- ज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर
आपण कुठे होतो आणि कुठे येऊन पोहोचलो याचे त्याला आश्चर्यच वाटते. हे सगळे ऋणानुबंध होते. म्हणूनच इतक्या लोकांशी मी जोडला गेलो आणि समाजाप्रति काही चांगले कार्य माझ्या हातून घडू शकले, असे त्याचे मन त्याला सांगत होते.
सुप्रसिद्ध कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांची ‘रमलखुणा’ ही गूढरम्य दीर्घ कथा अनेकांनी वाचली असेल. ही कथा मी तब्बल चाळीस वर्षांपूर्वी वाचली होती. मात्र त्या कथेचे मनावरचे गारुड अद्यापही ओसरलेले नाही. याचे कारण जीएनी जीवनाचे तत्त्वज्ञान या दीर्घ कथेतून मांडले आहे. आपण अनेकदा अहंपणा दाखवतो आणि मी हे केले, ते केले म्हणतो किंवा माझ्यामुळे हे घडू शकले असे म्हणतो आणि केलेल्या कामाचे श्रेय उपटायला बघतो. पण आपण हे विसरतो की या सगळ्याचा कर्ता-करविता कुणी वेगळाच असतो, आपण केवळ निमित्तमात्र! विश्वाच्या त्या नियंत्याने आपल्याकडून ते काम करवून घेतलेले असते. किंबहुना त्याने आपल्याला जन्मच त्या कारणासाठी दिलेला असतो.
रामलाल याची कहाणी काहीशी अशीच आहे. सत्तरच्या दशकात रामलाल बीएस्सी बीएड झाल्यावर खेडेगावातील एका सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला. गाव इतका मागासलेला की गावात ना धड रस्ता ना वाहतुकीची साधने. धुळीच्या मुख्य रस्त्यापासून पांच मैल दूर असलेले हे गाव! त्यामुळे या शाळेत रुजू झालेले सर्व शिक्षक गावातीलच कुणा ना कुणाच्या घरी पेईंगगेस्ट म्हणून रहायचे! रामलालदेखील अशाच एका गरिबाच्या घरी राहिला. ना स्वतंत्र खोली, ना संडास-बाथरूम सगळे व्यवहार उघड्यावर! कोरड्या दिवसात घरासमोरच्या अंगणात पथारी पसरायची आणि पावसाळ्यात पडवीत! रामलाल एका छोट्या शहरातून आलेला होता जिथे सर्व सुविधा उपलब्ध होत्या. तिथल्या खाजगी शिक्षणसंस्थेच्या कटकटीला कंटाळून त्याने ही चालून आलेली सरकारी नोकरी स्वीकारली होती. कारण… एकतर नियमित व वेळेवर वेतन मिळण्याची शाश्वती आणि खाजगी संस्थेत ज्या कटकटी असतात, संस्था चालकांची जी हुजरेगिरी करावी लागते, त्यांच्या दबावाखाली काम करावे लागते ती स्थिती सरकारी शाळेत नसते. रामलाल स्वाभिमानी होता. संस्थाचालकांची मनमानी त्याला बिलकूल खपत नसे. या कारणास्तव रामलाल या सरकारी शाळेत रुजू झाला. मात्र अशा कुग्रामात आपणाला राहावे लागेल याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण आता इलाज नव्हता कारण परतीचे दोर आधीच कापले गेले होते. ‘आता आलीय भोगासी असावे सादर’, ‘चित्ती असू द्यावे समाधान…’ या संतवचनाप्रमाणे जगणे क्रमप्राप्त होते. सुरुवातीचे काही दिवस अत्यंत जिकिरीचे गेले. पण म्हणतात ना की, एकदा कोणत्याही गोष्टीची सवय झाली की सर्व गोष्टी अंगवळणी पडतात. रामलालदेखील याला अपवाद नव्हता. तो गावात रमला. याचे कारण गावातील लोक अडाणी अशिक्षित असले तरी शिक्षकाविषयी त्यांच्या मनात आदर होता. शाळेतील मुले शरीराने आडदांड ओबडधोबड असली तरी गवतावरच्या दवबिंदूसारखी निर्मळ आणि स्वच्छ मनाची होती. ग्रामीण भागातील मुलांच्या मनात शिक्षकांविषयी प्रचंड आदर असतो. शिक्षकांनी केलेली शिक्षा ते मुकाटपणे सहन करतात. पालकही मुलांना शिक्षा केली म्हणून शिक्षकाविरुद्ध तक्रार करीत नाहीत. उलट मुलगा नीट अभ्यास करीत नसेल तर त्याला बदडून काढा असे सांगणारेदेखील पालक असतात. शिक्षा करण्याचा पूर्ण अधिकार पालकांनी शिक्षकाला बहाल केलेला असतो. शहरात मात्र अशा गोष्टींचा बाऊ केला जातो.
रामलाल ज्यांच्या घरी पेईंगगेस्ट होता त्या घरमालकाची मुलगी उपवर झाली होती. दिसायला सुमार परंतु घरदार स्वच्छ राखण्यात तत्पर, स्वयंपाक करण्यात सुग्रण! चार वर्षांपूर्वी याच गावातील सरकारी शाळेतून ती शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाली होती. परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पुढचे शिक्षण घेणे शक्य नसल्याने तिचे शिक्षण थांबले होते. प्रेमाचा मार्ग पोटातून हृदयापर्यंत जातो असे म्हणतात. रामलालच्या बाबतीत असेच घडले आणि रामलाल सुमनच्या प्रेमात पडला. रामलालच्या मनावर त्याच्या शालेय जीवनापासून सानेगुरुजी, वि. स. खांडेकर, रणजीत देसाई यांच्या कथा- कादंबर्यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या कथांमुळे गरिबांविषयी त्याच्या मनात कणव निर्माण झाली होती. भविष्यात गरिबांसाठी काहीतरी करावे अशी ऊर्मी त्याच्या षोडशीय मनात तेव्हाच निर्माण झाली होती. त्यानेही गरिबीचे चटके एकेकाळी सोसले होते. आपण सुमनशी लग्न केले तर एका सुशील व गरीब मुलीचे कल्याण होईल असे त्याच्या मनाने घेतले आणि सुमनविषयी प्रेमापेक्षा ममत्व त्याच्या मनात निर्माण झाले. सुमनच्या आई-वडिलांचा या विवाहाला विरोध असण्याचे कोणतेच कारण नव्हते. कारण एवढे चांगले स्थळ त्यांच्या मुलीला शोधूनही सापडले नसते. विवाह यथासांग पार पडला. रामलाल-सुमनचा संसार सुरू झाला.
करता करता रामलालला त्या शाळेत सात वर्षे पूर्ण झाली. रामलाल शाळेत रुजू झाल्यापासून त्याने या गरीब मुलांसाठी व गावासाठी अनेक उपक्रम सुरू केले. सामुदायिक वनभोजन, जवळच्या परिसरातील सहली, विविध स्पर्धा, रात्रशाळेत पालकांचे वर्ग, अभ्यासात मागे असणार्या मुलांसाठी मोकळ्या वेळेत विशेष मार्गदर्शन, शालान्त वर्गासाठी दीर्घ सुट्टीत पर्यवेक्षण, स्वयंशिक्षण योजना, श्रमदानाने ग्रामसफाई, पायवाटेचे रूपांतर कच्च्या सडकेत इत्यादी कामे त्याने मन लावून केली. गेली तीन वर्षे सातत्याने शाळेचा शालान्त परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आणि रामलालची कीर्ती शिक्षणखात्यात पोहोचली. त्याच दरम्यान त्याला पुत्रप्राप्ती झाली. आता त्याला आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता सतावू लागली. आपला मुलगा याच गावात लहानाचा मोठा झाला तर त्याचे भवितव्य सुखाचे होणार नाही. त्याला उच्च शिक्षण घेण्यास अडचणी येतील. त्यासाठी आपणाला निदान तालुक्याच्या ठिकाणी राहायला हवे असे त्याच्या मनाने घेतले. कर्मधर्मसंयोगाने शिक्षण खात्याने रामलालची शैक्षणिक पात्रता आणि अध्यापनकौशल्य बघून त्याला शिक्षण निरीक्षकपदी बढती दिली आणि त्याची नेमणूक तालुका शिक्षण कार्यालयात केली. त्या शाळेतून बढती मिळालेला तो पहिला शिक्षक होता. गावाने त्याचा उत्स्फूर्तपणे जाहीर सत्कार केला आणि निरोप दिला.
त्याचे कार्यक्षेत्र अधिक विस्तारले गेले. प्रशासनिक व शैक्षणिक ही दोन्ही कामे त्याला आता करायची होती. सुरुवातीला अडखळला परंतु वरिष्ठांच्या सततच्या मार्गदर्शनाने कामे सोपी होत गेली. तालुक्यातील प्राथमिक शाळांना भेटी देणे, त्यांची वार्षिक तपासणी करणे आणि वेळोवेळी शैक्षणिक कामात होणारे बदल शिक्षकांच्या नजरेस आणणे आणि कार्यालयीन प्रशासन सांभाळणे ही कामे त्याला करावी लागत होती. हळूहळू या कामात त्याची रुची वाढू लागली आणि त्याने स्वतःला या कामाला समर्पित केले. त्याची काम करण्याची हातोटी पाहून वरिष्ठ नेहमीच त्याचे कौतुक करायचे. इतरांना त्याचा आदर्श घ्यायला सांगायचे.
रामलाल तालुक्याच्या ठिकाणी बराच रुळला. तालुक्यात त्याची ओळख एक उत्तम शिक्षणाधिकारी अशी झाली. पुढे नियमानुसार दर तीन वर्षांनी बदल्या व्हायच्या पण तालुक्याच्या ठिकाणी. त्यामुळे त्याला नेहमीच छोट्या-मोठ्या शहरातच राहायला मिळायचे. याचा फायदा त्याच्या मुलाला झाला. त्याचे शिक्षण उत्तम झाले आणि तो डॉक्टर झाला. रामलाल आणि सुमन भरून पावली. रामलाल ज्या ज्या गावात/शहरात राहिला तिथे त्याने आपली छाप टाकली. अनेक मित्र जोडले आणि कालांतराने मोठ्या समाधानाने उप-शिक्षण संचालक. प्रथम श्रेणी राजपत्रित अधिकारी या पदावरून निवृत्त झाला. निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या रकमेतून त्याने शहरात प्रशस्त सदनिका घेतली आणि आज तो समाधानाचे आयुष्य जगतो आहे. गतायुष्याचा विचार करताना त्याला त्या ग्रामीण गावातील ते जुने दिवस आठवतात. आपण कुठे होतो आणि कुठे येऊन पोहोचलो याचे त्याला आश्चर्यच वाटते. हे सगळे ऋणानुबंध होते. म्हणूनच इतक्या लोकांशी मी जोडला गेलो आणि समाजाप्रति काही चांगले कार्य माझ्या हातून घडू शकले, असे त्याचे मन त्याला सांगत होते. डुलणार्या आरामखुर्चीत बसून रामलाल शांतपणे पं. कुमार गंधर्व व वाणी जयराम यांची ध्वनिमुद्रिका ऐकत होता,
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी ……….. ……. …….