुळे गोव्यातील मूळ टॅक्सीवाल्यांचे नुकसान होईल असे त्यांचे म्हणणे आहे. मोप विमानतळ चालू झाल्यावर हजारोंच्या संख्येने पर्यटक गोव्यात येतील. त्यांची सेवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टॅक्सी लागणार आहेत. सध्या गोव्यात जेवढ्या टॅक्सी आहेत, त्याच्या तीनपट टॅक्सी लागणार आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात टॅक्सी उपलब्ध करणे गोमंतकीय टॅक्सीमालकांना शक्य आहे काय?
गोव्यातील टॅक्सीमालकांच्या एक ते दोन टॅक्सी आहेत. बहुतेक मालकांची एकच टॅक्सी आहे. त्यामुळे गोव्यातील टॅक्सींची वाढती गरज भागविण्यासाठी त्या बाहेरून आणाव्या लागणार हे उघड आहे. गोमंतकीय ही वाढती गरज भागवू शकले तर अतिउत्तम. तशी तयारी त्यांनी दाखविली पाहिजे. मोप विमानतळामुळे जो विकास होणार आहे, त्याचा सर्वांत जास्त लाभ पेडणे तालुक्यातील लोकांना व त्या पाठोपाठ मूळ गोमंतकीयांना झाला पाहिजे. गोमंतकीय गरज भागवू शकले नाहीत तरच गोव्याबाहेरील लोकांना संधी दिली पाहिजे.

पर्यटकांना खेचण्यासाठी सरकारला बरेच प्रयत्न करावे लागतील. त्यात टॅक्सीसेवा ही सर्वांत महत्त्वाची आहे. गोव्यातील टॅक्सीचालक प्रवाशांना लुटतात अशी जगभर कुप्रसिद्धी आहे. त्याला आपले लोकच जबाबदार आहेत. पर्यटकांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने मीटर बसविण्याचा आदेश काढला. त्यालाही टॅक्सीमालकांनी कडाडून विरोध केला. आंदोलने करण्यात आली. त्यामुळे सरकारने माघार घेतली.
पर्यटन व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली तेव्हा अनेक वर्षांनंतर डिजीटल मीटर बसविण्यात आले. मात्र, मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी चालूच ठेवली गेली आहे. प्रवाशांची लूट चालूच राहिली. पर्यटकांना चांगली वाहतूक सेवा देण्यासाठी चालू करण्यात आलेल्या गोवा माईल्सच्या टॅक्सीचालकांना अडवून मारहाण करण्यात आली. मारहाणीचे हे प्रकार काही चालकांनी केले, पण बदनामी सगळ्यांची झाली.

टॅक्सीमालक संघटनेने या हल्ल्यांचा निषेध केला नाही किंवा त्याला आक्षेपही घेतला नाही. अशा प्रकारच्या हल्ल्यांची गोवा पोलिसांनीही गंभीर दखल घेतली नाही. हल्ला करणार्‍या चालकांना कठोर शिक्षा झाली असती तर हल्ल्यांचे प्रमाण वाढले नसते. आता तरी या प्रकरणात पोलिस ठाम राहतील अशी अपेक्षा आहे.
अर्थात, गोवा सरकारने कडक भूमिका घेतली तरच पोलीस अशा प्रकरणात कठोर भूमिका घेतील. अन्यथा काही लोकांना फुकटचा मार खावा लागेल. एखाद्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.

पोलिसांना स्वातंत्र्य दिले तर कोणाला कशी वागणूक द्यायची हे पोलिसांना पुरेपूर माहीत असते. हल्ला करणारा पहिला चालक चार दिवस तुरुंगात राहिला तर असे हल्ले करण्याचे धाडस करण्यास दुसरा कोणी पुढे येणार नाही. त्यामुळे ऍप आधारित टॅक्सीसेवेला विरोध करणार्‍यांना कठोर शिक्षा होईल याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी तशी तयारी ठेवली पाहिजे.

गोव्याबाहेरील टॅक्सीसेवा गोव्यात आलेल्या नको असल्यास गोव्यातील टॅक्सीसेवेत सुधारणा झाली पाहिजे. यापुढे कोणाही पर्यटकांची गोव्यात फसवणूक होणार नाही याची हमी मालकांनी दिली पाहिजे. पर्यटक व स्थानिक प्रवाशांना योग्य दरात टॅक्सी सेवा उपलब्ध करण्यासाठी ऍप आधारित टॅक्सीसेवा गोव्यातील टॅक्सी मालकांनी लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. गोव्यात ज्या आठ हजार टॅक्सी आहेत, त्या सर्वांनी संघटित होऊन ही सेवा उपलब्ध केली तर ऊबेर किंवा कुबेर सेवा गोव्यात येणार नाहीत.
गोव्यातील सगळे धंदे व्यवसाय आज बिगरगोमंतकीयांच्या हातात गेले आहेत. खासगी बससेवेचे मालक गोमंतकीय असले तरी चालक व वाहक हे बिगरगोमंतकीय आहेत. मासळी, भाजी व्यवसाय याच लोकांच्या हातात गेला आहे. बांधकाम व्यवसाय तर पूर्णपणे बिगरगोमंतकीयांच्या हातात आहे.

गोव्यातील सर्व मोठ्या गावांत आणि शहरांत सकाळी बांधकाम कामगारांचे बाजार भरतात. केवळ कामगारच नव्हे तर सर्व कंत्राटदार ही बिगरगोमंतकीय आहेत. रिव्हल्युशनरी गोवन्स पक्षाने कितीही नारे लावले तरी बिगरगोमंतकीयांशिवाय आमचे पानही हलत नाही ही वस्तुस्थिती आहे.
गोवा मुक्तीनंतर गोव्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. लोकांचे राहणीमान सुधारले. त्यामुळे कष्टांची कामे कोणी करीत नाही. गोव्यातील बर्‍याच टॅक्सीमालकांकडे सध्या बिगरगोमंतकीय चालकच आहेत. त्यामुळे ऍप आधारित टॅक्सी गोव्याबाहेरुन आणू नका या मागणीला काहीच अर्थ नाही.
गोव्यातील टॅक्सीमालकांनी या गोष्टी विचारात घेऊन आपल्या धोरणात बदल केला पाहिजे. ऍपवर आधारित टॅक्सी नको ही भूमिका बदलत्या वातावरणात टिकून राहणार नाही तसेच व्यवहार्यही नाही.

ऍप आधारित टॅक्सीसेवा चालू करण्याची जी घोषणा सरकारने केली आहे ती योग्यच आहे. मात्र, गोव्यातील टॅक्सीमालकांना हे नको असल्याने ते या टॅक्सीसेवा देणार्‍या लोकांविरुद्ध आवाज उठविणार हे नक्की आहे. मोप विमानतळावर येणार्‍या पर्यटकांची अडवणूक होणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागेल.
मोप विमानतळ येत्या १९ डिसेंबरला गोवा मुक्तीदिनाच्या शुभमुहूर्तावर चालू होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे हा विमानतळ चालू होण्यापूर्वीच टॅक्सीमालकांचा हा प्रश्न सुटला पाहिजे. मोप विमानतळाजवळ अनेक सप्ततारांकित हॉटेले उभी राहणार आहेत. मात्र, त्याला आणखी काही वर्षे लागतील.

विमानतळ नवा असल्याने सुरुवातीला बर्‍याच अडीअडचणींना तोंड द्यावे लागेल. त्यात टॅक्सीचालकांच्या प्रश्नांची भर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मुुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेतली पाहिजे. ऍपवर आधारित टॅक्सीसेवा देणार्‍या लोकांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही सरकारने दिली पाहिजे. ऍपवर आधारित टॅक्सीसेवा ही आज काळाची गरज आहे.
संपूर्ण जगभर चालणारी ही सेवा गोव्यात नको असे आम्ही म्हणू शकत नाही. त्यामुळे ही सेवा लवकरात लवकर चालू झाली पाहिजे. स्पर्धेच्या या युगात गोमंतकीय टॅक्सीमालक मागे राहून चालणार नाही. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गोव्यातील टॅक्सीवाल्यांनी स्वतःची ऍप सेवा चालू केली पाहिजे. ऍप आधारित टॅक्सीसेवा ही काळाची गरज आहे.