उसप-नानोडा कालव्यात युवक बेपत्ता

0
3

>> अग्निशामक दलाकडून शोधमोहीम सुरू

उसप नानोडा येथील तिळारी कालव्याच्या प्रवाहात दीप बागकर (17) हा दाडाचीवाडी धारगळ पेडणे येथील युवक बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत सदर युवकाचा अग्निशामक दल व स्थानिक लोकांमार्फत शोध घेण्यात येत होता.

चार ते पाचजणांचा एक गट दुपारी नानोडा येथील एका फार्मवर आला होता. त्याच्या वरच्या बाजूलाच तिळारीचा कालवा असून त्या कालव्याचा प्रवाहही मोठा आहे. सदर युवक त्या ठिकाणी गेले असता दीप बागकर याने काठी घालून पाण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक प्रवाहात तो वाहून गेला. सुमारे शंभर मीटरपर्यंत इतर साथीदारांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सरळ पुढे गेला. त्यानंतर डिचोली पोलीस व डिचोली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी बोट व इतर माध्यमांतून त्याचा शोध घेण्याचा मोहीम सुरू केली. सुमारे साडेतीन किलोमीटरपर्यंत अंतर त्यांनी धुंडाळले मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

जवान उशिरापर्यंत शोध मोहिमेत गुंतलेले होते, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. डिचोली पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून चिंता
राज्यातील अनेक युवक पाण्यामध्ये जाण्याचे धाडस करतात. मात्र आजच्या घटनेत दोन युवकांचा झालेला अपघात वेदनादायी असून पालकांनी तसेच युवकांनी पाण्यात जाताना सर्व ते खबरदारी घेणे तसेच अनोळखी ठिकाणी अशा प्रकारे पाण्यात उतरणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. अशा प्रसंगात पालकांनी खबरदारी घेण्याचे आदेश आपल्या मुलांना द्यावेत. अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी सरकार विशेष मोहीम विशेष यंत्रणा राबवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.