उष्मा सुसह्य करण्यासाठी…

0
247

उन्हाळ्यातील ऋतुबदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. भूक कमी होणं, उन्हाळा बाधणं, ऍसिडिटी, डोकं दुखणं, टाचेला भेगा पडणं असा त्रास उन्हाळ्यात होतो. या बदलांमुळे प्रकृतीच्या अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात. आपापल्या प्रकृतीनुसार आणि आहारानुसार ही लक्षणं कमी-जास्त असू शकतात. वातावरणात होणारे बदल आपल्या हातात नसले तरी निसर्गचक्रानुसार आहार नियोजन करणं हे आपल्या हातात आहे. उन्हाळ्यात आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय खाणं फायदेशीर ठरेल आणि कशामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतील, याचा विचार करायला हवा. या दिवसात आंबे खूप खाल्ले जातात. आंब्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर आहे ज्यापासून आपले यकृत ‘अ’ जीवनसत्त्व तयार करते. आंबा अथवा कोणतेही फळ खाण्याने आपले वजन वाढत नाही. आंबा आईसक्रीम यामुळे मेद वाढण्यास मदत होते. मधुमेहींनी मात्र गोड फळ न खाता कैरी, संत्रे, स्ट्रॉबेरी, मोसंबी, आवळा अशी आंबट फळे खावीत.
उन्हाळ्यात हे खा…
१. गहू, ज्वारी, नाचणी, मका, राजगिरा, शिंगाडा, ओट्‌स, तांदूळ.
२. कंदभाज्या, वेलभाज्या, पालेभाज्या.
३. मूगडाळ, मसूरडाळ, हिरवे मूग, मसूर, मोड आलेली मटकी.
४. गोड फळे, आंबट फळे, घरगुती सरबतं, कोशिंबिरी, रायतं, गुळांबा, मोरावळा.
५. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ.
ही पथ्ये पाळा…
गर्भवती, स्तनदा माता, वृद्ध व्यक्ती या सर्वांनी उन्हाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण वाढवावं. प्रौढ व्यक्तीला दिवसाला सामान्यतः दोन ते अडीच लीटर पाण्याची आवश्यकता असते. उन्हात काम किंवा व्यायाम करणार्‍यांनी लिंबू-मीठ-पाणी यांचा आहारात समावेश करावा. उन्हाळ्यात कैरी आणि चिंच या आंबट पदार्थांचा थोडा आस्वाद घ्यायला हवा.
कैरीचे पन्हे उष्णतेपासून संरक्षण करण्यास मदत करते. आवळासुद्धा शरीरातील उष्णता कमी करतो. आवळ्याचे सरबत, मुरंबा शरीर आणि मेंदूला थंडावा देतं. कलिंगड, टरबूज, काकडी जेवणासह किंवा जेवणानंतर खावं. उन्हाळ्यात बर्फाचा थंड पेयांमध्ये खूप समावेश केला जातो. तो टाळून बर्फाऐवजी माठातील थंड पाणी प्यायल्यास उत्तम.
उष्ण दिवसातील जेवणामध्ये जवस, गहू, ज्वारीची पोळी, मूग, मसूर आणि तुरीच्या डाळीचे वरण, पातळ कढी, भात, दही किंवा ताक यांचा समावेश असावा. भाज्यांमध्ये गोसाळी, चवळीची भाजी कैरीसोबत, कांदे, शेवग्याच्या शेंगा इत्यादींचे सेवन केले पाहिजे.
उन्हाळ्यात कच्चा कांदा, हिरवी कोथिंबीर आणि पदिन्याची चटणी आरोग्यास हितकारक असते. या दिवसात पचन क्षमता कमी होते. यावेळी पचायला हलके पदार्थ खाणं आरोग्यास लाभदायक असतं.
घ्या हलका आणि पौष्टीक आहार…
हलका आणि पौष्टीक आहार घेतल्याने उन्हाळ्यात होणार्‍या त्रासापासून सुटका होते. या दिवसांमध्ये पचायला जड असा आहार घेतला तर पोट बिघडण्याची व अपचन होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात तेलकट, तूपकट, आणि मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रकर्षाने टाळले पाहिजे. या दिवसात जास्त मीठ खाल्लं तरी त्रास होतो. साधा आहार, पाण्याचे प्रमाण अधिक ठेवले तर उन्हाळा सुसह्य होतो.