ऋतुगंध पाऊस

0
171
  •  पौर्णिमा केरकर

आभाळ भरलेलेच राहिले. रिते होणार होणार म्हणून कितीतरी वेळ झाडांनी वाट पाहिली… तिन्हीसांज गडद होत गेली. वार्‍याची हलकी लहर घरभर कवठी चाफ्याचा गंध घेऊन नाचली. गॅलरीचा दरवाजा उघडला तर कदंब फुलांचा भपका एकदम आत शिरला…

तिन्हीसांज दाटून आली होती. आभाळात जमलेले आषाढघन आता कधीही… कोणत्याही क्षणी बरसू लागतील असेच काहीसे चित्र अवतीभवती दिसत होते. झाडेच जणू काही मेघांचा भार डोक्यावर घेऊन उभी होती. तो धुवांधार कोसळणार… आणि तहानलेली ती मेघांना मनसोक्त अंगावरून कोसळू देणार… तो बरसायचीच जणू काही त्यांची प्रतीक्षा होती. पानन्‌पान कोणीतरी ‘स्टॅच्यू’ म्हटल्याप्रमाणे स्तब्ध! वाराही कुणीकडे गेलेला… उगाच झाडांची तंद्री भंग व्हायला नको म्हणून असेल कदाचित- त्याने हा समंजसपणा दाखविला होता. एवढ्यातच तो आला… शिडशिडला फक्त… झाडे शहारली… रोम रोम पुलकित झाला. काळोख अजूनही दाटलेलाच! त्याला धुवाधार कोसळून मोकळं व्हायचं नव्हतं. त्याची लहर काही वेगळीच होती. झाडांशी सलगी करण्याच्या नादात तर तो त्यांना नुसताच खिजवत होता. मात्र बरसत नव्हता… कोसळतही नव्हता… रिमझिमतही नव्हता… एक उदासीनता… आतून… आतून… मोकळंढाकळं व्हायचं होतं, पण नाही जमलं. तो त्या दिवशी नुसताच शीड…शीड…शिडशिडला आणि गपगुमान गेला… आभाळ भरलेलेच राहिले. रिते होणार होणार म्हणून कितीतरी वेळ झाडांनी वाट पाहिली… तिन्हीसांज गडद होत गेली. वार्‍याची हलकी लहर घरभर कवठी चाफ्याचा गंध घेऊन नाचली. गॅलरीचा दरवाजा उघडला तर कदंब फुलांचा भपका एकदम आत शिरला… ऋतुगंध पाऊस माझ्या घरात… घराच्या कोपर्‍या कोपर्‍याला स्पर्शून गेला.
आषाढ मासाचे सुरुवातीचे काही दिवस कोरडेच तर गेले.

या वेळेस का कुणास ठाऊक, पाऊस हवा तसा मनाला भावला नाही. दाट भरून राहिलेला… त्याला व्यक्तच व्हावेसे वाटत नसावे का… असे असूनही गारव्याच्या सोबतीने पुढच्या दरवाज्यातून कवठी चाफा तर मागच्या दरवाज्यातून कदंब दरवळत दरवळत घरभर नाचला…
दिसामासी कदंब वाढला तसा कवठी चाफाही ऐन बहरात आला. सोनचाफा वर… वर… खूपच वर वाढत गेला… आता तर त्याची उंची एवढी वाढली की पानाआडून त्याचा बहर नजरेने अनुभवणेही कठीण होऊन बसले आहे. त्या मनाने कवठी चाफ्याने आपल्या सावलीत चटकचांदणीला आरामात विसावा दिला. असे म्हणतात की मोठ्या झाडाच्या सावलीत छोटी झाडे खुरटी होतात… पण चटकचांदणीचे तसे झाले नाही. फुलझाडे असोत की मोठाले वृक्ष- ते वयाने वाढताना अनुभवणे हा एक दुर्मीळ आनंद. ती जेवढी वाढतात, विस्तारतात तितकीच अधिक देखणी दिसतात.

माणसाचे मात्र तसे नाही. त्याचे वय जसजसे वाढते तसतसे शरीरावरील सुरकुत्यांचे जाळे पसरत जाते. ते लपविण्यासाठी मग करावी लागणारी कसरत त्याला कुरूपतेकडेच नेणारी ठरते. झाडांचे असे नसतेच मुळी… ती कोणत्याही ऋतूत सदासतेज असतात. पावसात तर त्यांच्यावरील टवटवी मनाला आगळीवेगळी प्रसन्नता बहाल करते. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कदंब फुलांचा बहर नुसता ओसंडून वाहत असतो. इतके दिवस मनावर एक उदासीन छटा होती. खरेतर महामारीच्या प्रकोपापुढे माणूस हतबल झाला होता, मात्र निसर्गाची धुंदी… त्याचे चैतन्य याच कालावधीत सळसळून उठले. या वर्षी कधी नव्हे इतका कदंब बहरला… आठवड्यापेक्षा जास्त रात्री त्याने गंधाळून टाकल्या. पाऊस झडझडून त्याने अंगावर घेतला. त्याच धुंदीत तो घरभर फिरला. त्याचे असे अनावर होणे… मग पावसालाही मोह आवरला नाही… तो दबदबा कोसळत राहिला… मिट्ट काळोख, डोळ्यात बोटे खुपसली तरी काहीही दिसत नव्हते. तुकतुकीत लंबोड्या पानांच्या आडची पांढुरक्या पिवळट रंगांची फुलं तेवढी त्या कुट्ट काळोखात झळकत होती. यमुना… कालिया… कृष्ण… मुरली… कदंब… अथांग निळाई… काही काही आठवत राहिले…
पावसाच्या आठवणी तशा खूप आहेत. आपल्या लोकगीतांतून तर मालिनींनी त्याला विविध पातळ्यांवर नखशिखांत पारखले होते. जात्यावर बसून दळण दळताना बाहेर पाऊस धाराधारांनी कोसळायचा… तिचं हृदय मात्र परघरी दिलेल्या लेकीच्या आठवणींनी बरसायचे. तिन्हीसांजेला रडण्याची खोटी असायची. भरल्या घरात कातरवेळी रडणार तरी कसे? पण आठवणीच त्या दाटल्या मेघासारख्या… कधीही कोणत्याही क्षणी कोसळणार्‍या…
तिनं मग त्यांना शब्दच दिले…
पाऊस घडोघडी, आदो मिरग पानी करी
माऊली चिंता करी, लेकी उरल्यो परघरी
पावसाला या मालिनींनी सुंदर रूपात आविष्कृत केलेले आहे-
पाऊस झिरीमिरी सुक्या सड्यावरी… असो
पाऊस पडे, पाऊस पडे, वतांबे थेमे… वतांबे थेमे
वनदेवते मायेचे देऊळ बांदला तेचे रतांबे खामे… रतांबे खामे
आषाढ मासात आषाढ पावळीचे गुणगान केलेले आहे. इतर मासापेक्षा आषाढ आणि श्रावण या महिन्यांतील पावसाने संवेदनशील मनाला वर्षानुवर्षे पुरते झपाटून टाकले आहे. कालिदासाचे ‘मेघदूत’ आणि आषाढ मेघ या अनुबंधातून त्यानंतरही किती साहित्य स्फुरावे? धुंद कोमल मनाची ही असोशी कदंब फुलांतून दरवळत घरभर पसरताना वातावरणात तजेला निर्माण झाला. कदंब वृक्षाला अनुभवावे ते आषाढमेघ बरसतानाच्या रात्री… एरव्ही नितळ, शीतल आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याची जाळीदार पाने अनोखी नक्षी रेखाटतात खरी; परंतु आषाढात दाटून आलेल्या मेघांच्या साक्षीला तो गोंडस फुलांनी गच्च भरलेला असतो. त्याचे हे भरलेपण घराला घरपण देते. इतके दिवस पाऊस आठवतच नव्हता… आता मात्र तो नव्याने मनात रुंजी घालू लागलाय. तो आज ऋतुगंध पाऊस होता.

बालपणी अनुभवलेला… आता तर बालपण आठवायला लागले. पावसाळ्यात सगळीच गंधवती फुले रसरसून फुलायची. जाई, मोगरी, जुई, गुलाब, सोनचाफा, प्राजक्त ही त्यात महत्त्वाची फुले. गुलाबाला वेळच्या वेळी छाटून व्यवस्थित आकार दिला की ते भरभरून फुलायचे. रस्त्याने ये-जा करणारी शाळेतली लहानगी आपल्या बाईला- शिक्षिकेला- देण्यासाठी मुद्दामहून तिथे रेंगाळत राहायची. घाबरत घाबरत मग एखादं गुलाब मागायची. दररोज नाही पण आठवड्यात कधीतरी एकदा त्यांना गुलाब फूल दिले जायचे, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून निरागस आनंद झिरपायचा.

गुलाबाचा रंग गुलाबीच होता… त्याचा नाजूक गंध… तसा गंध तर अलीकडच्या काळात हुंगताही आला नाही. केसांत माळला की केस गंधीत व्हायचे… पावसाळ्यात घराची सकाळ या गुलाबाच्या फुलांमुळे सुगंधीत व्हायची, तर तिन्हीसांज मोगरा, जाईजुईच्या गंधाने भारली जायची. जाईचे झुडूप ठेंगणे. तिची कळी नाजूक. गुलाबी पांढुरक्या रंगाच्या कळ्या… तिन्हीसांजेला चारपाच कळ्या जरी उमललेल्या असल्या तरी तिच्या गंधाची तरलता सर्वत्र पसरायची. मोगरा, जाई केसांत माळायाची तर ती संध्याकाळीच!

रात्र घरात शिरण्यापूर्वी गंधवेडात समरसून जायचे ते याच तिन्हीसांजेला. पाऊस मुसळधारांनी कोसळत आहे. पावसामुळे कळ्या काढायच्या राहूनच गेलेल्या… केसांत माळायला तर हवीच म्हणून मग तसेच झिम्माड भिजत कळ्या काढण्यासाठी हात पुढे सरसावतात. शहारा उमटतो सर्वांगावर. अंग सळसळून उठते. पानापानांवरील थेंब झडझडून ओघळतात… मोगरी कळ्यावरील टपोरे थेंब रोमांचित होतात. तरीसुद्धा पाऊस उसंत घेतच नव्हता… तो आता बदाबदा पडतोय… कळ्या काढायच्या राहूनच जातात… घरात जाताना उंबरठ्यावर पाऊल ठेवताक्षणी कळते, अरे! …ऋतुगंध पाऊस तर दरवळतोय… घरात आणि मनातही.