उमेदवार निवडीसाठी काँग्रेसने गोव्यात पाठवले दोन निरीक्षक

0
31

राज्यातील काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवरून घोळ सुरू असताना आता, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोव्यात सर्वेक्षणासाठी दोन निरीक्षकांना पाठविल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केंद्रीय पातळीवरील खास सर्वेक्षणाच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. विरोधकांकडून अफवा पसविण्यात येत आहेत, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस पक्षाच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांच्या नावावर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झालेली आहे. तथापि, उमेदवारांची नावे अजूनपर्यंत जाहीर न झाल्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे.
भाजप आणि आरजीपी या दोन पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली आहे. तथापि, काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराच्या नावाच्या घोषणेसाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. येत्या गुढीपाडव्यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे, असे गोवा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
उत्तर गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तिघे जण इच्छुक आहेत. त्यात रमाकांत खलप, सुनील कवठणकर, विजय भिके यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर, विरियातो फर्नांडिस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.